ज्यावेळी माणसाला आपले विचार जसेच्या तसे इतरांना कळावेत आणि ते जसेच्या तसे संग्रहित करून ठेवावेत याची गरज निर्माण झाली त्यावेळी लिपीचा शोध लागला. माणूस आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भाव भावना शिलालेखाद्वारे कायम स्वरूपात जतन करण्यात यशस्वी झाला. परंतु त्याला आपले म्हणणे दूरस्थ ठिकाणी पोचविण्याची गरज उत्पन्न झाली, त्यावेळी त्याने त्यासाठी द्रवरूप रंगाचा आणि नेण्या आणण्यासाठी आणि संग्रह करण्यासाठी वजनाने हलक्या अशा भूजपत्र किंवा तत्सम माध्यमाचा उपयोग सुरू केला. त्याचेच प्रगत रूप म्हणजे शाई, कागद किवा कापड. शिक्षणाचे महत्त्व कळून आल्यावर आणि त्याचा प्रसार होऊ लागल्यावर लिहिणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यासाठी शाई, लेखण्या मोठय़ा प्रमाणात लागू लागल्या. म्हणून त्या वस्तू बनविण्याचे तंत्रदेखील दिवसेंदिवस विकसित होत गेले.
जोपर्यंत लिखाण करण्याची गरज अगदी मर्यादित लोकापुरती होती उदा. राजदरबारातील कारकून, हिशोबनीस, सावकारी पेढय़ा मधून काम करणारे मुनीम, गणिती, राशी भविष्य संबधी आकडेमोड आणि लेखन करणारे, यांना लेखन करण्यासाठी जी शाई लागत असे ती वनस्पतीजन्य रंगापासून केलेले काळ्या रंगाचे द्रावण पातळ कापडातून गाळून घेतले जाई व त्याचा लिखाणासाठी शाई म्हणून वापर होत असे. अशा शाईचा लहान बुधला लेखनिकाच्या मेजावर असे आणि मोराचे किंवा इतर पक्ष्याचे पीस किंवा शालीन्द्राच्या अंगावरील काटय़ाचा लेखणी म्हणून उपयोग केला जाई. अशी वनस्पतीजन्य काळ्या रंगाची दाट शाई वाळण्यासाठी अधिक वेळ घेत असे. म्हणून त्या मेजावर एका लहान लाकडी भांडय़ात ठेवलेली बारीक वाळू त्या तयार मजकुरावर पसरून टाकत आणि लगेच ती वाळू परत त्याच भांडय़ात पुनर्वापरासाठी ओतून ठेवत. अशी बरेच वेळा वापरलेली वाळू काढून टाकून त्या जागी नवी वाळू ठेवावी लागे. वनस्पतीजन्य शाई असल्यामुळे त्या शाई ठेवलेल्या दौतीचा तळाशी साका जमत जाई आणि त्यामुळे ती शाईदेखील काही दिवसांनी परत गाळून पुनर्वापरासाठी घ्यावी लागे. बरीचशी ऐतिहासिक कागदपत्रे आणि महसुलाच्या नोंदी, ज्योतिष शास्त्राचे ग्रंथ अशा प्रकारे लिहिलेले आढळतील.
पुढे शिक्षणाचे महत्त्व कळून आल्यावर शिक्षणाचा प्रसार सर्वदूर होत गेला आणि समजातील अधिकाधिक लोक वेगवेगळ्या कारणासाठी लिहू-वाचू लागले. त्याचबरोबर शाई, टाक या लेखनासाठी लागणाऱ्या प्रमुख साधनांमध्ये कालानुरूप सुधारणा होणे अपेक्षित होते. तशी ती होत गेली. कालौघात विद्यार्थी, शिक्षक, सरकारी निमसरकारी कार्यालयात काम करणारे लेखनिक आणि वरिष्ठ पदावरील अधिकारी, वकील, वैद्य, लेखक, गणिती वगैरे ज्यांना ज्यांना रोज लेखन करणे क्रमप्राप्त आहे अशांच्या टेबलवर ही लेखन सामुग्री रोज असणे आवश्यक ठरले. लिहिणारे-वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे मोठी गरज भागविण्यासाठी खाजगी कंपन्यांनी रासायनिक पद्धतीने शाई बनविण्याचे कारखाने काढले. शाई वेगवेगळ्या रंगांत देखील तयार केली जाऊ लागली. काळी, निळी, लाल, हिरवी आणि स्टॅंपपॅडसाठीची वेगळी शाई. सुरुवातीला बाजारात शाई पावडरच्या पुडय़ा मिळत. पाण्यात घालून त्याची शाई तयार करता येत असे. नंतर शाईच्या वडय़ा मिळू लागल्या. विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची शाई पालक घेऊन देत. पूर्वी लिखाणासाठी बोरू म्हणजे गवत वर्गीय वनस्पती पासून तयार केलेली लेखणी वापरत. याची जागा कालांतराने धातूचे निब असलेल्या लाकडी लेखणी म्हणजेच टाकाने घेतली. तरीही काही वर्षे अक्षर वळणदार येण्यासाठी पुस्ती लिहिण्याचा सराव करावा लागे. त्यासाठी लिहिण्याकरता बोरू वापरात होता. अक्षर जसे हवे त्या प्रमाणे निब वापरावे लागे. त्यासाठी सपाट टोकाचे निब, टोकदार निब आणि फाटा म्हणजे निब थोडे चपटे आणि टोकाशी रुंद आणि तिरके घासलेले असे. दरम्यानच्या काळात अगदी सुटसुटीत सहज खिशाला लावून कुठेही नेता येण्यासारखे शाईचे फाउंटन पेनदेखील बाजारात दिसू लागले होते. लिखाणासाठी आणि जवळ बाळगण्यासाठी सोयीस्कर अशा त्याच्या बनावटीमुळे ते लोकप्रिय देखील होत होते. त्याबरोबर टीप कागदाची गरजही उरली नाही. कारण फाउंटन पेनमधील शाई लगेच वाळून जाते. बॉल पेनचा अविष्कार होई पर्यंत फाउंटन पेन सर्वदूर वापरले जाऊ लागले आणि त्याची जागा बॉल पेनने घेतल्यावर आज शाईचे फाउंटन पेन देखील दुर्मिळ होत चालले आहे. विद्यार्थ्यांना बॉल पेन वापरायची मुभा गेल्या काही वर्षांत मिळालेली आहे त्यापूर्वी बॉल पेन विद्यार्थ्यांसाठी वज्र्य होते. त्यांना शाईचे पेनच अभ्यासासाठी वापरावे लागे.
संगणक भारतात येण्यापूर्वी कुठल्याही कार्यालयात जवळ जवळ सत्तरच्या दशक पर्यंत सामन्य कारकुना पासून सर्वोच्चपदी असलेल्या व्यक्तींच्या समोर लेखनासाठी शाईची दौत, लेखणी म्हणून टाक आणि लिहून झालेल्या मजकुराची शाई सुकावी म्हणून टीप कागद असा सरंजाम मांडलेला असायचा. लेखन करणाऱ्या व्यक्तीच्या हुद्यानुसार त्या वस्तूंचा थाट बदलत जायचा. सामन्य कारकुनाच्या टेबलावर एक चीनी मातीचा लहान शाईचा बुधला आणि टाक आडवा ठेवण्यासाठी लोखंडी स्टॅंड असायच आणि टीप कागद किंवा ब्लोटिग पेपरचा चतकोर. साहेब मंडळींच्या टेबलवर मात्र दोन खणांची पारदर्शक काचेची शाई दाणी असे. त्याच्या एका खणात निळी शाई आणि दुसऱ्या खणात लाल रंगाची शाई. लाल, निळ्या शाईसाठी वेगवेगळे टाक एका नक्षीदार छोटय़ा घोडीवर (दुमडून ठेवण्याची छोटी उतरंड) आडवे ठेवण्याची सोय असायची. ही शाई वाळायला थोडा अवधी लागे म्हणून लिहून झालेला मजकूर लगेच टिपण्यासाठी अर्धगोलाकार आकर्षक ब्लोटिंग पेपर लावलेले ब्लोटिंग पॅड असे. किंवा टेबलवर पसरलेला नक्षीदार कोन असलेल्या एका पॅडमध्ये मंद गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचा टीपकागद पसरलेला असे. वापर जस जसा वाढत गेला तसा तसा या सर्व वस्तू वेगवेगळ्या आकर्षक रुपात बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. हुद्यानुसार त्या टेबलावर मांडल्या जात. या सर्व वस्तू म्हणजे दौती, टाक आणि टीप कागद कालांतराने बदलावे लागायचे. दौतीत नव्याने शाई भरावी लागत असे, टाकाची निबे लिहून लिहून घासली गेल्याने खराब होत त्यामुळे ती बदलावी लागत आणि टीप कागदावर वारंवार मजकूर टिपत गेल्या मुळे तोदेखील संपूर्ण डागाळून जाई . कार्यालयात एखाद्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर हे लेखन साहित्य बदलण्याचे काम सोपविलेले असे. बहुतेक सोमवारी प्रत्येक टेबलावरचे हे सर्व लेखन साहित्य बदलले जाई.
वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी छप्पन-सत्तावन साला पर्यंत शाई आणि टाक रोज शाळेत घरून आणावा लागत असे. विद्यार्थ्यांकरीता टीप कागद त्यांच्या कंपासपेटीत इतर साहित्याबरोबर दिला जाता असे. शाईच्या लहान बाटलीस दोऱ्यांनी शिंकाळे तयार करून ती हाताच्या बोटात पकडून शाळेत जाणारे विद्यार्थी त्याकाळात शाळेच्या वाटेवर पाहायला मिळत. शाळेत वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जी बेंचेस असत त्याला शाईची बाटली ठेवण्यासाठी एक गोल आकाराची खाच आणि टाक ठेवण्यासाठी एक आडवी खाच कोरलेली असे. आजदेखील काही जुन्या शिक्षण संस्थांमध्ये अशी त्याकाळातले बेंचेस वर्गातून पाहायला मिळतात. असे काही जुने बेंचेस त्या इतिहासाच्या खुणा आजही आपल्या अंगावर बाळगून असले तरी आता विद्यार्थी काय किंवा वेगवेगळ्या कार्यालयात काम करणाऱ्या आणि इतर कारणासाठी लेखन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तंसाठी संगणक अनिवार्य ठरू लागला आहे. आणि पेन तेसुद्धा बॉल पेन केवळ सही करण्यापुरतेच गरजेचे राहिले आहे. शाईचे पेन जिथे हळूहळू दिसेनासे होत चालले आहे अशा जमान्यात आता शाईची दौत, टाक आणि टीप कागद आणि संबंधित इतर वस्तू या ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहात जमा झाल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही.
मोहन गद्रे -gadrekaka@gmail.com