शेतीच्या शोधाने मानवी जीवनाला स्थैर्य लाभले आणि माणूस एकाच जागी वस्ती करून राहायला लागला. एकाच ठिकाणी बऱ्याच कालावधीत वास्तव्य शक्य झाल्याने स्वत:साठी निवारा बनवायला सुरुवात झाली. बदलत्या काळानुसार निवाऱ्याचे स्वरूपदेखील बदलत गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या समाजजीवनात सदनिका, बंगले, रो-हाउसेस, इत्यादी घरांचे विविध प्रकार प्रचलित आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा हीच अशी गोष्ट आहे ज्याची वारंवार खरेदी केली जात नाही. सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदा किंवा दोनदाच घराची खरेदी करतो. यामुळेच घर-खरेदी हा आजही एखादा उत्सव असल्यासारखे आहे, घर खरेदी असली की त्या सबंध कुटुंबात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते.

याच उत्साह आणि आनंदावर विरजण पडू नये म्हणून घर खरेदी करताना डोळ्यात तेल घालून बारीकसारीक गोष्टींबाबत सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे. कोणतेही घर, त्यातही अधिकृत आणि कायदेशीर बांधकाम असलेले घर म्हटले की त्या बांधकामाची मंजुरी आणि मंजूर नकाशे हे त्या घराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात.

कोणत्याही इमारतीच्या बांधकामास परवानगी दिली जाते आणि बांधकाम नकाशे मंजूर करण्यात येतात, तेव्हा त्या परवानगी आणि मंजूर नकाशांमध्ये अगदी बारीकसारीक गोष्टींची उदा. मजल्यांची संख्या, जिने, उद्वाहन. मोकळी जागा, गच्ची, प्रत्येक मजल्यावरील बांधकामांचे मोजमाप, प्रत्येक सदनिकेचे मोजमाप, एवढेच काय प्रत्येक खोली, बाल्कनी, इत्यादींचेदेखील निश्चित मोजमाप नमूद केलेले असते. एकदा का बांधकाम परवानगी मिळाली आणि बांधकाम नकाशे मंजूर झाले की त्यातील मोजमापानुसारच काटेकोरपणे बांधकाम करणे हे विकासकाचे कर्तव्यच असते. परवानगी अथवा नकाशामध्ये बदल करायचा झाल्यास त्याकरता सक्षम कार्यालयाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. अशा पूर्वपरवानगीशिवाय केलेले बदल हे विनापरवाना म्हणजेच बेकायदेशीर असल्याने त्यांची अनधिकृत बांधकामात गणना होते.

सर्वसामान्यत: विकासक जेव्हा पहिल्यांदाच एखादी सदनिका विकत असतो तेव्हा परवानगी आणि मंजूर नकाशांचा भंग करायची शक्यता तुलनेने कमी असते. खरेदी केलेली सदनिका ताब्यात मिळाली की खरेदीदार त्यात राहायला सुरुवात करतो. जाणाऱ्या काळानुसार आणि त्या खरेदीदाराच्या गरजांनुसार खरेदीदार त्या सदनिकेत बाल्कनी किंवा ओपन टेरेसवर शेड घालणे, ग्रिल लावणे असे काही किरकोळ स्वरूपाचे, तर भिंत सरकवून खोल्यांचा आकार बदलणे, सदनिकेच्या बाहेरील मोकळी जागा किंवा टेरेस इत्यादींमध्ये बांधकाम करून खोलीचा आकार वाढविणे इत्यादी मोठय़ा स्वरूपाचे बदल करीत जातो.

बांधकाम परवानगी आणी मंजूर नकाशांनुसारच्या बांधकामात, पूर्वपरवानगीशिवाय बदल न करणे हे विकासकाप्रमाणेच प्रत्येक खरेदीदाराचेदेखील कर्तव्य असते. साहजिकच अशी पूर्वपरवानगी न घेता केलेले बदल हे नियमानुसार बेकायदेशीर असल्याने अनधिकृत बांधकाम या स्वरूपात मोडतात. प्रत्येक खरेदीदार जाणूनबुजून कायद्याचा भंग करण्याकरताच असे उल्लंघन करतो असे नव्हे, बरेचदा अज्ञानामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळेदेखील असे बदल करण्यात येतात. कारण काहीही जरी असले तरी असे बदल हे अनधिकृत आणि बेकायदेशीरच ठरतात.

म्हणूनच कोणतीही जागा बघायला जाताना आपण हे कायम लक्षात ठेवायला हवे. सर्वसाधारणत: नवीन जागा खरेदी करण्याच्या उत्साहात आपण कागदपत्रांपेक्षा प्रत्यक्ष जागा कशी आहे यालाच जास्त महत्त्व देतो. प्रत्यक्ष जागा बघून पसंत करताना आपण बरेचदा फक्त जागेवरच लक्ष केंद्रित करतो, प्रत्यक्ष जागा आणि त्याकरता मंजूर करण्यात आलेला नकाशा याचा पडताळा दरवेळेस घेतला जातोच असे नाही. प्रत्यक्ष जागा जर आवडली आणि घ्यायचे निश्चित झाले तर मग अशा कागदपत्रांकडे आणि नकाशांकडे दुर्लक्ष व्हायचा धोका अजूनच वाढतो.

समजा केवळ भौतिक स्वरूप पसंत पडल्याने एखादी जागा खरेदी करण्यात आली आणि त्या जागेत आधीच्या मालकाने भिंत सरकवून खोलीचा आकार बदलणे, बाहेरची जागा आत घेणे असे बेकायदेशीर बदल केले असल्यास नवीन मालक म्हणून त्या सगळ्याची जबाबदारी आपोआप आपल्यावरच येते. अशा अनधिकृत बांधकामाविरोधात दंड, वाढीव कर, न्यायालयीन कारवाई किंवा अगदी अनधिकृत बांधकाम तोडण्यापर्यंत कोणतीही कारवाई केव्हाही होऊ शकते. अशी कारवाई झाल्यास खरेदीदार आणि मालक म्हणून अंतिमत: आपल्यालाच नुकसान आणि भरुदड सोसावा लागतो.

हे टाळण्याकरता कधीही जागा खरेदीकरताना, जागा बघताना त्या जागेच्या मंजूर परवानगी आणि मंजूर नकाशाची मागणी करावी. प्रत्यक्ष जागा बघताना त्या जागेचा मंजूर नकाशाशी पडताळा घ्यावा. असा पडताळा घेतल्याने एखाद्या जागेत असे वाढीव अथवा अनधिकृत बांधकाम असल्याचे त्वरित लक्षात येईल. असे अनधिकृत बांधकाम असल्यास शक्यतो अशा जागा घेऊच नयेत. किंवा अगदी घ्यायच्याच झाल्या तर वाढीव अनधिकृत बांधकामावर केव्हाही कारवाई होऊ शकते याची खुणगाठ बांधून मगच घ्याव्यात. याबाबतीत प्रत्येक खरेदीदार सतर्क राहिल्यास फसवणूक आणि संभाव्य नुकसान सहज टाळता येणे शक्य आहे.

अ‍ॅड. तन्मय केतकर tanmayketkar@gmail.com

 

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tip for buying land for construction
Show comments