‘घर घेतले पण ते माझे झाले का?’ हे शीर्षक अनेकांना बुचकळ्यात पाडणारे वाटू शकेल; पण आपल्या मित्रमंडळींपैकी कुणी गेल्या वर्ष-दोन वर्षांत घराची खरेदी केली असेल आणि त्यांच्याशी आपला मनमोकळा संवाद झाला असेल; तर या विधानाची सत्यता पटण्यास अडचण येणार नाही. विशेषत: पुनर्विक्रीचे घर घेताना याचा प्रत्यय हमखास येतो. घर विकणारा काही ठळक कारणांनी घर विकत असतो. त्या घरापेक्षा मोठय़ा घरात जाणारा, काही आर्थिक अडचणींमुळे घर विकणारा, दुसऱ्या शहरात वा परदेशी स्थायिक होऊ पाहणारा अथवा भावंडांच्या सामायिक मालकीचे घर वाटणी मिळावी म्हणून विकून टाकणारे. आता या सगळ्यांना घर विकायची घाई असते व आपल्याला ते घर आवडले असल्याने आपण ते घेतले नाही तर दुसरा कुणी ते पटकावील अशी आपल्याला भीती असते. पण या परिस्थितीत सगळा व्यवहार अतिशय शांत डोक्याने करणे गरजेचे असते. त्यासाठी घर आपले होण्यासाठी नक्की काय करायला हवे, याची माहिती असणे गरजेचे आहे.
घर जेव्हा राहते असते तेव्हा केवळ चार भिंती व छप्पर नसते; तर वीज, टेलिफोन, गॅस जोडणी, सोसायटीचे शेअर्स, विविध सरकारी कार्यालयांत असलेली त्या घराची नोंदणी म्हणजे ते घर असते. ते सगळे विनासायास आपल्या नावावर होणे म्हणजे घर कायदेशीरपणे आपले होणे होय. या गोष्टी आपल्या नावावर होण्यासाठी मुळात त्या आपल्याला घर विकणाऱ्याच्या नावावर असायला हव्यात. तसेच नुसते घराच्या विक्रीचे करारपत्र करून या सगळ्या गोष्टी आपल्या नावावर होत नाहीत. त्यासाठी त्या त्या कार्यालयात आपणास जाऊन ते करून घ्यावे लागते. त्या त्या कार्यालयात गेल्यावर सगळ्यात आधी मागणी होते ती मूळ मालकाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची. बऱ्याचदा हे काम राहून गेलेले असते, कारण दोघेही घाईत असतो. आता त्या मूळ मालकाला गाठण्याची व त्याच्याकडून ते प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी आपली असते. काही वेळा तो दुसऱ्या शहरात अथवा देशात निघून गेलेला असतो व ते काम कायम तसेच राहते. कदाचित त्याने ज्याच्याकडून ते घर घेतले, त्यानेही ही जबाबदारी पार पाडलेली नसेल तर मग कायम पत्त्याचा पुरावा म्हणून देता येणारी महत्त्वाची कागदपत्रे कधीच मिळू शकत नाहीत. केवळ ना-हरकत प्रमाणपत्रावर समाधान न मानता या सगळ्या सेवांची बिले थकीत नाहीत ना याचीही खातरजमा आवश्यक आहे. कारण एकदा घर विकायचे ठरल्यावर कोणतीही बिले न भरण्याकडे विकणाऱ्यांचा कल असायची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्यालाच ती बिले भरण्याची वेळ येते. कारण त्याशिवाय ती खाती नाव बदलून देत नाहीत. प्रत्यक्ष करार करण्यापूर्वी सगळ्या खात्यांमधून आवश्यक ती माहिती काढून तिथे उपलब्ध असणारे हस्तांतरणाचे फॉर्म आणून ठेवावेत. करारावर सह्य़ा करतानाच आवश्यक असणाऱ्या सगळ्या हस्तांतरण पत्रांवर घर विकणाऱ्याच्या सह्य़ा घ्याव्यात. तसेच प्रत्येक सेवेचा विशिष्ट ग्राहक क्रमांक असतो तो क्रमांक आपल्या करारनाम्यात आवर्जून नमूद करावा व त्या सगळ्यांच्या झेरॉक्स प्रती करारनाम्याला जोडाव्यात.
एकदा किमतीचे गणित जमल्यावर घर खरेदीचा करार ही पहिली पायरी असते. करारातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मालमत्तेचे वर्णन म्हणजे विंग, मजला, क्रमांक, क्षेत्रफळ आणि मोबदला. आपण प्रत्यक्ष घेत असलेले घर, त्याचा देत असलेला मोबदला आणि त्याचे करारातील वर्णन याबाबत आपण अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या दोन गोष्टींच्या वर्णनातला अगदी शब्दन् शब्द तपासून घ्यावा. कारण करारातील वर्णनात काही गफलत झाली तर आपली मालकी निर्वेध राहात नाही. करारात काही किरकोळ चुका असतील तर चूक दुरुस्ती करता येते, मात्र त्याकरता करारात सहभागी सर्व लोकांना नव्याने चूक दुरुस्ती पत्र आणि त्याची नोंदणी करण्याचे सोपस्कार पार पाडावे लागतात. त्यात समजा आपल्याला घर विकणारी व्यक्ती अनुपलब्ध असली तर अधिक अडचणी निर्माण होतात. मालमत्तेचे वर्णन किंवा मोबदला यात गफलत झाल्यास चूक दुरुस्त करणे अशक्य होऊन बसते. परिणामी, आपल्याला परत पूर्ण मुद्रांक शुल्क भरून नव्याने करार आणि त्याची नोंदणी करावी लागते.
पुनर्विक्रीच्या घरांच्या खरेदीत हा धोका जास्त असतो. कारण आपल्याकडे निर्वेध मालकी येण्याकरता आपल्या आधी झालेले सगळे व्यवहार आणि करार बिनचूक असणे अत्यावश्यकच असते. त्याचकरता आपण घेत असलेल्या घराच्या आजतागायतच्या सगळ्या करारांची प्रत मिळविणे आणि तपासणे श्रेयस्कर ठरते. पूर्वीच्या एखाद्या करारात गंभीर चूक झालेली असेल आणि ती तशीच पुढे येत राहिली असेल, तर त्रास होण्याची शक्यता असते. आपण गृहकर्ज घेताना बँकेने केलेल्या तपासात अशा गंभीर चुका समोर आल्या तर काही वेळेस आपले कर्जदेखील नामंजूर होते.
असा हा परिपूर्ण करारनामा नोंदणी झाल्यावर त्याच्याही अनेक प्रती काढून ठेवाव्या. कारण प्रत्यक्ष हस्तांतरणाच्या वेळी प्रत्येक खात्यात विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यात असतात. अशा प्रकारे यथायोग्य काळजी घेतली गेल्यास घर पूर्णपणे आपल्या नावावर होण्यास शक्यतो काही अडचणी येत नाहीत.
tanmayketkar@gmail.com
कायद्याच्या चौकटीत : घर घेतले, पण ते माझे झाले का?
घर विकायचे ठरल्यावर कोणतीही बिले न भरण्याकडे विकणाऱ्यांचा कल असायची शक्यता नाकारता येत नाही.
Written by अॅड. तन्मय केतकर

First published on: 09-01-2016 at 00:59 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Things to note while buying a flat