मालिकांमधील वास्तू या कधी खरी घरं, तर कधी सेट असतात. मग ती मोठी हवेली असो, दहा-बाय-दहाची चाळ असो वा प्रशस्त बंगला असो.. या वास्तू आभासी असल्या तरी दिग्दर्शक, कला दिग्दर्शक यांच्या तपशीलवार मांडणीमुळे वास्तव घराचं रूप धारण करतात; आणि मालिकेतील पात्रांबरोबरच प्रेक्षकांच्या मनात घर करतात. याच घरांविषयीचं मासिक सदर..
अनेक दिवस मराठी मनावर गारूड केलेली, उत्सुकता वाढवणारी आणि नंतर नंतर नेटवर ‘कोटय़धीश’ झालेली (विनोद-विषय झालेली) श्री-जान्हवीची जोडी आज निरोप घेते आहे. सुरुवातीला ओळख होणं, मनं जुळणं, प्रेमाची जाणीव आणि त्याची कबुली देणं या प्रेमकथेने सर्वाना आपलंसं केलं. त्यांचा सौम्य प्रणय मराठी मनाला लोभसवाणा वाटत होता; पण नंतर ‘संघर्षांशिवाय गंमत नाही’ या समजुतीमुळे ‘अनिल आपटे’, ‘शशिकला बाईं’नी आपली कामं चोख करून प्रेक्षकांची हृदयं खाली-वर करत ठेवली; पण शीर्षक- ‘होणार सून मी या घरची’ असल्यामुळे लग्न होणार आणि जान्हवी ६-६ सास्वांना आपलंसं करणार हे कळून चुकलं होतं; पण ‘अनिल-शशिकला’ युतीच्या कारवायांमुळे हे कसं साध्य होणार ही उत्सुकता नेहमीच राहिली. मध्यंतरी डिव्होर्स प्रकरणामुळे गाडं थोडंसं घसरलं होतं.
‘श्री’सारखा लोभस मुलगा असावा, अशी तमाम स्त्री-वर्गाची भावना झालेली. आज्ञाधारक, पण स्वत:ची मतं असलेला, सरू मावशीचं लग्न जमवताना तिचा बाप बनलेला, जान्हवीच्या बाबतीत तर ‘आई’, ‘सखा’, पाठीराखा झालेला, ‘आई-आजी’कडे विद्यार्थी बनून काही विचारणारा, तर कधी तिचा समवयस्क बनून तिच्याशी चर्चा करणारा, कधी तेल लावण्याच्या बहाण्याने मनातले सल-कुसळ काढून घेणारा नातू, तर कधी समोरच्यांच्या मनातलं किल्मिष हळुवार फुंकर घालून काढून त्याला योग्य मार्गावर आणणारा, आपल्या सर्वच जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव असणारा, एका मोठय़ा उद्योगाचा मालक म्हणून, एक पर्यावरणप्रेमी नागरिक म्हणून, योग्य वेळी कठोरपणे निर्णय घेणारा मुलगा कोणाला आवडणार नाही? तो उंचापुरा, तगडा, देखणा, १०-१० जणांना लोळवणारा नाही, पण यामुळेच ‘देवलोकातून’ अवतरलेला न वाटता या मातीतलाच वाटला.
हळवी, संवेदनशील ‘आई’, दुसऱ्याचं तेच वाक्य उचलणारी ‘मोठी आई’, भाबडी ‘धाकटी आई’, देवदेव करणारी ‘सरूमावशी’, रागीट, संतापी पण शिस्तबद्ध ‘बेबी आत्या’ -सर्व डोलारा खंबीरपणे सांभाळून, सुनांच्या योग्य बाजूने ठाम उभी राहून आधार देणारी, अनेक समस्यांतून शांतचित्ताने मार्ग काढणारी ‘आई आजी’, कावेबाज, कारस्थानी, लोभी ‘शशिकला’, शांत, तत्त्वनिष्ठ, संयमी ‘बाबा’, सावत्रभाऊ असूनही जान्हवीवर मनापासून प्रेम करणारा, तिला मानणारा ‘रोहन (पिंटय़ा)’, मित्र-मैत्रिणीचे नाते उत्तम निभावणारे ‘गीता-मनीष’ अशा या विविध व्यक्तिरेखा आणि त्यांचा जाणता अभिनय याबरोबरीनेच यात मोठा वाटा होता त्यातल्या वास्तूंचा.
जान्हवीच्या माहेरचं चाळीतलं घर निम्नमध्यमवर्गीयांच्या परिस्थितीचं दर्शन घडवत होतं. उडून गेलेला रंग, पोपडे आलेल्या भिंती, बाहेरच्या खोलीत एक पलंग, त्यावर मळखाऊ रंगाची चादर, एका बाजूला साधासुधा टी.व्ही., त्याखाली रद्दी पेपर्स, एका भिंतीला एक मोठेसे टेबल नाना उपयोगाचे, एकीकडे थोडीशी पुस्तकं, एका कोपऱ्यात भिंतीवर छोटासा देव्हारा, विशेष अवडंबर नसलेला, पण सुख-दु:खाच्या क्षणी सर्वच जण तिथे उभं राहून नमस्कार करणार, आत स्वयंपाकखोली, जरा कळकट, थोडी अस्ताव्यस्त, सिंकमध्ये भांडय़ांचा पसारा; पण जान्हवी आणि हो, अगदी पिंटय़ा आणि बाबासुद्धा ‘भांडी घासणं’, स्वयंपाक करणं, आवरणं करतात. ‘कलाबाईंची’ कंबर कामाच्या वेळी नेहमीच ‘धरलेली’ असते. बाबांचा मुक्काम सहसा कॉटवर. यांच्या जागा २-३ वेळा बदलल्या. सध्याची खोली मात्र थोडी मोकळी, सामानही कमी, उजळ रंगाचे पडदे अशी आहे. शिवाय व्यवस्थित आणि टापटिपीचीही आहे.
जान्हवीचं सासरचं घर ‘गोकुळ’ एक मोठा एकमजली बंगला आहे. मुलाबाळांनी, सुना-जावयांनी हे घर गजबजलेलं असावं, असा उद्देश ‘गोकुळ’ नाव ठेवताना असावा, पण एक मुलगा परदेशी, दुसऱ्या मुलगा दारू पिऊन बायकोला मारहाण करतो म्हणून आजींनी घराबाहेर काढलेलं, एक मुलगा- नातू अपघातात गेलेले, मुलगी माहेरी परत आलेली, तर सरू मावशीचं लग्न झालेलं नाही. अशा काहीच रुजून न आलेल्या घराची फुलबाग बनवण्याचा चंग श्री-जान्हवी बांधतात आणि ते साध्यही करतात.
अशा या ‘गोकुळ’ची पहिलीच खोली खूपच प्रशस्त आहे. तिच्या एका भागात ‘किचन’ छोटय़ाशा जागेत अगदी परिपूर्ण. अगदी नक्षी काढलेलं सूपसुद्धा! लांबलचक एल शेप ओटा, जिथे दोघीतिघी सहज वावरू शकतात. पूर्णपणे उघडं, पारदर्शक. तिथून सरळ डायनिंग टेबलवर सहज वाढप करता येण्यासारखं. टेबलावर पाण्याची लखलखीत तांब्याची भांडी; दिवाणखाना अगदी २०-२५ जणं वावरू शकतील इतका मोठा. त्यामुळे सर्व सणसमारंभ, जान्हवीचं डोहाळजेवण, इतकंच नव्हे तर ‘सरू मावशी’चं लग्नही तिथेच सहज होतं. हॉलच्या एका बाजूला प्रवेशद्वार आहे आणि दुसऱ्या बाजूला देवघराकडे जाण्याचा रस्ता, देवघरही खूप मोठे, डायनिंग टेबलाच्या बाजूने वर जाणारा जिना, वर सगळ्यांच्या बेडरूम्स, प्रत्येकीच्या वृत्तीनुसार त्या खोल्यांची सजावट. उदा. ‘बेबी आत्या’च्या खोलीला चांगले झुळझुळीत उजळ रंगाचे दुहेरी संगतीचे पडदे, तर ‘मोठय़ा आई’च्या खोलीत शिलाई मशीन. जिन्यावर आणि काही खोल्यांतून पूर्वजांच्या मोठाल्या फोटो फ्रेम्स. त्यामुळे पिढीतला फरक समजून येतो. ‘आई-आजी’च्या खोलीत झुलती आरामखुर्ची आणि मागच्या पिढीचे प्रतीक असलेला पितळी कर्णावाला ग्रामोफोन.
श्री-जान्हवीची खोली एका आनंदी जोडप्याला साजेशी. दोन अलमाऱ्या, डबलबेड, भिंतीवर त्या दोघांचा प्रसन्न हसणारा मोठा फोटो. याच खोलीत त्या दोघांच्या प्रेमाचे क्षण, कधी त्यांनी पाहिलेली स्वप्ने, कधी इतरांच्या भल्यासाठी केलेल्या उपाययोजना या छोटय़ाशा खोलीतच घडले आहे.
शिवाय जान्हवीची बँक, गोखले गृहउद्योगाचं ऑफिस, विघ्नेश्वराचं देऊळ आणि देवळाच्या आवारातला थोरल्या वृक्षाचा पार, कॉफी हाऊस इथेही बरेच प्रसंग घडले आहेत. अशा या वास्तूंइतकंच ‘बसस्टॉप’ या फक्त छत आणि कठडय़ाच्या स्थळालाही या मालिकेत मोलाचं स्थान प्राप्त झालं आहे. श्री-जान्हवीच्या गाठीभेटी ‘श्री’चे बाबा, ‘बेबी आत्यांचा देव’ यांची ओळख इथेच होते आणि खरं नातं उलगडत जातं. ‘अनिल आपटें’ची विविध तिरस्करणीय रूपं इथेच कळतात. शिवाय ‘सहस्रबुद्धय़ां’च्या चाळीत अंगणात जिन्याजवळ एक कोपरा आहे. तिथे ‘जान्हवी’ आणि तिचा जिवलग मित्र मनीष, ती आणि ‘पिंटय़ा’ अगदी जिवाभावाच्या गोष्टी एकमेकांना सांगतात. कधी एकमेकांच्या समस्येवर तोडगा काढणं, कधी धीर देणं, कधी सल्ला, कधी आधार देणं; पण काहीही असलं तरी मनाच्या आतलं बोलल्यामुळे तो कुरूप कट्टाही देखणा बनतो. असाच एक कोपरा जान्हवीच्या बँकेतही आहे. त्या कॉर्नरनेही कधी तिचे अश्रू पाहिलेत, तर तिची आणि गीताची रहस्ये जपलीत. प्रेमाच्या पाऊलखुणा, भंगलेलं प्रेम, पुन्हा जुळलेलं ‘मनीष-गीता’चं नातं, बाळाची चाहूल, सगळं सगळं या कोपऱ्यात सामावलंय. त्यामुळेच तो कोपरा नगण्य न राहता उजळून गेलाय. जान्हवीचं मुलगी बाळ, दत्तक बाळ, दोन्ही जावई, परतलेली मुलं आणि प्रत्येकाची जुळलेली मनं यामुळे घराचं ‘गोकुळ’ नाव आता मात्र सार्थ ठरलंय; आणि कला दिग्दर्शक नंदू दांडेकर, संजय पवार आणि निर्माता- दिग्दर्शक मंदार देवस्थळी, रवींद्र करमरकर, केदार वैद्य, निरंजन पत्की यांच्यामुळे खरंखुरं ‘गोकुळ’ अवतरलं!
meenagurjar1945@gmail.com