प्राची पाठक prachi333@hotmail.com
भाग १
आजकाल लोक बऱ्यापैकी प्रवास करू लागले आहेत. खास ठरवून कुठेतरी फिरायला जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अगदी महिनोन्महिने आधी सुट्टीचे नियोजन करून ठेवलेले असते. तिकडे जाऊन काय काय बघायचे, कोणकोणते खाद्य पदार्थ चाखायचे याची मोठी यादीच तयार असते. तिथे आधीच जाऊन आलेले लोक आणखीन वेगळे काही सुचवत असतात. गुगल हाताशी असते. हटके काहीतरी बघायची लोकांची इच्छा असते. प्रवासाला गेल्यावर खरेदी करायची आवड असलेले काही जण असतात. तर ‘‘आजकाल सगळे सगळीकडे मिळते, काही खरेदी करू नका. फिरण्यासाठी फिरा,’’ असे आवर्जून सांगणारे काही मोजके लोक असतात.
या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या, बॅगा लागतातच. त्यात महागडे कॅमेरे घेऊन फिरायचे असते. त्यासाठी वेगळी खास बॅग असते. पण ती छोटी बॅगसुद्धा एका मोठय़ा बॅगेत आधी बसवून नंतरच बाहेर काढायची असते. मोजक्या आणि नेमक्या सामानात प्रवास कसा करावा, याचे खरे तर क्लासेसच घेतले पाहिजेत या देशात. अनेक जण खूपच अनावश्यक गोष्टी ‘लागतील प्रवासात’ या बिरुदाखाली सोबत घेऊन ठेवतात. बाहेरच्या कपडय़ांचे, आतल्या कपडय़ांचे, रात्री झोपायच्या कपडय़ांचे किती सेट्स असावे, याचा नेमका आणि प्रॅक्टिकल विचार आपण जिथे आणि जसे जातोय त्या सोयी-सुविधांचा विचार करून होतोच, असे नाही. बाकीही बऱ्याच गोष्टी प्रवासात लागणार असतात. त्यात अलीकडे वेगवेगळे चार्जर्स आणि त्यांची विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं यांचीही मोठी भर पडलेली असते. ते जपून नेणे आले. त्यासाठी वेगळे पाऊच आले. ते जास्त जागा व्यापतात, आपल्या मुख्य बॅगेत. असे सगळे प्रकार घरोघरी अनुभवायला मिळतात. त्यात खाण्यापिण्याचे पदार्थ घ्यायचे की नाही, घेतले तर किती आणि कशात असे शेकडो प्रश्न असतात. रोज लागणारी औषधं, क्रीम्स असू शकतात कोणाच्या. मनोरंजनाची काही साधनं जवळ ठेवलेली असतात. फिरायला गेल्यावरसुद्धा काही फंक्शन ठरलेले असते. त्यासाठी ठेवणीतले कपडे न्यायचे असतात. त्यांची उत्सवार आणखीनच वेगळी. कोणाला गिफ्ट्स घेऊन जायचे असतात आणि कोणी दिलेल्या गिफ्ट्स, माहितीपत्रके हे नव्याने आपल्या बॅगेत सामावले जाणार असतात. त्यांना थोडी मोकळी जागा ठेवावी लागते. पादत्राणंसुद्धा वेगवेगळी हवी असतात सोबत. ती स्वच्छ धुतलेल्या ड्रेससोबत तशीच ठेवायची नसतात. त्यांना वेगळे ठेवायचे असते. अशा कितीतरी गोष्टी एकेका प्रवासासाठी लागत असतात.
इतके सगळे सामान एकत्र मांडून ठेवल्यावर ते भरायचे कशात, यासाठी आपल्या मनातली भरी जागी होते. आधी वाटत असते, आहे ना ती बॅग चांगली. अरे, किती बॅगा पडल्या आहेत घरात. बसून जाईल त्यात सगळे सामान. असा तुफानी आत्मविश्वास असलेले आपण प्रत्यक्ष त्या बॅगा माळ्यावरून, घरातल्या कुठल्याशा कोपऱ्यातल्या खबदाडातून अनेक दिवसांनी काढतो तेव्हा सगळी हवाच निघून गेलेली असते आपल्या आत्मविश्वासातली. त्या मळकट, कळकट, चेन न लागणाऱ्या अथवा चेन तुटलेल्या, बंद तुटलेल्या बॅगा बघून हैराण होऊन जातो आपण. किती पैसे खर्च केले होते या बॅगवर. मागच्या एका प्रवासातच हालत पाहा कशी झाली हिची, असे खेदाने म्हणत असतो मग. दुसऱ्या बॅगा शोधून बघतो. एकतर आहे त्यात कसेबसे भागवणे, कोणाचे तरी काहीतरी तात्पुरते मागून आणणे, नाहीतर सरळ नवीन वस्तू घरात नव्याने विकत आणून ठेवणे असेच पर्याय मग आपल्यापुढे शिल्लक असतात. असे केल्याने आधीची कमअस्सल गोष्ट घरात साचून राहतेच, पण नव्याने आणखीन काही गोष्टी वेगवेगळ्या कारणांनी घरात येऊन पडतात. काही ट्रॅव्हल कंपन्या बॅगाही गिफ्ट देतात. मग आपण ती नवीच बॅग वापरतो. जुन्या बॅगा, पिशव्या अडगळीच्या साठय़ात आणखीन मागे मागे चालल्या जातात. एकच प्रवास झाल्यावर या नव्यासुद्धा माळ्यावर फेकल्या जातात. आपल्या मनात फक्त ‘खूप बॅगा आहेत की घरात पडलेल्या’, इतकाच डेटा कोरून पडलेला असतो. प्रत्यक्ष त्यातले एकही सामान चटकन घेतले आणि जसेच्या तसे वापरले या दर्जाचे उरत नाही. आपण पुन्हा नव्याने नवी खरेदी करत राहतो. प्रवास संपला की वस्तू पुन्हा वाढत जातात. पुढच्या प्रवासापर्यंत हाताशी काहीच राहत नाही. घरात देखभालीअभावी साचत जाणाऱ्या वस्तूंचे संमेलन तर भरतेच, पण ऐन वेळची धावाधाव काही चुकत नाही.
कसे करायचे या प्रवासी बॅगांचे नियोजन? कशा जपायच्या त्या हर एक प्रवासानंतर? घरात कमीत कमी अडगळ कशी साचू द्यायची? कमीत कमी, पण नेमक्या सामानात प्रवास कसा होईल, आपल्याला उचलायला, जवळ बाळगायला काय हलकेफुलके असेल आणि घरात येऊन पडणाऱ्या हा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा आणि पाऊचचा पसारा आटोक्यात ठेवणार तरी कसा, हे जाणून घेऊ पुढील भागात. तोवर माळ्यावर फेरफटका तरी मारून येऊ. काय काय कोंबलं आहे तिथे, जे आपली वाट पाहात पडून आहे, ते बघून ठेवू.