आम्ही आमच्या गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये रहात आहोत. सदर फ्लॅट आम्हा (पती / पत्नी) दोघांच्या नावावर आहे. त्याचे नॉमिनेशन आम्ही आमच्या दोन्ही मुलांच्या नावे केले आहे. तर आमच्या पश्चात सदर फ्लॅट त्यांच्या नावे करून घेण्यासाठी काय करावे लागेल?
नीला देशपांडे, गोरेगाव
आपल्या पश्चात सदर फ्लॅट नॉमिनेशनच्या जोरावर आपल्या मुलांच्या नावे हस्तांतरित होईल. त्यासाठी त्यांना उपविधीमध्ये दर्शवल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल व त्याचा एक संच संस्थेकडे द्यावा लागेल. त्याचबरोबर उपविधीत दर्शवल्याप्रमाणे सम्मतीपत्र / हमीपत्र / निरनिराळे अर्ज यांची पूर्तता करावी लागेल.
या नॉमिनेशनबरोबरच आम्ही मृत्युपत्र फ्लॅट दोन्ही मुलांच्या नावे केलेला आहे. आम्ही आमचे मृत्युपत्र हे नोंद केलेले नाही. तर अशा तऱ्हेने देखील सदर फ्लॅट आमच्या मुलांच्या नावे होईल का?
– नीला देशपांडे, गोरेगाव
सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. सदर फ्लॅट ही आपली स्वकष्टार्तित मालमत्ता असेल तर ती मृत्युपत्राने आपल्या मुलांच्या नावे होईल. मात्र आपण मृत्युपत्र केलेले आहे ते योग्य पद्धतीने बनवलेले असले पाहिजे. त्यावर न्यायालयाकडून प्रोबेट घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय पुढील गोष्टी आपल्या लक्षात असू द्या. १) मृत्युपत्र संयुक्तरित्या केले असेल अथवा वेगवेगळे बनवले असेल तरी त्यावर साक्षीदारांच्या सह्य़ा आहेत ना, याची खात्री करून घ्या. २) सदर मृत्युपत्रामध्ये वैद्यकीय दाखला जोडला आहे ना? सदर मृत्युपत्रामधील भाषेमधून वेगवेगळे अर्थ निघत नाहीत ना ३) सर्व मालमत्तेचा तपशील बरोबर दिला आहे ना.. यांसारख्या गोष्टींची खात्री करून घ्या. म्हणजे मागाहून मृत्युपत्र अवैद्य ठरण्याची भीती उरणार नाही.
मृत्युपत्र जर मुंबईत केलेले असेल तर त्याला नोंदणी सक्तीची आहे का? मृत्युपत्रातील एखादा साक्षीदार मरण पावला तर केलेले मृत्युपत्र रद्दबातल ठरते का? आमची मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत.
– नीला देशपांडे, गारेगाव
मृत्युपत्र कुठेही केले तरी त्यासाठी नोंदणी (रजिस्टर) सक्तीची नाही. मात्र मुंबईमधील मालमत्तेविषयी केलेल्या मृत्युपत्रावर न्यायालयाकडून हुकूमनामा (प्रोबेट) घ्यावा लागतो. एखादा साक्षीदार वारला म्हणून मृत्युपत्र रद्दबातल ठरत नाही आणि आपली मुले कुठे स्थायिक झाली आहेत त्याचा व मृत्युपत्राचा काहीही संबंध येत नाही. मृत्युपत्र रद्दबातल ठरण्याची महत्त्वाची कारणे याअगोदर नमूद केली आहेत. त्यामुळे ती पुन्हा देण्याची गरज नाही.
एखाद्या बिल्डरचे देणे बाकी असेल व सोसायटी स्थापन झाली असेल तर त्या सदस्याला त्याची सदनिका विकता येईल का? त्यासाठी गृहनिर्माण संस्था त्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे थांबवील का? बिल्डरचे वॅटचे पैसे देणे बाकी असतील व ते कोणी भरायचे याबाबत चर्चा चालू असेल तर संस्था ना हरकत प्रमाणपत्र देणे थांबतील का? यासाठी गृहनिर्माण संस्थेला जबाबदार धरता येईल का?
– अमित पाटील
आपण दिलेली माहिती थोडी मोघम वाटते. समजा बिल्डरचे काही अधिकृत देणे असेल तर तो आपणाला ताबाच देणार नाही. मात्र त्याने काही कर्ज वा पैसे सदस्याला दिले असतील व रीतसर गहाणखत केले असेल व त्याची प्रत संस्थेला दिली असल्यास गृहनिर्माण संस्था ना हरकत प्रमाणपत्र देणार नाही. परंतु वॅटसारखे देणे राहिले असेल तर त्यासाठी गृहनिर्माण संस्था ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे थांबवील असे आम्हाला वाटत नाही. कारण वॅटची रक्कम भरणे ही बिल्डरची जबाबदारी आहे. आता ती त्याने करारनाम्याने खरेदीदारावर ढकललेली आहे किंवा कसे हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
ghaisasasso@yahoo.com