‘वास्तुरंग’ (३ ऑक्टोबर) पुरवणीत डॉ. शरद काळे यांचा ‘निसर्गऋण’ हा लेख वाचल्यावर मला अनेकांकडून विचारणा झाली, की ही बास्केट तर तुम्ही बनवलेल्या बास्केटसारखीच दिसत आहे. यात काय वेगळे आहे का? तुम्ही तुमची बास्केट ‘बीएआरसी’ला दिलीत का? त्या सर्व प्रश्नांचे शंका निरसन करण्यासाठी हा पत्रप्रपंच.
मी २४ एप्रिल रोजी डॉ. शरद काळे यांना आपली बास्केट दाखवण्यासाठी एका सद्गृहस्थांच्या बरोबर गेलो होतो. इच्छा होती की, त्यांना ही बास्केट दाखवावी, त्यांचे यावरचे मत घ्यावे आणि त्यात आणखी काही सुधारणा कराव्यात. त्या वेळी त्यांनी अशी कुठलीही बास्केट ते तयार करत असल्याचे ते बोलले नाहीत. उलट त्यांनी माझ्या बास्केटच्या कल्पनेचे कौतुक केले आणि ती बास्केट आपणहून ठेवून घेतली. हा लेख प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्याशी मी संपर्क केला. ‘किती जणांना ही बास्केट आपण दिलीत?’ असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांनी अशा प्रकारची कुठलीही बास्केट आपण तयार केली नसल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यांनी त्याच्यासाठी कल्चर तयार केले आहे असे ते म्हणाले. मी ही बास्केट साधारण १० वर्षांपासून बनवत आहे. आतापर्यंत ४००० जणांना या बास्केट मी दिल्या व आजही ते लोक वापरत आहेत. यासाठी लागणारे सूक्ष्मजीव कल्चरदेखील मी बनवत आहे. मी एकटाच हा उपक्रम राबवत असल्यामुळे मी फक्त ४००० लोकांपर्यंतच पोहोचू शकलो, परंतु ‘बीएआरसी’च्या सहकार्याने माझी बास्केट ४० कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा संकल्प डॉ. काळे करू इच्छितात. मीही माझ्याकडून माझ्या बास्केटचा प्रचार आणि प्रसार करत राहण्याचा संकल्प केला आहे.
– जयंत जोशी

Story img Loader