सौरऊर्जा हा स्वच्छ अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे, तसेच देशाच्या आर्थिक वाढीसाठी व कल्याणासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शून्य उत्सर्जनामुळे, सौरऊर्जेमध्ये प्रचंड क्षमता असून, विविध प्रकारच्या उपकरणांमुळे ही क्षमता वाढवता येऊ शकते. विशिष्ट विकासामुळे, तसेच कमीतकमी देखभालीमुळे सौरऊर्जा औद्योगिक व देशांतर्गत वरदान ठरली आहे. सरकारकडून करसवलत आणि वजावट यामुळे ती आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरू शकते. आपरंपरिक ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून अनेक विकसित देशात आता सौरऊर्जेचा जास्तीतजास्त वापर करू लागले आहेत.
गेल्या काही वर्षांत केवळ ग्लोबल वॉर्मिग या प्रश्नावर भर देण्याऐवजी ऊर्जाबचत आणि पैसेबचत याविषयी जागृती वाढवली आहे. सध्या आपल्याकडे सौरऊर्जेच्या वापराचा, त्यातही प्रामुख्याने सोलार वॉटर हीटरचा, अधिक विचार होऊ लागला आहे.
महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक:
– विजेचे वाढते दर, दरवर्षी अंदाजे १०% दरवाढ
– काळानुसार, लोकांचा सौरऊर्जेवरील विश्वास वाढत असून, सौर उपकरणे खरेच पैसे वाचवत असल्याची जाणीव लोकांना होत आहे.
आता सौर उत्पादनांमध्येही नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान बाजारात आले आहे. चांगल्या दर्जाच्या सोलार वॉटर बसवण्यासाठी अंदाजे १७,५०० ते २०,००० रुपये खर्च येतो.
चार जणांचा समावेश असलेल्या कुटुंबाला दररोज अंदाजे १०० लिटर गरम पाणी लागते. त्यासाठी दररोज अंदाजे ५ युनिट वीज लागते. त्यामुळे, महिन्यात ५ प् ३०= १५० युनिट वीज वापरली जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये, विजेचे दर कमालीचे वाढले आहेत. भारतभरातील रहिवाशांना वाढत्या वीजबिलाचे चटके सहन करावे लागत आहेत. भारतात विजेची मागणी सातत्याने वाढत आहे आणि ऊर्जेचे स्रोत झपाटय़ाने कमी होत आहेत. विजेचे संकट ओढवण्यापूर्वी पर्यायाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. या वास्तवामुळे सरकारला अपारंपरिक ऊर्जेवर भर देणे भाग पडले आहे. तसेच, घरामध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत देण्याची तरतूद केली आहे.
भारतातील लोकांमध्ये सौर हा पसंतीचा पर्याय आहे. केवळ किमतीमुळे किंवा पर्यावरणीय घटकांमुळे नाही, तर भारतात मिळत असलेल्या भरपूर सूर्यप्रकाशाच्या कालावधीमुळे अगदी हिमालयातही तापमान कमी असते, परंतु सूर्यप्रकाश मिळण्याचा कालावधी अधिक असतो. भारताचे मोक्याचे आणि अक्षांशाचे स्थान याबाबतीत अतिशय फायदेशीर आहे. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे, वीज आणि इंधन यांचे दर सातत्याने वाढणार आहेत आणि त्यामुळे उर्जेचा पर्यायी व्यवहार्य उपाय करणे गरजेचे ठरणार आहे. आपल्या देशात, बहुतांश भागांमध्ये विद्युतीकरण झालेले नाही आणि वीज गायब होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे तिथे सौरऊर्जा हा पर्याय वरदान ठरणारा आहे.
(लेखक राकोल्ड थर्मो (प्रा.) लि.चे व्यवस्थापकीय संचालक)