प्राची पाठक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘निर्माल्य’ या नावाखाली केवळ देवाला वाहिलेल्या फुलांचाच कचरा साठत नाही. ते फारच गोजिरे चित्र असेल! निर्माल्यात इतरही अनेक गोष्टी असतात आणि पूजेचे वापरून झालेले साहित्यसुद्धा असते. उदबत्तीच्या उरलेल्या काडीपासून ते समईच्या- निरांजनीच्या अर्धवट जळालेल्या वातीपर्यंत आणि शोभेच्या साधनांच्या कचऱ्यापासून ते शिल्लक राहिलेल्या धातूच्या, मातीच्या पणत्यांपर्यंत बऱ्याच गोष्टी निर्माल्यातच टाकून दिल्या जातात.

ओला कचरा, सुका कचरा असा पुष्कळ गाजावाजा झाल्यावर आता निदान काही घरांमध्ये तरी दोन डस्टबिन्स दिसू लागल्या आहेत. ओला कचरा नेमका कोणता आणि सुका कोणता, याचे आपापल्या अंदाजाने लावलेले वेगवेगळे फलक सर्वत्र दिसतात तरी. त्यानुसार लोकांना जरा मदत होते वर्गीकरण करताना. हे अर्थातच काही पॉकेट्समध्ये घडते आहे. सर्वत्र नाही. त्यात कायम केली जाणारी तक्रार म्हणजे, आम्ही घरातून लाख वेगळा करून देऊ कचरा; पण घंटागाडीत कचऱ्याच्या डब्यात मात्र ते एकत्रच होते की! कचरा वर्गीकरणाच्या मूळ हेतूलाच याने हरताळ फासला जातो, हे खरेच आहे. या मुद्दय़ातही अनेक बारकावे आहेत.

मुळात, आपण केलेल्या कचऱ्याची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे, याचे एक समाज म्हणून असलेले भान आपल्याला पुरेसे आलेले नाही. त्यात एक समाज म्हणून विविधतासुद्धा खूप जास्त आहे. अनेक पदर आहेत. त्यामुळे कितीही सुविधा पुरवल्या, तरी आपणच केलेला कचरा कुठेही भिरकावून द्यायची प्रवृत्ती कुठे ना कुठे शिल्लक राहतेच. अगदी आज देवाला मनोभावे वाहिलेली फुले उद्या कचरा होणारच असतात. पण हा कचरा नावाने ‘निर्माल्य’ संबोधला तरी त्याला एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत करकचून बांधून ट्रेनमधून खाडीत फेक, पुलावरून खाली नदीत टाक, दुरून एखाद्या तलावात भिरकावून दे, असे प्रकार होतातच. अलीकडे आलेल्या प्लॅस्टिकबंदीमुळे काही ठिकाणी घरातील ओला कचरा टॉयलेटमध्ये टाकण्याचे प्रकार सुरू आहेत.

‘निर्माल्य’ या नावाखाली केवळ देवाला वाहिलेल्या फुलांचाच कचरा साठत नाही. ते फारच गोजिरे चित्र असेल! निर्माल्यात इतरही अनेक गोष्टी असतात आणि पूजेचे वापरून झालेले साहित्यसुद्धा असते. उदबत्तीच्या उरलेल्या काडीपासून ते समईच्या- निरांजनीच्या अर्धवट जळालेल्या वातीपर्यंत आणि शोभेच्या साधनांच्या कचऱ्यापासून ते शिल्लक राहिलेल्या धातूच्या, मातीच्या पणत्यांपर्यंत बऱ्याच गोष्टी निर्माल्यातच टाकून दिल्या जातात. जास्तीचे कुंकू, बुक्का, गंध, झाडून लावलेल्या रांगोळ्या, मोठाली सडकी फळे, धूप, कापूराचे तुकडे, देवाला वाहिलेल्या माळांमध्ये असलेले डेकोरेशनचे प्लॅस्टिक, त्याच्या झिरमिळ्या, प्लॅस्टिक अथवा धातूचे मणी,  पुठ्ठे, कागद, वेगवेगळ्या प्रकारचे धागेदोरे, प्लॅस्टिकच्या वेष्टनांचा कचरा हे आणि असे भरपूरच काही टाकलेले असते. प्रसाद म्हणून ठेवलेले, पण शिळे झालेले, खराब झालेले अन्न, त्यांचे खोके असेही लोक एकत्रच फेकून देतात. त्यात जेवणाच्या प्लेट्स, पत्रावळ्या, त्यातही असलेले विविध प्रकार, खरकटेसुद्धा सरसकट निर्माल्य म्हणून टाकून दिलेले असते. पूजा आणि जेवणावळी एकत्र झालेल्या असतील, तर सर्व प्रकारचा कचरा निर्माल्य म्हणूनच एकत्र केला जातो.

डेकोरेशनसाठी ठेवलेल्या फुलांच्या बुकेमध्येसुद्धा फुलांसोबतच इतरही पाच- दहा प्रकारच्या गोष्टी असतात. केवळ झाडाफुलांचा असा तो कचरा नसतो. चमकिले काही त्यावर टाकलेले असते. छोटय़ा काडय़ांना थर्मोकॉल, फोमचे बॉल्स लावलेले असतात. स्पंज असतो खाली. लाकडी पट्टय़ा असतात. प्लॅस्टिक डब्यात तो बुके तोललेला असतो. त्यावरून लेसेस लावून, चकचकीत प्लॅस्टिक शीट लावून बांबूच्या चकतीवर ते स्टेपल करून ठेवलेले असते. बुके फेकताना तो चमचमीत पेपर काढायचा ठरला तरी त्यातील स्टेपलर पिना काढून त्यांची टोके दुमडून मगच त्या फेकणे, हाच एक वेगळा उद्योग होऊन बसतो. नाहीतर त्या धातूच्या पिना अन्नापासून ते पायाखाली येऊन दुखापत होणे, टायर खराब होणे इतक्या रेंजमध्ये डोक्याला ताप होऊन जातात. अशाप्रकारे खूपच बारकाईने बघितले, तर निर्माल्य हे काही केवळ झाडाफुलांचे पवित्र असे काही नसते. त्यात कुंकू, बुक्क्यांच्या केमिकल्सपासून ते विघटनशील नसलेले असेही बरेच काही टाकलेले आढळते.

असे सगळे कडबोळे एकत्र जमा करून निर्माल्य म्हणून जलस्रोतांमध्ये फेकणे तर चूकच आहे. तो ना धड ओला कचरा, ना धड सुका. निर्माल्य या टायटलखाली आपण नेमके काय काय फेकतो, किती प्रकारच्या वस्तूंचा कचरा त्यात असतो, हे निदान आपले आपल्यासाठी तरी जाणून घेऊ या. जिथल्यातिथे त्या- त्या पदार्थाचे वर्गीकरण चार, पाच, सहा प्रकारच्या खोक्यांमध्ये करता येतेय का? विचारू स्वत:ला. त्यातील काही गोष्टींचा पुनर्वापर करणे शक्य असते. काही कंटेनर्स कुंडय़ा म्हणून वापरता येतात. भारंभार रंग ओतून मोठाल्या रांगोळ्या जिथे तिथे काढण्यापेक्षा छोटय़ा, साध्या पिठांच्या पारंपरिक रांगोळ्या काढता येतील. डेकोरेशनसाठी कागदाचे, कापडाचे पॅटर्न करून ठेवता येतात. तेच वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा वापरता येतात. टाकून द्यायची गरज पडत नाही. तेवढा कचराही कमी होतो. निर्माल्यातील फुलापानांचे उत्तम खत तयार करता येते. अगदी एखाद्दुसऱ्या कुंडीत ते साठवत राहून त्यावरच वाढणारी फुलझाडे लावून त्यांचीच फुले पुन्हा देवाला, असे निसर्गाचे चक्रसुद्धा आपल्याच घरात पाळता येईल..

करून तर बघू..

prachi333@hotmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prachi pathak article on household waste