देऊळ एका छोटय़ाशा कौलारू घरासारखं होतं. घरासारखं म्हणजे काय, घरंच होतं, ते मूळचं. ही पाठीमागे वाडी दिसते ना, त्यातलंच एक घर. नाना कदमांचं घर, रस्त्यालगत असलेलं. त्यांनी रामाच्या देवळासाठी राहत्या घराची जागा दिली आणि ते पाठीमागच्या एका नव्या घरात राहायला गेलेत.

आज दुपारी रोजच्यासारखं एक वाजता देऊळ बंद झालं. झालं म्हणजे.. नितीननेच देवळाचे कोलॅप्सिबल दरवाजे ओढून बंद केलेत आणि आतून कुलूप लावून घेतलं. रोज सकाळी पाच वाजल्यापासून उठून देवळाची साफसफाई करायची. भटजी पूजेला यायच्याआधी पूजेची तयारी करायची. मग हळूहळू उजाडल्यावर देवळात भक्तांची वर्दळ वाढली की त्यांना काय हवं नको ते बघायचं. शनिवार असला की तेलाच्या छोटय़ा छोटय़ा वाटय़ा भरून एका थाळीत हनुमानाच्या मूर्तीसमोरच्या टेबलावर रचून ठेवायच्या. शेजारच्या वाडीतला सहदेव रुईच्या पानांच्या माळा करून आणतो. त्याचा फुलांचा धंदा आहे. त्या माळा मोजून घ्यायच्या आणि तेलवाटय़ांच्या मागच्या भिंतीवरच्या खिळ्याला त्यातल्या मोजक्या माळा अडकवून ठेवायच्या. येणाऱ्या-जाणाऱ्यांना मग तेल-माळ द्यायची. त्यांच्याकडून आलेल्या पशांचा हिशोब ठेवायचा. मंगळवारी आणि गुरुवारीही गणपती आणि दत्तात्रेयाच्या भक्तांची अशीच वर्दळ, तर शुक्रवारी आजूबाजूच्या सिंधी आणि गुजराती भक्तमंडळींची आणि विशेषत: बायकांची माताजीच्या दर्शनासाठीची लगबग. असं हे सगळं सकाळपासूनच्या धावपळीचं चक्र दुपारी एक वाजता संपलं की, मग देवळाचे दरवाजे ओढून घेऊन त्याला कुलूप लावायचं. हा नित्यक्रम. थकल्या-भागल्यामुळे दुपारी देवळाचे कोलॅप्सिबल दरवाजे ओढून घेताना, कधी एकदा ते बंद करून जेवून घेऊन जमिनीवर चादर टाकून झोपतो असं झालेलं असायचं. त्यामुळे ते दरवाजे ओढून घेताना त्यात एक प्रकारचा जोर असायचा. पण आज मात्र दरवाजे ओढून घेताना नितीनचे हात अगदी जड झाले होते. कोलॅप्सिबल रोजचेच असले, तरी घासटून घासटून बंद करावे लागतायत असं वाटत होतं. सरकवत सरकवत दरवाजे एकदाचे बंद केलेत. कुलूप लावलं. आज जेवण आधीच झालं होतं. त्यामुळे सगळ्या देवांसमोरच्या दिव्यांमधल्या वाती मागे सारून ज्योती मंद तेवत ठेवल्या आणि मारुतीच्या मूर्तीसमोरच्या मोकळ्या जागेत रोजच्याप्रमाणे चादर टाकून दुपारच्या वामकुक्षीसाठी नितीन लवंडला खरा, पण त्याचा काही डोळा लागेना. आजची ही दुपारची झोप या देवळातली शेवटचीच झोप असणार होती. गेले बेचाळीस र्वष चाललेलं रोजचं चक्र आज थांबणार होतं. गेल्याच आठवडय़ात नितीन साठ वर्षांचा झाला. दोनच दिवसांपूर्वी जागा पुसताना तो जमिनीवर घसरून पडला, ही बातमी कोकणातल्या त्याच्या मुलाला- केदारला कळली. तसं फार लागलं नव्हतं. पण केदारने मात्र त्याला फोनवर ठणकावून सांगितलं, ‘‘बाबा बस्स आता. आजपर्यंत मी तुम्हाला गावाला घेऊन जायला इतक्या वेळा आलो, पण तुम्ही वेळोवेळी टाळलंत. आता मात्र मी तुमचं काहीही ऐकणार नाही. मी या वेळी तुम्हाला कायमचं गावाला घेऊनच येणार.’’ त्यामुळे आज संध्याकाळी केदार आला की, त्याच्याबरोबर जावंच लागणार होतं. त्यामुळे पडल्यापडल्या हे विचारांचं चक्र एकीकडे सुरू होतं, तर दुसरीकडे या देवळात चाळीस वर्षांपूर्वी अवघ्या विशीत सेवेकरी गुरव म्हणून आल्यापासून ते देवळातला सर्वाना एक हवाहवासा वाटणारा सख्ख्या भावासारखा आणि प्रत्येकाबरोबर घरोबा असलेला एक सदस्य बनण्यापर्यंतचा प्रवास डोळ्यांपुढून सरकत होता. मग झोप कशी येणार? नितीन गावाला निघणार म्हणून त्याच्या जागी नव्याने आलेला गणेश गुरव शेजारीच पडला होता. त्याने नितीनची ही तगमग बघून विचारलं, काय झोप लागत नाही? भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून सरकतोय. मी इथे कसा आलो ते मला आठवतंय. गणेशने सांगितलं, ‘‘मलाही सांगा.’’
नितीन सांगायला लागला. बारा-तेरा वर्षांचा होतो मी तेव्हा. आई अशिक्षित आणि वडिलांचंही शिक्षण फार नाही, चौथीपर्यंत. छोटासा जमिनीचा तुकडा आणि गावच्या देवळाबाहेर हाराचा ठेला. इतकीच जमेची बाजू. आई आमच्या आणि दुसऱ्यांच्या शेतावर राबायची आणि वडील फुलांच्या धंद्यातून वेळ मिळेल तेव्हा आईला शेतीच्या कामात मदत करायचे. त्यांचं स्वप्न होतं. मला आणि माझ्या धाकटय़ा भावाला खूप शिकवायचं आणि मोठं करायचं. म्हणजे जे हाल आणि कष्ट त्यांच्या वाटय़ाला आले, ते आमच्या वाटय़ाला यायला नकोत. गावच्या देवळाबाहेरचा फुलांचा धंदा तो! त्यात फार काही मिळत नव्हतं. पण अगदीच उपासमार होत नव्हती इतकंच. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. वडील कसल्याशा तापाने आजारी पडलेत. गावातले, तालुक्याच्या गावातले डॉक्टर झालेत, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी वडील गेलेच. अशिक्षित आईवर आम्हा दोघा भावंडांची जबाबदारी येऊन पडली. ती शेतीकडे लक्ष देणार की, फारशा न चालणाऱ्या फुलांच्या धंद्याकडे? शिवाय वडील असताना तिने त्यात कधी फार लक्ष घातलं नाही. त्यामुळे करता येत असलेलं शेतीचं काम सोडून फुलांचा धंदा करणं शक्यच नव्हतं. मी आठवीत आणि भाऊ सहावीत होता. मी चांगल्या मार्कानी पास होत होतो. पण पुढचं शिक्षण घेणं शक्य नव्हतं. भावाला किमान दहावीपर्यंत तरी शिकवायचं असं ठरवलं, पण त्याची जबाबदारी मलाच घ्यायची होती. मग मुंबई गाठायची ठरवलं. आमच्या गावातले जोशी भटजी मुंबईतल्या एका देवळात भटपण करायचे. त्यांनी विचारलं माझ्याबरोबर येणार, मुंबईला? जेवून-खाऊन महिना शंभर रुपये मिळतील. देवळाची साफसफाई, पूजेची तयारी आणि हाताकडे मदतीला राहायचं. बेचाळीस वर्षांपूर्वी ते शंभर रुपयेसुद्धा माझ्यासाठी खूप होते, कारण माझं जेवणखाण सुटणार होतं. माझा अंगावरचा कपडा सोडला, तर माझ्या गरजा काही फार नव्हत्या. घरचं आई सांभाळणार होती. मग भावाच्या शाळेचा खर्च माझ्या पगारातून भागणार होता. मी लगेच हो म्हटलं आणि जोशी भटजींबरोबर मुंबईला आलो.
तेव्हा हे देऊळ एका छोटय़ाशा कौलारू घरासारखं होतं. घरासारखं म्हणजे काय, घरंच होतं ते मूळचं. ही पाठीमागे वाडी दिसते ना, त्यातलंच एक घर. नाना कदमांचं घर, रस्त्यालगत असलेलं. त्यांनी रामाच्या देवळासाठी राहत्या घराची जागा दिली आणि ते पाठीमागच्या एका नव्या घरात राहायला गेलेत. घराची ही खोली पूर्व-पश्चिम दिशेत होती. खोलीच्या मागच्या म्हणजे पश्चिमेकडच्या िभतीला लागून अडीच फूट उंचीचा चौथरा बांधून घेतला होता. त्यावर राम, लक्ष्मण आणि सीतामाईच्या काळ्या पाषाणातल्या मूर्ती करून घेतल्या होत्या. राम-लक्ष्मणाने खांद्यावरचं धनुष्य डाव्या हाताने पकडलंय. उजव्या हाताने श्रीराम आशीर्वाद देतायत, तर उजव्या हातात पाठीवरच्या भात्यातले काही बाण लक्ष्मणाने धरले आहेत. सीतामाईही उजव्या हाताने आशीर्वाद देतायत, तर डावा हात खाली सोडला आहे. त्या तिघांचेही डोळे पांढऱ्या रंगाने रंगवले होते आणि बुबुळं काळीभोर होती. झीलई केलेल्या त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव आणि डोळ्यातलं दयाद्र्र कारुण्य यामुळे त्यांच्याकडे बघताक्षणीच बघणाऱ्याला आपल्याकडे कारुण्याने बघणारे ते देव आपल्या पाठीशी असल्याची खात्री वाटते. मी जोशी भटजींबरोबर पहिल्यांदाच या देवळात आलो, तेव्हा या देवांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आधार मला असल्याची माझी खात्रीच पटली. देवळात येईपर्यंत मनात असलेली धाकधूक एकदम नाहीशी झाली. जोशी भटजींची विरारला एक छोटी खोली होती. माझी राहायची व्यवस्था देवळातच झाली. माझ्या गावातल्या घरी शेणाने सारवलेली जमीन होती. इथे मात्र देवळात फरशा घातलेल्या होत्या आणि वर ताडपत्रीचं छप्पर. गावाहून येताना आईने एक घोंगडं आणि पांघरायला चादर दिली होती. दिवस सगळा देवळाच्या कामात जायचा,. पण रात्री देवळातली वर्दळ शांत होऊन शुकशुकाट झाला की, आईची खूप आठवण यायची. आईने दिलेल्या घोंगडय़ावर झोपलं की, तिच्या कुशीत झोपल्याचं समाधान मिळायचं. तेव्हा देवळाला आजच्यासारखे कोलॅप्सिबल दरवाजे नव्हते. समोरून देऊळ उघडंच होतं आणि तेही रस्त्यालगत. त्यामुळे सुरुवातीला एक-दोन दिवस खूप भीती वाटली. रात्रभर कोणी आलं तर.. म्हणून झोपच लागली नाही. मग नंतर विचार केला की, आपल्यासारखा कफल्लक माणूस, त्याला लुटून कोणाला काय मिळणार आणि देवळात तेव्हा आजच्यासारखे पेटीत बरेच पसे नसायचे आणि आजच्यासारखे देवाला दागिनेही केलेले नव्हते. त्यामुळे देव आणि मी दोघेही सुरक्षित. मग लुटणार तरी काय? अशा कफल्लक अवस्थेमध्ये नेहमी एक बरं असतं की, स्वत:पाशी काहीच नसल्यामुळे काही जायची भीतीच नसते. आपल्यापाशी असतो तो फक्त आपला जीव आणि अगदी कोणाच्या हल्ल्यात तो गेला तरी काय गमावणार? परिस्थिती खूप वाईट असली की, आयुष्य आणि मरण यात काहीच फरक नसतो. थोडक्यात, मनातली भीती गेली. मग आईच्या आठवणींमध्ये झोप लागली की, सकाळी आजूबाजूला असलेल्या झाडांवरच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यायची. मग झाली रोजच्या कामाला सुरुवात..
बघता बघता चार र्वष सरलीत. भाऊ दहावी झाला. माझ्या पगारात पन्नास रुपये वाढ झाली होती. पण आता मात्र त्याला पुढे शिकवणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. मुंबई ही देवासारखीच दयाळू आहे. ती सर्वाचं पोट भरते. कोणाला उपाशी ठेवत नाही. ही माझी श्रद्धा होती. म्हणून भावालाही मुंबईत आणलं. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यामुळे त्याला एका ऑफिसात शिपायाची नोकरी मिळाली. झोपायला मारुतीसमोरची हीच मोकळी जागा.
हळूहळू देवळातही खूप बदल होत गेले. नाना कदमांच्या घरचं कोणी उरलं नाही. तेव्हा देवळाची मालकी एका ट्रस्टकडे गेली. या ट्रस्टने बरेच बदल करायचं ठरवलं. या रामाच्या देवळात मुख्य देवळाच्या शेजारच्या मूळच्या अंगणात हनुमानाचं छोटं देऊळ डावीकडे बांधलं, तर उजवीकडे शंकराची िपडी, त्या शेजारी दत्त महाराजांची पांढऱ्या संगमरवरातली उभी मूर्ती, मागे सिंहावर आरूढ झालेल्या जगदंबेचं देऊळ अशी इतरही छोटी छोटी देवळं याच आवारात आलीत. मग त्या त्या देवांच्या जयंत्या, उत्सव, भजनं असे अनेक कार्यक्रम वर्षभर सुरू झालेत. ताडपत्रीचं छप्पर जाऊन काँक्रीटची स्लॅब असलेलं छप्पर आलं. त्यावर एक मजला चढवला गेला. माझ्या आणि भावाच्या पगारातही चांगलीच वाढ झाली होती. वरच्या मजल्यावर ट्रस्टने मला आणि भावाला एक खोली बांधून दिली. बाकी गच्ची मोकळीच ठेवली होती. त्यामुळे उत्सव असला, कोणी पाहुणे वगरे आले की, त्यांची गच्चीत झोपायची सोय व्हायची. आईला मुंबईला यायला सांगितलं, पण सगळं आयुष्य गावाकडे आणि शेतीवाडीत काढलेल्या तिची मुंबईत यायची तयारी नव्हती. ती म्हणायची, इकडे कामं करतेय म्हणून माझे हातपाय चालतायत. तिथे मुंबईत येऊन नुसता गोळा होऊन पडेन. मला या देवळात येऊन १७ र्वष होऊन गेली होती. मी तिशीचा झालो होतो. मी आणि भावाने थोडे थोडे करून पसे जमवले आणि गावाकडे थोडी शेतजमीन विकत घेतली. नारळ, फणस आणि आंब्याची कलमं लावलीत. हे सगळं आता आईला एकटीला सांभाळायला जमेना. आईने माझ्यामागे लग्न कर, लग्न कर म्हणून धोशा लावला आणि गावातल्याच एका मुलीबरोबर लग्नही ठरवून टाकलं. माझं लग्न झाल्यावर आईने मला गावालाच येऊन राहा म्हणून सांगितलं. पण मला ज्या देवाने आणि देवळाच्या ट्रस्टने इतकं दिलं, वर जागा बांधून दिली, त्यांना अशा तऱ्हेने, गरज सरो वैद्य मरो म्हणून सोडून गावाला निघून जाणं माझ्या मनाला पटत नव्हतं. हे देऊळ आणि देव माझ्या आयुष्यात आले नसते, तर वडील गेल्यावर बारा-तेरा वर्षांचा मी काय करणार होतो? त्यामुळे मी इथेच राहायचं ठरवलं आणि माझ्या बायकोला आईच्या मदतीसाठी गावच्या घरीच राहून शेतीवाडी आणि फळबागा सांभाळायला सांगितल्या. देवळात दर आठवडय़ाला लागणारे नारळ महागडय़ा भावाने विकत आणायला लागायचे. मग आमच्या घरचे नारळ खतपाण्याचा खर्च निघण्याइतपत दर घेऊन मीच स्वस्त दराने देवळाला द्यायला लागलो. पाऊस सुरू झाला की, पेरणीसाठी शेतीचे दोन महिने मीही गावाला जाऊन राहायला लागलो. तेवढीच बायकोला मदत. त्या काळात भाऊ सकाळी लवकर उठून पूजेची तयारी करून देवळाची साफसफाई करून नोकरीवर जायचा. जवळच राहणाऱ्या खोत काकांची कंपनी बंद पडली. ते तिकडे पॅकिंगचं काम करायचे. नोकरी गेल्यामुळे त्यांची बायको पुरीभाजी बनवून द्यायची आणि ते पुरीभाजीच्या पुडय़ा घेऊन देवळाबाहेरच्या दुकानांमध्ये विकायचे. एकदा ते देवळातही असेच पुरीभाजी विकायला आले होते. दुपारी बारा-साडेबाराची वेळ असेल. तळतळत्या उन्हातून आल्यामुळे एकदम चक्कर येऊन ते देवळात पडले. मग मी त्यांना सुचवलं की, मी गावाला जातो तेव्हा आणि इतर वेळीही देवळाचं काम वाढल्यामुळे मला मदतीला कोणी तरी हवंच आहे, तर तुम्हीही देवळात का येत नाहीत? मी ट्रस्टींशी बोललो आणि खोत काकांना देवळातच नोकरी मिळाली. मग मी गणेश चतुर्थीला आणि भाऊ नवरात्रात गावाला जायला लागलो. लग्नानंतर दोन वर्षांनी मला मुलगा झाला. तोच केदार आज मला न्यायला येणार आहे. मधल्या काळात भावाने मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला कारकुनाची नोकरी मिळाली. मग भावाचंही लग्न झालं. त्याला डी.एड. शिकलेली बायको मिळाली. ती प्रायमरी शाळेत शिकवते. त्या दोघांनी मिळून बाहेर मग एक खोली घेतली. मलाही ते बोलवत होते. पण मी देऊळ सोडून कुठे जाणार? मी इथेच राहिलो. आमच्या गावात गावच्या आमदाराने आधी इंग्लिश मीडियमची दहावीपर्यंतची शाळा सुरू केली आणि नंतर बारावीपर्यंतचं कॉलेजही सुरू केलं. माझ्या केदारला मी तिकडेच शिकवलं. नंतर दापोलीच्या कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चरची पदवी घेतली. आता कृषी खात्यामध्ये सहायक शास्त्रज्ञ या पदावर सरकारी नोकरीत आहे. त्याचंही लग्न झालंय. मला एक गोड नातूही आहे. माझी बायकोही मला म्हणते, सगळं आयुष्य मी गावाकडे एकटीने काढलं, आता उतारवयात तरी सोबतीला येऊन राहा. आई आता खूपच थकली आहे. हे देऊळ सोडून जायची माझी तयारी नव्हती. कारण आजचं माझं, माझ्या भावाचं आणि माझ्या मुलाचंही सगळं जे आयुष्य आहे, ते या देवळाने घडवलंय. आजचे सुखाचे दिवस मी या देवळामुळे बघतो आहे. पण दोन दिवसांपूर्वी मी पडलो आणि आता केदार ऐकायलाच तयार नाही.
हे सगळं ऐकल्यावर गणेश म्हणाला, नितीनकाका आता देवाकडे पाहायला, त्याचं सगळं करायला देवाने मला इकडे आणलं आहे. कदाचित त्याचीही इच्छा असेल की, तुमची आणि तुमच्या माणसांची आता कायमची भेट व्हावी. तुम्हीच म्हणता ना की देव दयाळू आहे. मग केवळ त्याची सेवा करून घेण्यासाठी तो तुम्हाला इकडे कसं ठेवेल? ज्याने आपलं उभं आयुष्य त्या देवासाठी वेचलं त्याला आयुष्याच्या संध्याकाळी तो देव त्याच्या माणसांपासून कसं तोडेल? तुम्ही निश्चिंतपणे गावाला जा. मी इथे, अगदी तुम्ही करत होतात, तसंच देवाचं सगळं करीन. काही काळजी करू नका. इतक्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. केदार आला होता. बोलता बोलता चार कधी वाजले ते कळलंच नाही. नितीन उठला. त्याने देवळाचे दरवाजे उघडले. वरच्या मजल्यावर बांधून ठेवलेली सामानाची बॅग तोपर्यंत केदार खाली घेऊन आला. भरल्या डोळ्यांनी नितीनने राम लक्ष्मण आणि सीतामाईसमोर साष्टांग नमस्कार करून निरोप घेतला आणि आयुष्यभराची साथ देणारं ते देऊळ सोडून केदारबरोबर गाडीत बसून तो निघून गेला..
anaokarm@yahoo.co.in

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
insurance scheme mango, cashew insurance,
विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय
Story img Loader