घरात वेगवेगळ्या जागी झाडे ठेवता येतात हे आतापर्यंतच्या लेखांतून आपल्या लक्षात आले असलेच. कुंडय़ांप्रमाणेच हॅंगिंग बास्केट प्रकारातील कुंडय़ांमध्येदेखील झाडे लावता येतात. या प्रकारच्या कुंडय़ा हुक लावून त्यावर लटकवता येतात. हॅंगिंग बास्केटमध्ये लावायची झाडे साधारणपणे पसरणाऱ्या प्रकारातील किंवा कमी उंचीची असणारी असतात. ही झाडे वाढून पूर्ण बास्केटमध्ये पसरतात. त्यानंतर पसरणाऱ्या प्रकाराच्या झाडांच्या नाजूक फांद्या खाली लटकतात. या फांद्या हळूहळू वाढून पूर्ण बास्केट झाकून टाकतात. अशा लटकणाऱ्या फांद्यांमुळे आणि पसरणाऱ्या वाढीमुळे ही झाडे आपल्या आजूबाजूला एक वेगळाच जिवंतपणा आणतात.
अशा बास्केटमध्ये लावण्यायोग्य बरेच प्रकार मिळतात. त्यापैकी बिगोनिया आणि ट्रेडस्कॅन्शिया या दोन झाडांविषयी आपण या आधीच्या काही लेखांमधून माहिती घेतली आहे. आजच्या लेखात अशा हॅंगिंग बास्केटमध्ये लावण्यायोग्य अजून काही प्रकारांविषयी जाणून घेऊया.
एल्युमिनियम प्लॅन्ट (Aluminium Plant) :
अतिशय सुंदर दिसणारे हे झाड त्याच्या पानांच्या सौंदर्यासाठी वाढवले जाते. याची पाने मध्यम आकाराची असतात. हिरव्या पानांवर असलेल्या पांढऱ्या / चंदेरी रेषांमुळे याची पाने उठावदार दिसतात. मध्यम उजेडाच्या ठिकाणी ही झाडे वाढू शकतात. हे झाड हॅंगिंग बास्केट व्यतिरिक्त कुंडीत किंवा जमिनीतपण चांगले वाढते. बास्केटमध्ये मातीबरोबर व्यवस्थित प्रमाणात खत घालावे. खतामुळे येणारा भुसभुशीतपणा या झाडाच्या वाढीला पोषक ठरतो. याची वाळलेली पाने अधूनमधून काढून टाकावीत व वाळलेल्या फांद्या सिकेटरच्या साहाय्याने कापून टाकाव्यात. साधारणपणे वर्षांतून एकदा याची छाटणी करावी जेणेकरून याची उंची पाहिजे तेवढी ठेवता येते तसेच छाटणी केल्यामुळे भरपूर नवीन पाने येतात.
बेबीज् टियर्स (Baby’s Tears) :
तजेलदार हिरवा रंग असलेले हे झाड खूप नाजूक दिसते. याची पाने छोटी व गोल आकारासारखी दिसतात. याची पाने बघून लहान मुलांच्या अश्रुसारखा भास होत असल्यामुळे याला बहुदा इुं८’२ ळीं१२ असे नाव पडले असावे. ही झाडे हॅंगिंग बास्केटची शोभा वाढवतात. वाढून खाली लटकणाऱ्या फांद्या ठराविक लांबी ठेवून कापता येतात. खतयुक्त भुसभुशीत मातीत याची वाढ चांगली होते. कमी उजेडाच्या ठिकाणी किंवा सावलीत याचे बास्केट लटकवून ठेवावे.
स्पायडर प्लॅन्ट (Spider Plant) :
गवताच्या पातीसारखे दिसणारे हे झाड आहे. याच्या पातीच्या कडेला हिरवा व मधे पिवळसर पांढरा रंग असतो. याच्या खोडाच्या टोकाला नवीन झाडाची निर्मिती होते. त्यामुळे हॅंगिंग बास्केटमधून छोटी छोटी अनेक नवीन रोपे लटकताना दिसतात. अशा लटकणाऱ्या रोपांमुळे याचे सौंदर्य अजूनही वाढते. अशी छोटी रोपे मुख्य झाडापासून वेगळी करून त्याचे नवीन रोपदेखील तयार करता येते. भरपूर उजेड मिळेल अशा ठिकाणी हे झाड ठेवावे. मातीतील भुसभुशीतपणा याच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असतो.
jilpa@krishivarada.in