डॉ. शरद काळे

घरातील वातावरणात बाल्कनी किंवा गच्चीवरील बाग आनंद निर्माण करते. मन प्रसन्न ठेवते आणि आपला भाजीपाला काही प्रमाणात तरी निर्माण केल्याचा आनंद देते. पण या बागेची निगा राखणे तेवढेच महत्त्वाचे आहे. या बागेचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपल्या छोटय़ा छोटय़ा रोपांवर वाढणारे किडे आणि इतर सूक्ष्म जीव आणि कवके हे आहेत. एकदा या किडय़ांचा प्रादुर्भाव झाला की त्यांना रोखणे अवघड होऊन बसते. मग आपण सशाची शिकार करण्यासाठी तोफेचा वापर करतो! म्हणजे एखादा जरी किडा दिसला की हिटची बाटली सगळ्या बाल्कनीत स्प्रे करून टाकतो! त्याचे वातावरणात काय दुष्परिणाम होतात, घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीवर काय दुष्परिणाम होतात याचा आपण फारसा विचारदेखील करीत नाही. काही वेळेला किडय़ांनी त्रस्त होऊन बागच नको म्हणणारे लोकदेखील असतात. म्हणूनच आपल्या या छोटय़ाशा बागेतील नेहमी आढळणाऱ्या काही उपद्रवी कीटकांची माहिती आपण करून घेऊ आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील याची थोडी माहिती घेऊ.

सर्वात अधिक कीटकांना बळी पडणारी रोपे म्हणजे गुलाब, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, चिनी गुलाब, रातराणी, भेंडी, वांगी ही आहेत. मोगरा, इंडियन रबर, फर्न्‍स, पाम, मरांठा, शेवंती, झेंडू, जाई, जुई, काकडी, भोपळा, तोंडली, दोडकी, कारली, पालक, मेथी, कोिथबीर, कढीिलब, मनी प्लांट, क्रोटोंस, ओवा, गवती चहा या रोपांना तुलनेने किडय़ांपासून कमी त्रास होतो. अर्थात जर आपण रोपांची आणि झाडांची नीट निगा राखली नाही तर कोणतेही रोप रोगाला बळी पडू शकते. रोपांना जरुरीपेक्षा अधिक पाणी देणे, कुंडय़ांमधून जास्ती पाण्याचा निचरा नीट न होणे, सदैव बाल्कनी ओलसर राहणे, कुंडीच्या खाली स्वच्छता नसणे, कुंडीच्या खाली ताटली ठेवली असेल तर ती स्वच्छ न करणे, रोगट दिसणारे भाग तसेच राहू देणे.. अशा अनेक कारणांनी किडय़ांचा आणि इतर सूक्ष्म जीवांचा प्रादुर्भाव वाढतो; आणि एकदा का ते वाढायला सुरुवात झाली की मग ते फार लवकर नियंत्रणाच्या बाहेर जातात. मग त्याचा खूप त्रास होतोच, शिवाय बऱ्याच वेळेला रोपे फेकून देण्याची पाळी येते. पण जर आपण वेळेवर काळजी घेतली आणि साधेसोपे उपाय केले तर जालीम कीटकनाशकांच्या फंदात न पडता आपल्या बागेचे व्यवस्थित रक्षण करू शकतो. या कीटकांचे निरीक्षण करण्यासाठी घरात एक चांगले बहिर्वक्र िभग ठेवले तर आपल्या लहान मुलांना आपण योग्य त्या वेळी त्यांच्याबद्दल बरेच काही शिकवूदेखील शकतो.

मावा (एफिड्स)

टोमॅटो, गुलाब, मिरची, सिमला मिरची आणि वांगी यावर अगदी नेहमी आढळणारा उपद्रवी कीटक म्हणजे मावा. पेरू किंवा पेअर या फळांच्या आकाराचेपण अतिशय सूक्ष्म असे हे कीटक जेव्हा आपल्या रोपांवर हल्ला चढवितात तेव्हा ते कीटक आहेत असे लक्षातदेखील येत नाही. कीटक म्हणजे हालचाल करणारा प्राणी असे समीकरण आपल्या डोक्यात बसलेले असते. लोकरीसारखी किंवा कापसासारखी, पण पावडरी वाढ पुंजक्यांच्या स्वरूपात रोपांच्या पानावर दिसली तर मावा असण्याची दाट शक्यता असते. या पुंजक्यांच्या सभोवती पान चिकट झालेले दिसते. जर त्यातला एखादा पुंजका उचलून हाताने थोडा कुस्करला तर माव्यांची हालचाल दिसून येते. याच्या तोंडाकडच्या बाजूला दोन संदेशिका आणि मागच्या बाजूला दोन सूक्ष्म नलिका बाहेर आलेल्या दिसतील. फारशी धावपळ न करता हा मावा पानांमधील, तसेच कळ्या आणि फुलांमधील अन्नरस शोषून घेत असतो. हे मावे गट करून राहतात. त्यांच्या वाढीमुळे पाने विद्रूप दिसू लागतात. या माव्यांच्या उत्सर्जनात मधासारखा पदार्थ असतो. त्याला चिकटपणा असतो. त्यामुळे ते पानांवर चिकटून राहते. त्यावर कवके वाढू लागतात आणि रोप अधिकच रोगट होऊन पाने गळू लागतात. रोपांची वाढ खुंटते आणि कळ्या अकाली गळून पडतात. अशी रोपे किंवा चांगली वाढलेली झुडपे पाहता पाहता कोमेजून जातात.

हे मावे हिरव्या रंगाचे असतात. पण कधी कधी लाल, तपकिरी, निळ्या किंवा करडय़ा रंगाचे मावेदेखील आढळतात. यांना क्वचितच पंख असतात. ते पानांमध्ये इतके छान दडून बसतात, की अगदी सूक्ष्म निरीक्षण केले तरच ते तिथे आहेत असे समजते. म्हणून तुमच्या रोपांशी हितगुज करण्याचा मधून अधून तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी सूक्ष्मदर्शक भिंगाचा वापर करा. म्हणजे तुम्ही तुमचे रोप हलक्या हाताने कुरवाळत त्याचे निरीक्षण केले तर त्याचे आरोग्य सुधारेलच, नाही का? असे निरीक्षण तुम्हाला फक्त माव्याचीच नव्हे तर इतर उपद्रवी कीटकांचीसुद्धा माहिती देईल आणि ते असलेच आणि त्यावर उपाययोजना केली तर ते रोप निरोगी राहील आणि तुमची बागदेखील प्रसन्न राहील.

हे मावे अचानक कोठून येतात असा प्रश्न येतोच. काल रात्रीपर्यंत जे रोप किंवा कुंडीतील झाड उत्तम स्थितीत आणि निरोगी दिसत होते त्यावर अचानक हा हल्ला कुठून झाला असावा? हे मावे जेव्हा तुम्ही रोप खरेदी केले असेल तेव्हाच अंडय़ांच्या रूपात त्यावर असू शकतील. तसे असेल तर रोप घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्या अंडय़ांमधून सूक्ष्म अळ्या बाहेर येतात, त्यांचे कोष आणि नंतर कीटकांत रूपांतर व्हायला नैसर्गिकरीत्या काही अवधी लागतो. या अवस्था पूर्ण झाल्या की रोपावर मग याची सत्ता दिसू लागते! आणि आपल्याला वाटते की हा हल्ला अचानक झाला आहे. माव्यांचे जीवनचक्र फक्त आठ दिवसांचे असते. माव्यांचा आणखी एक स्रोत म्हणजे तुमच्या घरातील मुंग्या हा होय. मुंग्या आणि मावे यांचे सहजीवन वाचायला अतिशय मनोरंजक आहे.

मावा आणि मुंग्या यांचे सहजीवन

करोडो वर्षे मुंग्या शेतीचा व्यवसाय करीत आहेत आणि त्यांचे त्यात दोन हेतू आहेत. एक म्हणजे वनस्पती उत्पादन आणि दुसरा म्हणजे प्राणी संगोपन! माणसाने कृषीशास्त्रात जी प्रगती केली तिची सुरुवात फार तर दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी झाली होती. पण मुंग्या या क्षेत्रातील उस्ताद आहेत आणि त्यांना हा करोडो वर्षांच्या सहजीवनाचा आधार आहे. मुंग्या आपली वसाहत निर्माण करताना आपल्या आसपास मावा या कीटकांची वसाहत ज्या ठिकाणी असेल  त्या जागेची निवड प्राधान्याने करतात. शेतकरी आपली जनावरे जशी जिवापाड जपतो तशाच या मुंग्यादेखील माव्याला जपतात. मुंग्यांच्या संरक्षक कवचामुळे मावे निर्धोकपणे आपले जीवन जगत असतात.

त्या बदल्यात ते मुंग्यांना काय देतात? तर माव्याच्या शरीरातून मधाचे थेंब झिरपतात आणि मुंग्या ते शोषून घेतात. हे मधाचे थेंब पौष्टिक तर असतातच, शिवाय मुंग्यांना ते अतिशय आवडतात. जेव्हा मुंगीला ते मधाचे थेंब प्राशन करावेसे वाटतात तेव्हा ती माव्याच्या वसाहतीतील एखाद्या माव्याला आपल्या संदेशिकेने किंवा पुढील पायाने हळुवारपणे  स्पर्श करते.  हा चिरपरिचित स्पर्श झाला की मावा त्याच्या शरीरातील तो मधाचा थेंब स्रावाचा स्वरूपात काही विशिष्ट ग्रंथीमधून बाहेर सोडतो. माव्याने आपल्या संरक्षणासाठी मुंगीला दिलेला हा एक कर आहे असे समजायला हरकत नाही. ही करवसुली अव्याहतपणे विनातक्रार वर्षांनुवर्षे चालू आहे. हा मधाचा थेंब त्या माव्याच्या शरीरातून बाहेर पडला की मुंगी तो लगेच शोषून घेते आणि आपल्या वसाहतीत नेऊन तेथील रांजणात (!) साठवून ठेवते. प्रत्येक मुंगी ठरावीक वेळी हा कर गोळा करून आत साठवीत असल्यामुळे त्यांच्या वारुळातील हे अक्षयपात्र नेहमीच भरलेले राहते आणि वारुळातील सर्व मुंग्या गरजेप्रमाणे त्याचे सेवन करतात. माव्याने त्याच्या यजमान वनस्पतींचा रस शोषून त्यातील काही भाग तो मधाच्या थेंबाच्या स्वरूपात तो मुंगीला देतो. त्यात आवश्यक जीवनसत्त्व, प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ असतात.

मावा आणि मुंग्या एकमेकांशी रासायनिक भाषेत बोलतात हे ऐकून आश्चर्य वाटेल. एखादी माव्याची वसाहत हेरून आपल्या विशिष्ट गंध असलेल्या संप्रेरकाचे एक वलयच मुंग्या त्या वसाहतीभोवती निर्माण करतात. आपण आपल्या  घराला जसे कुंपण घालतो तसाच हा काहीसा प्रकार समजायला हरकत नाही. जर माव्यांवर कुठलेही संकट आले तर ते त्यांचे एक संप्रेरक हवेत सोडतात. मुंग्यांना जेव्हा त्यांच्या संप्रेरकाचा आणि माव्याच्या संप्रेरकाचा मिश्र वास येतो तेव्हा मुंग्यांना माव्याकडून आलेला हा ‘वाचवा, वाचवा’ संदेश लक्षात येतो. जर हा संदेश ऐकून काही कारणांनी मुंग्या वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत तर मावा त्या झाडापासून अलग होतो आणि युद्धभूमीवरून पळ काढतो. प्रत्येक माव्याच्या आणि प्रत्येक मुंगीच्या बाबतीत हेच घडते किंवा घडायला पाहिजे असे नसते. पण निसर्गात काही मुंग्या आणि काही मावे यांच्यामध्ये हे सहजीवन स्वीकारले गेले आहे एवढा महत्त्वाचा भाग आपण विसरायचा नाही. या सहजीवनातूनच हे मावे आपल्या बागेतील रोपांवर हल्ले करतात.

माव्यांचे नियंत्रण

या माव्यांच्या नियंत्रणासाठी जे उपाय करायचे ते असे आहेत.

रोगट झालेली रोपे पाण्याच्या फवारणीने प्रथम स्वच्छ धुऊन काढावीत. एखाद्या लहान बादलीत कोणत्याही हात धुण्याच्या साबणाचे द्रावण घ्यावे. साधारण ३ लिटर पाण्यात ५ ते १० ग्रॅम किंवा एक चमचा द्रावण स्वरूपात मिळणारा हात धुण्याचा साबण पुरेसा असतो. पाण्याने काळजीपूर्वक रोपांची पाने हलक्या हाताने, पण चोळून धुवावीत. शक्य असेल तर या बादलीत रोपाला किंवा आपल्या झाडाच्या फांद्यांना इजा न होईल अशा तऱ्हेने वाकवून त्या बादलीत बुडविली तर पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेला मावादेखील धुतला जाईल. या बादलीत खूप मावे जमा झालेले दिसतील! शिवाय या माव्यांची अंडी अतिशय सूक्ष्म असतात. नुसत्या डोळ्यांना ती दिसतदेखील नाहीत. ही अंडीदेखील धुतली जाऊन रोप त्या अंडय़ांपासून मुक्त होईल. साबणाच्या पाण्याने रोप धुतल्यानंतर स्वच्छ पाण्याने ते दोनदा परत धुवावे.

या स्वच्छ धुतलेल्या रोपांवर मग लसूण आणि काळी मिरी एकत्र वाटून वरील साबणाच्या पाण्यात ते ढवळून त्याचा फवारा हलक्या हाताने सर्व रोपांवर मारावा. या ठिकाणी साबण फक्त फेस होण्यासाठी आणि हे मिश्रण योग्य पद्धतीने पसरावे यासाठी असतो. साबणाऐवजी रिठय़ाची साले वापरली तरी चालतील.

आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीत मुंग्यांना प्रतिबंध करावा. म्हणजे माव्यांच्या त्रासाचा एक स्रोत कमी होईल! आपली रोपे मावामुक्त राहावीत म्हणून थोडक्यात महत्त्वाच्या मुद्दय़ांची आपण उजळणी करू यात.

पांढरी माशी (व्हाइट फ्लाय)

या अगदी छोटय़ा अशा पांढऱ्या रंगाच्या माशा असतात. ज्या रोपांवर त्यांचा हल्ला होतो त्या रोपापाशी जाऊन ते नुसते हलक्या हाताने जरी हलविले तरी एकदम शेकडोंच्या संख्येने या पांढऱ्या माशा आपल्या आसपास उडतात. कधी त्यातील एखादी नाकातही जाते आणि पटापट शिंका येतात. काही वेळात पुन्हा त्या रोपांवर जाऊन बसतात! या पांढऱ्या माशांचे जीवनचक्र ४ ते ६ आठवडय़ांचे असते. अंडी, कोष आणि कीटक अशा तीन अवस्था त्यांच्या जीवनचक्रात असतात. अळीची अवस्था अत्यंत कमी कालावधीची असते. या माशीच्या माद्या झाडांच्या पानाच्या खालच्या पृष्ठभागावर आपली अंडी घालतात. पानांचे सर्वात जास्त नुकसान या माशीच्या कोषावस्थेत होत असते. या माशादेखील पानांमधील आणि कळ्यांमधील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि अकाली गळूनदेखील जातात. जर या माशांना वेळीच नियंत्रणात आणले नाही तर रोप मरून जाते. या पांढऱ्या माशा नक्की कुठून येतात? तर एखादे नवीन रोप आणले तर त्याच्यावर या असण्याची शक्यता असते. यांची अंडी मातीत असतात. त्यामुळे तुमच्या रोपांसाठी नवीन माती आणली तर त्यातून या माशांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तुम्हाला फुलांची आवड असेल आणि तुम्ही बाजारातून गुलाब, झेंडू, शेवंती यांसारखी फुले आणीत असाल तर त्यातून या माशा तुमच्या घरात दाखल होण्याची शक्यता असते.

या माशांचे नियंत्रण करताना अंडी, कोष आणि माशा या तिन्ही अवस्थांचा पूर्ण नि:पात आपल्याला करावयाचा आहे आणि तोही कोणतेच संश्लेषित कीटनाशके न वापरता हे शक्य आहे आणि सोपेदेखील आहे. ज्या रोपांची पाने या माशांच्या नियंत्रणात आहेत अशी रोपे हात धुण्याच्या साबणाच्या पाण्याने धुऊन घ्यावीत. म्हणजे जास्तीत जास्त अंडी आणि कोष आपल्याला नष्ट करता येतील. नंतर या धुतलेल्या रोपांवर वर सांगितलेल्या कडुिलबाच्या तेलाचा फवारा मारावा. हा फवारा मारताच प्रौढावस्थेतील माशा उडून इतर रोपांवर बसतात आणि फवाऱ्यांमधील परिणाम निघून गेला की पुन्हा मूळ रोपांवर येऊन प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करतात. पांढऱ्या माशा पकडण्यासाठी छोटय़ा व्हॅक्यूम क्लीनरचा तुम्ही उपयोग करू शकता. पण हा उपयोग करताना खूप सावधगिरीने आणि वनस्पतीला कोणती इजा होणार नाही अशा तऱ्हेने तो वापरावा लागेल. थोडय़ाशा अभ्यासाने हा मार्ग यशस्वी होतो आणि माशा कायमस्वरूपी नष्ट होतात. यासाठी कारचा व्हॅक्यूम क्लीनर अधिक फायदेशीर ठरेल. पांढरी माशी परत येऊ नये म्हणून जे प्रतिबंधक उपाय करायचे ते वर माव्यासाठी करायला लागणाऱ्या उपायांसारखेच आहेत.

पिठय़ा कीटक (मिलिबग)

मावा आणि पांढरी माशी यांसारख्या कीटकांसारखा हा पिठय़ा कीटकदेखील काल नव्हता आणि आज कुठून आला अशा पद्धतीने आपल्या घरातील बागेत अवतरतो आणि सर्व रोपांचे नुकसान करण्याचा विडा उचलतो. इतर कीटकांसारखाच हाही जीवनचक्राच्या अंडी, अळी, कोष आणि प्रौढ अशा चार अवस्था असलेला कीटक आहे. पिठासारखा दिसणारा हा कीटक असतो. पानांवर जणू पीठ पसरले आहे असे वाटावे अशी त्याची वाढ पानाच्या पृष्ठभागावर होते. पहिल्या दृष्टिक्षेपात ही पिठासारखी झालेली वाढ कीटकासारखी न वाटता कवक किंवा बुरशी आल्यासारखी वाटते. एकदम छोटा असलेला कीडा सूक्ष्मदर्शक भिंग वापरून आपल्याला दिसू शकतो. नवीन रोपांबरोबर हा येऊ शकतो. मातीतून याचे आगमन होऊ शकते. बाहेरच्या फुलांमधून हा घरातीळ बागेत शिरू शकतो आणि माव्यांप्रमाणेच मुंग्यांच्या मार्फतदेखील तो आपल्या बागेत दाखल होऊ शकतो. ज्या कुंडय़ांमधील रोपे या मिलिबगमुळे प्रभावित झाली आहेत त्यांची पाने हात धुण्याच्या साबणाचे पाणी वापरून धुऊन काढावीत किंवा कापसाच्या बोळ्याने स्वच्छ करावीत. कडुिलबाच्या तेलाचा फवारा मारावा.

स्केल्स आणि स्पायडर (कोळी) कीटक आपल्याकडे फारसे नसतात. पण असले तरी आपण त्यांचे नियंत्रण कीटकनाशकांशिवाय करू शकतो. आपल्याला आपल्या घरातील भाजीपाला पिकविण्यासाठी रासायनिक खतांची आणि कीटकनाशकांची गरज नसते. एकदा अंगवळणी पडले की सारे काही सोपे होऊन जाते. अंगवळणी पडणे अवघड असते, हे मात्र खरे!

मावामुक्त रोपांसाठी..

* तुमच्या बागेतील रोपांची दर आठवडय़ाला काळजीपूर्वक तपासणी करा. त्यासाठी सूक्ष्मदर्शक िभगाचा वापर केला तर ते अधिक फायदेशीर ठरेल.

* जेव्हा बागेत एखादे नवीन रोप घेऊन याल त्या वेळी त्याला तीन-चार दिवस तरी शक्यतो इतर कुंडय़ांपासून जेवढे दूर ठेवता येणे शक्य आहे तेवढे दूर ठेवा. घरी आल्यानंतर त्याला सकाळ संध्याकाळ स्वच्छ अंघोळ घाला. जरूर वाटेल तेव्हा हात धुण्याच्या साबणाचा उपयोग करा. धुण्याचा साबण वापरू नका. जर हात धुण्याचा साबण वापरला तर त्याचा अंश रोपांवर राहणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी साबण वापरून झाल्यावर स्वच्छ पाण्याने रोपे पुन्हा धुऊन ठेवा. काही रोपांना साबण त्यांच्या पानांवर उरला तर ते त्यांना आवडत नाही!

* १० ते १५ मिलीलिटर (दोन चमचे) कडुिलबाचे तेल १ लिटर पाण्यात मिसळून त्यांचे एकसंध द्रावण बनविण्यासाठी त्यात ५ ते १० ग्रॅम साबण किंवा एक चमचा द्रवरूप साबण घाला. हे मिश्रण महिन्यातून एकदा सर्व कुंडय़ांवर फवारा. पावसाळा संपत आला की माव्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्या वेळी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

* कुंडय़ांच्या खाली आणि आसपासचा परिसर अगदी स्वच्छ ठेवा. रोपांना अधिक पाणी घालू नका. अधिक पाण्याने रोपे पटापट वाढतात हा गैरसमज आहे. शक्यतो ठिबकसिंचन वापरण्याचा प्रयत्न करा.

* घर मुंगीमुक्त ठेवणे गरजेचे आहे.

भाजीपाल्याला आणि फुलांच्या रोपांना लागणारी कीड

* भाजीच्या रोपांची पाने आणि इतर भाग म्हणजे फुले, कोवळ्या फांद्या आणि शेंगा, किंवा भाजीचा आपल्याला उपयोगी असणारा भाग खाणारी कीड

* रोपांमधील रस शोषून घेणारी कीड

* कुंडीतील मातीत राहून मुळांवर आणि वनस्पतींच्या इतर भूमिगत भागांवर उपजीविका करून त्यांचे नुकसान करणारी कीड

* घरातील बागेला सतावणाऱ्या किडींमध्ये ज्या कीटकांचा समावेश होतो त्यात मावा (एफिड्स), पांढरी माशी (व्हाइट फ्लाय), पिठय़ा कीटक (मिलीबग), कोळी माइट्स (स्पायडर माइट्स), कवच कीटक (स्केल्स) यांचा समावेश होतो.

sharadkale@gmail.com

लेखक भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आणि सिम्बायोसिस कचरा स्रोत व्यवस्थापन केंद्र येथे प्राध्यापक आहेत.