आपण बऱ्याचदा बोलताना म्हणतो की, आजकाल जग बदलत चाललंय. पूर्वी भावनेला अधिक महत्त्व होतं. माणसांमधली नाती अधिक तलम आणि हळूवार असायची, तर भावना तरल असायच्या. आज मात्र व्यावहारिकतेवर भर देऊन नाती जपण्याकडे अधिक कल दिसतो. म्हणूनच पूर्वीच्या पिढीतल्या माणसांना असं वाटतं की, आजच्या नात्यांमधला तलमपणा कमी होऊन घर्षण आणि खरखरीतपणा वाढत चाललाय. तर आजच्या पिढीतल्या तरुणांना असं वाटतं की, वरवरच्या तलमपणापेक्षा नात्यांमधली खोली आणि व्याप्ती ही अधिक महत्त्वाची आहे. रंगांच्या विश्वातही या बदलांचं प्रतििबब उमटताना दिसतं.
पूर्वी घरातल्या एखाद्या खोलीसाठी रंगछटा निवडताना त्या खोलीतल्या सर्वच भिंतींना एकचएक रंगछटा लावली जायची आणि हात लावून बघितलं, तर हे रंग हाताला त्यावेळच्या माणसांमधल्या नात्यांप्रमाणेच स्पर्शाला तलम जाणवायचे. आज बऱ्याच घरांमधून आपल्याला बठकीच्या खोलीतली एखादी भिंत ही इतर भिंतींपेक्षा वेगळी असलेली दिसते. हे वेगळेपण केवळ रंगछटेतच नसतं, तर ती वेगळ्या रंगातली भिंत खरखरीत टेश्चर पेंटमध्ये रंगवलेली असते. ‘टेश्चर’ अर्थात पोत म्हटला की, त्यामुळे त्याला एकप्रकारची त्रिमिती असते. म्हणजेच आजच्या काळात जसा नात्यांची खोली आणि व्याप्ती याचा वेध घेतला जातो, तसाच या भिंतीवरून फिरणारी आपली नजर या टेश्चर पेंटमधून रंगांची खोली आणि व्याप्ती याचा वेध घ्यायचा प्रयत्न करत असते. त्यातून दिसणारे किंवा जाणवणारे विविध आकार शोधायचा प्रयत्न होतो आणि इतर भिंतींच्या तुलनेत मग त्या टेश्चर पेंट असलेल्या विशिष्ट भिंतीकडे नजर खिळून राहते.
घराला रंग काढायचा म्हटलं की, मग चर्चा सुरू होते ती कुठल्या प्रकारचा रंग काढायचा याची! भिंतींसाठी डिस्टेंपर, प्लॅस्टिक पेंट, लस्टर पेंट आणि वेल्वेट टच अशी रंगांच्या प्रकाराची वेगवेगळी नावं आपल्याला रंग काढणारा काँट्रॅक्टर सांगतो. या सगळ्यातून काय निवडायचं याचा विचार करताना डिस्टेंपर सर्वात स्वस्त, प्लॅस्टिक किंवा लस्टर रंग हे किमतीच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे सारखेच, तर वेल्वेट टच थोडा महाग म्हणून मग आपण बऱ्याचदा प्लॅस्टिक किंवा लस्टर रंगांचा वापर करतो. यातले प्लॅस्टिक रंग हे थोडंसं गुळगुळीत असं ग्लॉसी फिनीश देतात, तर लस्टर रंग हे थोडंसं खरखरीत असं मॅट फिनीश देतात. टेश्चर पेंट हे या सर्वसाधारण रंगांपेक्षा दुप्पट ते तिप्पट महाग असतात. तसंच त्यांच्या खरखरीत किंवा ओबडधोबड पोतामुळे ते नवीन असताना जरी आकर्षक दिसत असले, तरी कालांतराने त्यात धूळ जमा व्हायला लागते आणि अशा पृष्ठभागावरच्या अत्यंत लहानलहान खळग्यांमधून जमा झालेली ही धूळ स्वच्छ करणंही जिकिरीचं होऊन बसतं. रंग लावण्याचं साधन म्हणून आपण बहुतेक वेळा ब्रशचाच वापर करतो आणि तोसुद्धा एका नेहमीच्याच पद्धतीने- म्हणजे ब्रशचे उभे आणि आडवे फटकारे आलटूनपालटून लावतो. पण या सगळ्यात जरा वेगळ्या पद्धतीने बदल केला तर भिंतींवर तयार होणारे जे पोत आहेत, त्यांच्या माध्यमातून साधेपणाबरोबरच कलात्मकताही जपता येते. त्याकरता फार मोठा खर्चही येत नाही. आपण वेगवेगळ्या वस्तूंचा वापर भिंत रंगवण्यासाठी साधन म्हणून करू शकतो. यापकी काही वस्तूंची उदाहरणे सोबतच्या छायचित्र (१) मध्ये दाखवली आहेत. त्यापकी पहिला प्रकार म्हणजे रंगांचे ब्रश! हा प्रकार आपण सर्रास वापरत असल्यामुळे तो आपल्या सर्वाच्याच परिचयाचा आहे.
मात्र, केवळ उभे-आडवे रंगाचे पट्टे लावण्याऐवजी जर ते कुठल्याही दिशेने लावले, तर नेहमीपेक्षा एक वेगळा पोत भिंतीवर असल्याचा आभास आपल्याला निर्माण करता येतो. छायाचित्र (२) पाहा. केवळ उभ्या दिशेतच रंगांच्या ब्रशचे फटकारे मारून तयार केला जाणारा पोत छायाचित्र (३) मध्ये दाखवला आहे. आणखी एका प्रकारात आपण कापडाचा वापर करून रंग काढू शकतो. रंगात बुडवलेल्या अगर रंग लावलेल्या कापडाचे ठसे आपण भिंतीवर उमटवले, तर कापडाचा पोत भिंतीवर उमटलेला दिसेल छायाचित्र (४) पाहा. फार मोठा काळ सरल्यावर भिंती जशा विटक्या रंगाच्या दिसतात तसा जर आपल्याला भिंतीला अँटिक लूक द्यायचा असेल, तर त्यासाठी भिंतीवर रंग लावून झाल्यावर भिंतीचा पृष्ठभाग हलक्या हाताने अधूनमधून वायरब्रशच्या सहाय्याने किंवा सँड पेपरच्या सहाय्याने घासावा. त्यामुळे छायाचित्र (५)मध्ये दाखवल्याप्रमाणे भिंतीचा पृष्ठभाग दिसेल. आपल्याला स्पंजचाही वापर करून भिंत रंगवता येते. छायाचित्र (६) पाहा- यामुळे सच्छिद्र अशा स्पंजचा जो एक वेगळा पोत असतो, तो आपल्याला भिंतीवर दिसतो. त्याने भिंतीला एक वेगळी शोभा येते. संपूर्ण भिंतीवर किंवा भिंतीच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा काही भागात आपण पेंटिंग काढूनही घेऊ शकतो. त्याच प्रकारे वारली चित्रकलेचा वापर करून रंगवलेला भितीचा एक भाग छायाचित्र (७)मध्ये दाखवला आहे.
अशा प्रकारे नेहमीच्या भिं रंगवण्याच्या पद्धतींपेक्षा वेगळी अशी एखादी पद्धत जर आपण वापरली, तर महागडय़ा टेश्चर पेंटचा वापर न करताही आपल्याला नेहमीच्या रंगांचा वापर करूनही टेश्चर पेंटप्रमाणे भिंतीला पोत असल्याचा आभास निर्माण करता येईल. शिवाय हा पोत जरी त्रिमितीत असल्यासारखा भासत असला, तरी अशा प्रकारे निर्माण केलेल्या टेश्चरवर जर हात फिरवू बघितला, तर त्याला खोली नसल्यामुळे नेहमीच्या रंगांप्रमाणेच तो हाताला गुळगुळीत लागेल. त्यामुळे अशा भिंतींवरची धूळही केवळ ओल्या काडाने सहज स्वच्छ करता येईल. आपलं घर हे इतरांपेक्षा वेगळं आणि सुंदर दिसेल आणि तसं ते नेहमी दिसावं हेच तर आपलं स्वप्न असतं. त्यामुळे ते स्वप्न सत्यातही उतरू शकेल आणि आपण आताच जाणून घेतल्याप्रमाणे अगदी साध्यासोप्या आणि नेहमीच्या वापरातल्या वस्तूंच्या सहाय्याने हे आपण करू शकत असल्यामुळे हा प्रकार खर्चीकही नाही. त्यामुळे जुन्यानव्याचा समतोल साधून कमी खर्चातही आपण भिंतींना असे विविध नावीन्यपूर्ण पोत असल्याचा आभास केवळ वेगवेगळ्या साधनांनी रंग काढून निर्माण करू शकतो.
मनोज अणावकर
(इंटिरियर डिझायनर)
anaokarm@yahoo.co.in