या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

अनेकांना आपलं घर हे चित्रपटातल्यासारखं दिसावं असं वाटतं. चित्रपटातल्या सगळ्याच वास्तू काही चित्रातल्यासारख्या आकर्षक आणि मनमोहक नसतात. असं म्हणतात की, जेव्हा चित्रपट पाहत असताना आपण प्रेक्षागृहात आहोत याचं भान हरपून प्रेक्षक त्या चित्रपटातल्या भवतालाचाच एक भाग बनतात, तेव्हाच चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होऊ शकतो. हे होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात त्या त्यातल्या वास्तू आणि त्यांची अंतर्गत सजावट! काही इंग्रजी चित्रपट हे त्यात वापरल्या गेलेल्या घरांच्या अंतर्गत सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत आणि जेव्हा आपण या वास्तूंची अंतर्गत सजावट म्हणतो, तेव्हा त्यात रंगांचा महत्त्वाचा वाटा असतो.

अगदी पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीही चित्रपटांमध्ये जाणीवपूर्वक रंग आणि अंतर्गत सजावटीच्या माध्यमातून चित्रपटाला पोषक वातावरण तयार करायचे प्रयत्न होत असल्याचं १९६१ साली प्रदíशत झालेल्या ‘ब्रेकफास्ट अ‍ॅट टीफ्नीज्’ या चित्रपटातून दिसून येतं. काहीसं हिप्पी पद्धतीचं आयुष्य जगणाऱ्या होली गोलाइटली या उच्छृंखल मुलीचं घर दाखवताना बाथटबप्रमाणे असणारा सोफा आणि कोपऱ्यात ठेवलेल्या ब्रीफकेस यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे, तर आंब्याच्या पेटीप्रमाणे असलेलं सोफ्याच्या पुढय़ातलं कॉफी टेबल लाकडी दाखवलं आहे. (छायाचित्र १ अ) अमर्यादता म्हणजेच एका अर्थी ती जगत असलेलं अर्निबध आयुष्य दाखवण्यासाठी कोमर आणि मॉयर या चित्रपटाच्या नेपथ्यकारांनी आणि अँडरसन आणि परेरा या कला दिग्दर्शकांनी हा पांढरा रंग दाखवला आहे. पण तिचं एकंदर चारित्र्य पाहता तिच्या आयुष्यातला भडकपणा दाखवण्याकरिता तिच्या सोफ्यावरचा लालसर जांभळ्या बरगंडी रंगाच्या तक्क्यांचा वापर केलेला दिसून येतो. मात्र नंतरच्या काळात एका अतिश्रीमंत व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर तिच्यात झालेले बदल दाखवताना मात्र हे असलं तकलादू फíनचर जाऊन त्याची जागा उंची फíनचर घेत असतानाच त्यात अधिक रंगही भरलेले दिसतात.

गेल्या दहा वर्षांतल्या चित्रपटांचा विचार करायचा झाला, तर २००१ साली प्रदíशत झालेल्या ‘रॉयल टीनॅनबॉम्स’ या चित्रपटात पत्नी आणि तीन मुलांना वडील सोडून गेल्यानंतर त्या मुलांच्या आयुष्यात येणारी वादळं आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीतून ते कुटुंब कसं जातं, हे दाखवलं आहे. इथं आपण (छायाचित्र २ मध्ये) पाहू शकतो की, त्या कुटुंबातल्या मार्गोट टीनॅनबॉम्स या दत्तक घेतलेल्या मुलीच्या आयुष्यात येणारे धोके आणि पुढे जाऊन तिचा वाढणारा विक्षिप्तपणा हा गॅलरीच्या ज्या िभतीवर तिची पोर्टेट्स लावली आहेत, त्या िभतीच्या लाल रंगातून उद्धृत होतो. नेपथ्यकार कार्ल प्रॅग आणि कला दिग्दर्शक डेव्हिड वास्को यांनी लाल रंगाचा हा असा सूचक वापर केला आहे.

जांभळट लालसर रंगाची छटा ही मानसिक आंदोलनं दाखवणारी छटा आहे. त्यामुळे ‘अमेरिकन सायको’ या २००० साली प्रदíशत झालेल्या चित्रपटात त्या रंगाचा प्रतीकात्मक वापर पॅट्रिक बॅटमन या विकृत खुन्याच्या घरातली लििव्हग रूम दाखवण्यासाठी जेन डेव्हेल या नेपथ्यकाराने आणि अँड्य्रू स्टर्न या कला दिग्दर्शकाने केला आहे (छायाचित्र ३ पाहा).

प्रसिद्ध फॅशन डिझाईनर टॉम फोर्ड निर्मित आणि दिग्दíशत ‘अ सिंगल मॅन’ या २००९ सालच्या चित्रपटात नेपथ्यकार अ‍ॅमी वेल्स आणि कला दिग्दर्शक लॅन फिलिप्स यांनी जॉर्ज फाल्कोनर या पात्राची पत्नी निवर्तल्यामुळे त्याच्या मनाचा उदासपणा आणि खिन्नता दाखवताना निरस वाटणाऱ्या अशा स्थितप्रज्ञ रंगांचा वापर केला आहे. छायाचित्र ४ अ मध्ये आपल्याला दिसणाऱ्या बेडरूममध्ये प्रामुख्याने स्थितप्रज्ञ लाकडी रंगाचा वापर जास्त केलेला दिसून येतो. बेडच्या वरती अजून एका स्थितप्रज्ञ अशा तांब्याच्या धातूचं अमूर्त शिल्प त्याला अधिक उठाव आणतानाच नायकाच्या मन:स्थितीचं यथार्थ चित्रण घडवतं. त्यातच खोलीच्या एकाच बाजूला टेबल लॅम्पचा मंद प्रकाश तर नायक विचारात गर्क होऊन उभा असलेल्या ठिकाणी असलेला काळोख त्याच्या मनाची विषण्णता आणि मनावर आलेलं सावटच दर्शवतो. त्याच्या उलट त्याचा मित्र असलेल्या चार्लीस बाउडिर याच्या घरी मात्र परिस्थिती अगदी उलट असल्यामुळे तिथली खोली दाखवताना (छायाचित्र ४ ब) चांदीच्या उभ्या नक्षीदार खांबावरचे मोठाले दिवे आणि त्यात महिलेचा वावर असल्याच्या खुणा दाखवणाऱ्या गुलाबी रंगाचा वापर पडदे, टेबल क्लॉथ आणि पांढऱ्या शुभ्र फरच्या खुर्चीवर ठेवलेल्या टॉवेलसाठी करून, त्या घरातलं आनंदी आणि प्रसन्न वातावरण दाखवायचा प्रयत्न वेल्स आणि फिलिप्स यांनी केलेला आढळून येतो.

अशा प्रकारे चित्रपटातल्या कथानकांना अधिक उठाव आणण्याबरोबरच प्रेक्षकांना रुपेरी पडद्याबरोबर एकरूप व्हायला लावणारे नेपथ्यकार आणि कला दिग्दर्शक यांनी रंगांचा खुबीने पण विचारपूर्वक वापर करून घेतल्यामुळे यशस्वी चित्रपटांच्या यादीत त्यांचं नाव झळकण्यात या रंगांचा मोठा वाटा आहे.

(इंटिरियर डिझायनर)

anaokarm@yahoo.co.in

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Structure and colors in the film