‘वास्तुरंग’ (१६ जानेवारी) पुरवणीत एशियाटिक सोसायटीविषयीचा अरुण मळेकर यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. तो वाचून मला एक फार जुनी आठवण झाली. ब्रिटिश राजवटीत या सोसायटीचे नाव होते रॉयल एशियाटिक सोसायटी. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या सोसायटीचे पहिले भारतीय सेक्रेटरी माझे वडील श्रीपाद रामचंद्र टिकेकर हे होते. त्यांच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी भारतीय दृष्टिकोनातून काही सुधारणा घडवल्या. पण त्याहीपेक्षा एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली. १९४८ जानेवारी ३० रोजी महात्माजींचा खून झाल्यावर त्यांच्या अस्थींचा कलश मुंबईत आला होता. तो अस्थिकलश जनतेला बघता यावा म्हणून माझ्या वडिलांनी तो टाऊन हॉलमध्ये ठेवला होता. निशिगंधाची सुगंधी फुलं सफेद रंगाची, लाल गुलाब, जरबरा, अॅस्टर, लीली अशी रंगीबेरंगी फुलं आणि जमिनीवर पांढऱ्या आल्पनेची रांगोळी! या सजावटीमध्ये मधोमध तो कलश ठेवला होता. पायऱ्या चढून टाऊन हॉलमध्ये शिरण्याच्या उजव्या हाताला ही जागा नियोजित केली होती. फुलांच्या मंदमधुरवासांत उदबत्त्यांचा वास मिसळून एक प्रकारचं गंभीर वातावरण तयार झालं होतं. त्याच दरम्यान आम जनतेला टाऊन हॉल खुला झाला होता. त्या गंभीर वातावरणात लोक अगदी दाटीवाटीने येऊन दर्शन घेऊन जात होते. माझं वय तेव्हा दहा वर्षांचे. त्या लायब्ररीत सगळ्या दालनात मनसोक्त हिंडत असताना त्या तिथल्या भव्य, विशाल, देखण्या पुतळ्यांत जो भारदस्तपणा आला होता, त्यांत या पवित्र अस्थिकलशामुळे एक वेगळंच गांभीर्य पसरलं होतं. ती आठवण विसरणं अश्यक्य आहे. -वसुधा पंडित, चेंबूर.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा