‘सहेलियों की बाडी’ या ऐतिहासिक उद्यानासाठी फतेसागर जलाशयातून नलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. उद्यानातील कारंजे कार्यान्वित होण्यासाठी कोणतीही पारंपरिक ऊर्जा वापरली गेली नाही. आधुनिक तंत्रज्ञान अस्तित्वात नसताना फक्त मनुष्यबळाचा वापर करून पंपाने पाणी खेचत हे कारंजे तयार केले गेले.. ‘लँड स्केप’ किंवा ‘हॉर्टिकल्चर’ शास्त्राचा उगम होण्याआधी येथील राज्यकर्ते कलात्मक दृष्टी असलेले आणि कसे निसर्गप्रेमी होते याची प्रचीती येते..
राजस्थानची भूमी म्हणजे अन्याय करणाऱ्या क्रौर्याला शौर्याने जबाब देणारी नरवीरांची भूमी. त्यासाठी आपल्या मातृभूमीशी एकनिष्ठ राहताना ‘जान जाय पर वचन ना जाय’चा आदर्श असलेल्या रणशूर योद्धय़ांचा हा ऐतिहासिक प्रदेश. अनेक गडकोट, गढय़ा, पुरातन वाडय़ांबरोबर कलापूर्ण, दिलखेच वास्तूंची निर्मिती एक वैशिष्टय़ आहे. त्यातील राजधानी जयपूर, उदयपूर, जैसलमेर, मेवाड भूमीनी निर्माण केलेली स्थापत्य कलाकृती देश – विदेशात नावलौकिक मिळवलाय. पण या बरोबरीने या प्रदेशातील सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रकारची जी उद्याने आणि जलायशयाला जे प्रारूप दिले तेही वाखणण्यासारखे आहे.
उदयपूरसारख्या जलाशयामधील आकर्षक जलमहालाची वास्तू हेच दर्शवते. तर अनेक बगीच्यांमधून या रूक्ष प्रदेशातील निरव शांततेसह जो निसर्ग आविष्कार पाहायला मिळतो त्यातून त्यांचे निसर्गप्रेमही जाणवते.
उदयपूर नगरीतील सहेली मार्गावरील प्रख्यात ‘सहेलियों की बाडी’ हे वैशिष्टय़पूर्ण उद्यान त्याचे उत्तम उदाहरण आहे. ‘सहेलियों की बाडी’ हे एक कारंजाचे नयन मनोहारी उद्यान आहे. या उद्यानात प्रशस्त प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच सभोवतालची पाण्याची उधळण करणारी कारंजी पाहून माणूस सुखावतो. सहेलिया म्हणजे मैत्रिणी, बाडी म्हणजे उद्यान हा साधा सोपा असा अर्थ आहे.. या उद्यान निर्मितीनंतर प्रारंभी फक्त स्त्रियांनाच प्रवेश होता. आता पर्यटनस्थळ दर्शनात या उद्यानाचा समावेश असल्यानी पुरुषवर्गालाही येथे प्रवेश दिला जातो.
या प्रदेशावर अधिसत्ता असलेल्या राजघराण्यातील स्त्रिया आणि त्यांच्या मैत्रिणींना मनातील हितगूज करून संवाद साधण्यासाठी हे मनोहारी उद्यान उभारले गेले. राजघराण्यातील पडदा-गोशा जीवन पद्धतीतून काही काळ मुक्तपणे वावरण्यासाठी या उद्यानांची निर्मिती करताना सारे उद्यान क्षेत्र विविध प्रकारच्या वृक्षराजींनी बहरलेले ठेवले आहे, आणि या हिरवाईशी सुसंगत अशी वेगवेगळ्या आकाराची कारंजी उभारून उद्यान जास्तीतजास्त सुशोभित करण्यात राज्यकर्त्यांचे निसर्गप्रेमही जाणवते.
१८ व्या शतकाच्या पूर्वार्धात राजा संग्राम सिंग यांनी आपल्या कल्पनेतील हे उद्यान परिपूर्ण होण्यासाठी इंग्लंडची सम्राज्ञी ‘एलिझाबेथ’कडे काही कारंजी पाठवण्याची विनंती केली, त्यामुळे कल्पनेतील बाग साकारली.
पुतेसागर जलाशयाचा बंधारा फुटल्याने या उद्यानाची खूप हानी झाली होती. मात्र महाराणा संग्राम सिंगने इ. स. १७३४ साली या बागेची नवीन स्वरूपात निर्मिती करून त्याचे मूळ स्वरूपही पूर्ववत ठेवले. सभोवतालच्या वनश्रीबरोबर छोटे-मोठे जलाशय निर्माण करून महाराणीसह तिच्या सख्यांच्या जलक्रीडेची सोय करण्यात आली. कारंजांचे बांधकाम पूर्णत्वास गेल्यावर त्यातून उंचच उंच उडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावरून त्यांना स्वाडान फवारा, बिन बदल बरसता, फागुन भावहा, कमळजलाई, रास लिला, हाथीफवारा, स्वागत कारंज, सावन भादो फवारा अशा नावांनी येथील कारंजी ओळखली जाताहेत.
उद्यानाच्या प्रारंभी चारही दिशांना काळ्या रंगाच्या दगडी छत्र्या दिसतात. याव्यतिरिक्त एक शुभ्र संगमरवरी छत्री आहे. या छत्रीच्या शिखरावरून पाण्याच्या धारा पावसासारख्या कोसळल्याने या छत्रीवरून पाणी जमिनीवर पडताना पर्जन्यवृष्टी झाल्याचा भास होतो. ही सर्वच कारंजी टिकाऊ दगडांची असून त्याला तीन-चार स्तर आहेत. प्रत्येक स्तरावर गोलाकार पृष्ठभाग असून तळापासून ते अखेरच्या शिखर स्तरापर्यंत वेगवेगळ्या प्राण्यांची शिल्पाकृती पेश करून त्या कारंजांना सौंदर्यशाली बनवले आहे. या कारंजातून उडणाऱ्या पाण्याचे उंच फवारे आणि त्याच्या सभोवतालची लहान-मोठी जलाशये बघताना प्राचीन ग्रीक, रोमन, पर्शियन उद्यान कलाकृतीची खचितच आठवण येते. दिवसातील प्रत्येक प्रहरातील या उद्यानाच्या सौंदर्याचा चेहरा वेगवेगळ्या प्रकारचा जाणवतो.
राजस्थानात पावसाचं प्रमाण तसं कमीच. त्यामुळे ‘सहेलियों की बाडी’ येथील पाणी प्रवाहासह वनश्रीचं लख्खं दर्शन घेता घेता राजघराण्यातील सख्यांचा वावर म्हणजे त्यांना मुक्तानंद होता.
या सर्वच उद्यानात पाण्याचा वर्षांव जरी केंद्रस्थानी असले तरी विविध प्रकारची वनश्री उद्यानाच्या नावलौकिकाला साजेसे सुबक बांधकाम नजरेत भरणारे आहे. कारंज्यातील पाण्याचा वर्षांव एकत्रित करणारी लहान-मोठी जलाशये आणि त्यांच्या काठाचे सुरक्षित बांधकाम साधताना या उद्यान रचनाकारांनी बागेच्या सौंदर्याला बाधा आणलेली नाही. बगीच्याच्या उभारणीत सख्यांना एकांतासह एकत्र आणण्याची जागा हा प्रमुख उद्देश ध्यानी ठेवल्यानी त्यांना मुक्तपणे वावरण्यासाठी उद्यानातील नैसर्गिक वातावरणात सुरक्षित तलवांबरोबर झोपाळेही बांधले आहेत.
राजस्थानप्रमाणे नजीकचे गुजरात राज्यही अनेक प्रकारच्या वारसावास्तूंसाठी प्रख्यात आहे. नुकतेच जागतिक वारसा वास्तू यादीत समावेश झालेली गुजरातच्या पाटणच्या ‘रानी की बाव’ म्हणजे राणीनं आपल्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ बांधलेली विहीर म्हणजे हा अद्भुत असा कलात्मक वारसावास्तू नमुना आहे. ‘सहेलियों की बाडी’ निर्मितीची पाश्र्वभूमी थोडीशी वेगळी आहे. आपली मर्जी असलेल्या खास लाडक्या राणीचा अनुनय करत तिचा हट्ट पुरवून तिला खूश करण्यासाठी राजस्थानात अशी अनेक सौंदर्यशाली उद्याने त्या काळी निर्माण झाली. असल्या अजरामर प्रेमातूनच राजस्थान प्रदेशात महाल, राजवाडे, मंदिरे शिल्प उभारली गेली. राजा जरी सर्वेसर्वा असला तरी असल्या बगीच्यातून त्याचा वावर नसायचा. त्यामुळे मैत्रिणी- सख्यांना मोकळेपणासह एकांत लाभावा हे त्यापाठीमागे अभिप्रेत होते.
स्त्रीसुलभ आकर्षक अशी अनेक रंगांची फुले, शृंगार प्रसाधने, खास भोजन सोहळे आयोजित करून अशी अनेक उद्याने राजस्थानात निर्माण केली गेली.. राजस्थानातील आग ओकणाऱ्या उन्हाळ्यात या उद्यानात गारवा राहण्यासाठी जलप्रवाह आणि वनश्रीचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन केले गेले आहे. ‘सहेलियों की बाडी’ दरवर्षी श्रावण कृष्ण पक्षात अमावास्येला ‘हरियाली अमावास्या’ नामक एक विशाल मेळावा आयोजित केला जातो. त्याच्या उत्साहपूर्ण जल्लोषानंतर दुसरे दिवशी फक्त महिलांसाठी मेळावा होत असतो..
या उद्यानासाठी फतेसागर जलायशयातून नलिकेद्वारे या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला आहे. उद्यानातील कारंजे कार्यान्वित होण्यासाठी कोणतीही पारंपरिक ऊर्जा वापरली गेली नाही हे आणखीन एक विशेष. आजच्या काळातील कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान अस्तित्वात नसताना फक्त मनुष्यबळाचा यथायोग्य वापर करून पंपाने पाणी खेचत हे कारंजे तयार केले गेले.
सुमारे तीन शतकांची साक्षीदार असलेली ही मैत्रिणींची बाग आजही सुस्थितीत असून, उदयपूरनगरी पर्यटकांच्या स्थळदर्शनात मानाचं स्थान राखून आहे. या सखी उद्यानाला अरवली पर्वतरांगेची पाश्र्वभूमी असल्याने हे ठिकाण म्हणजे अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी वरदान ठरली आहे.. ‘लँडस्केप’ आणि ‘हार्टिकल्चर’ शास्त्राचा उगम होण्याआधी येथील राज्यकर्ते कलात्मक दृष्टी असलेले आणि कसे निसर्गप्रेमी होते याची प्रचीती येते.
अरुण मळेकर vasturang@expressindia.com