इंटिरिअर डिझाइन हा वरकरणी साधा भासत असला तरी हा गहन विषय आहे. बऱ्याच लोकांना इंटिरिअर करण्याची खूप इच्छा असते, पण इंटिरिअर डिझाइन म्हणजे काय, याची सुतराम कल्पना नसते. बहुतांश लोकांच्या लेखी इंटिरिअर करणे म्हणजे फर्निचर करून घेणे, टाइल्स बदलणे व रंगरंगोटी करणे. अर्थात या गोष्टी इंटिरिअरचा एक भाग आहेच, पण इंटिरिअर डिझाइनमध्ये लेआऊट प्लॅन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बजेट मॅनेजमेंट, थीम डिझाइन असे बरेच प्रकार आहेत. प्रत्येक इंटिरिअरची स्वत:ची अशी एक स्टाइल असते. स्टाइल प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपला डिझाइनर आपली सर्वतोपरी मदत करतो. काही जणांना त्यांना कोणत्या प्रकारची स्टाइल, लुक इंटिरिअरमधे हवी आहे याची अजिबात कल्पना नसते, तर काही जणांच्या डोक्यात त्यांना हवा असलेला लुक पक्का बसलेला असतो. केव्हा तरी एखाद्या मासिकात, टी.व्ही. मालिकेत किंवा नातेवाइकांच्या घरी, स्नेह्य़ांच्या घरी एखादा इंटिरिअरचा सुंदर आविष्कार पाहिलेला असतो. अगदी तस्से किंवा तसेच काहीतरी स्वत:च्या घरी करून घेण्याची इच्छा असते. प्रत्येक वेळेस हे पूर्णत: शक्य असेलच असे नाही. पण बऱ्याचशा अंशी हा लुक प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांची मदत होते. जर कोणताच लुक डोक्यात नसेल तर आपण नेमलेला डिझाइनर आपल्याशी व आपल्या कुटुंबाशी सविस्तर चर्चा करतो. आपल्या आवडीनिवडी, बजेट, सवयी या आणि अशा काही गोष्टींचा अभ्यास करून आपल्या इंटिरिअरसाठी एखादी स्टाइल सुचवली जाते.
इंटिरिअर डिझाइनमध्ये अनेक प्रकार आहेत. अनेक स्टाइल्स आहेत, पण ढोबळमानाने वर्गीकरण केल्यास तीन स्टाइल्स प्रामुख्याने आढळून येतात. त्या म्हणजे- १) मॉडर्न स्टाइल २) एथनिक स्टाइल व ३) फ्युजन स्टाइल. या प्रत्येक स्टाइलचे अनेक उपप्रकारदेखील आहेत. पण आपण या मुख्य तीन स्टाईल्सची माहिती घेऊ या.
पहिल्या प्रकारात म्हणजे मॉडर्न स्टाइलमध्ये सगळे लेटेस्ट ट्रेंडस् वापरले जातात. खूप आधुनिक पद्धतीचे फर्निचर, लाईट फिटिंग्ज, ब्राईट रुलर्स, टेक्स्चर्स वापरून खूप मॉडर्न असा लुक साकारता येतो. मॉडर्न म्हणजे आधुनिक अशी साधारण व्याख्या आहे, पण हल्ली आधुनिक शब्दाची जागा विचित्र या शब्दाने घेतलेली दिसते. कारण आपण फर्निचर शोरूम्सना भेट दिलीत तर तेथे मॉडर्न फर्निचरच्या नावाखाली चित्रविचित्र आकाराचे, रंगाचे फर्निचर, अ‍ॅक्सेसरीज विक्रीस ठेवलेल्या आढळतात. सर्वसामान्य माणसाला हे सगळे अगम्य वाटते. म्हणूनच विचित्रपणा टाळून आधुनिक पद्धतीने जर इंटिरिअर साकारले तरच ते खरे मॉडर्न इंटिरिअर म्हणता येईल. या प्रकारचे इंटिरिअर निवडण्याअगोदर आपल्या जीवनशैलीला व व्यक्तिमत्त्वाला ही इंटिरिअर स्टाइल साजेशी आहे का, याचा जरूर विचार करावा. ही स्टाइल फ्लोरिंगपासून सिलिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीत वापरावी लागते. ही स्टाइल वापरताना आपले इंटिरिअर वापरण्यास अयोग्य होणार नाही याची काळजी घ्यावी. स्टाइल कोणतीही असो, आपले इंटिरिअर वापरण्यास, राहण्यास सोपे असावे. इंटिरिअर हे १०० टक्के प्रॅक्टिकल व फंक्शनल असणे अत्यावश्यक आहे. स्टाइल निवडताना काळजीपूर्वक निवडावी. कारण एकदा केलेले इंटिरिअर सहजासहजी बदलता येत नाही. या स्टाइलमध्ये पांढऱ्या व काळ्या रंगाचा विशेष वापर होतो, तसेच डिझाइन करताना सरळ रेषेचा वापर जास्त होतो. ही स्टाइल सुंदर व आधुनिक दिसते. कारण सगळे नवनवीन ट्रेंडस् यात वापरले जातात. पण नवनवीन ट्रेंडस् हे तितक्याच झपाटय़ाने बदलले जातात हेही लक्षात ठेवावे.
दुसरी स्टाइल म्हणजे एथनिक स्टाइल. या स्टाइलमध्ये जुन्या पद्धतीचे फर्निचर वापरले जाते. हे जुने फर्निचर भारतीय किंवा पाश्चात्त्य प्रकारचेही असू शकते. यात लाकडाचा सढळ हस्ते वापर होतो व लाकडावर वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर पॉलिश केले जाते. ही स्टाइल फ्लोरिंग, दरवाजे, खिडक्या, फर्निचर, पडदे, भिंती, सिलिंग या सगळ्या गोष्टीत वापरली जाते. यात फर्निचर खऱ्या लाकडाचे (प्लायवूडचे नव्हे) करणे अपेक्षित आहे. फ्लोरिंगमधे व्हिट्रीफाईड टाईल्स न वापरता मार्बल, इटालियन मार्बल, अयसलनेर स्टोन असे नैसर्गिक प्रकार वापरावे. बऱ्याचशा घरी जुने फर्निचर जतन करून ठेवलेले आढळते. ते फर्निचर आपण या स्टाइलमध्ये वापरू शकता. जुन्या पेटय़ा, संदूक, देव्हारे, अलमाऱ्या, आरामखुच्र्या, जाळीदार पलंग, कोरीव काम असलेले सोफे, जुन्या धातूच्या मूर्त्यां, लामणदिवे, समई, झरोके, घंगाळ, पितळी व तांब्याची भांडी, पानाचे डबे हे सगळं आपण हुशारीने या स्टाइलमध्ये वापरू शकतो. या एथनिक स्टाइलची लोकप्रियता कधीच कमी होणार नाही. ही बरीच खर्चीक स्टाइल आहे, पण हौसेला मोल नसते!
तिसरी व सगळ्यात जास्त वापरली जाणारी स्टाइल म्हणजे फ्युजन स्टाइल. फ्युजन म्हणजे दोन गोष्टींचा मिलाफ. या स्टाइलमध्ये मॉडर्न व एथनिक या दोन्ही स्टाईल्सचा वापर केला जातो. दोन्ही स्टाईल्सच्या काही गोष्टी, काही गुणधर्म वापरले जातात. मॉडर्न स्टाइलचे लेटेस्ट ट्रेंडस् वापरताना एथनिक स्टाइलचे आर्टरफेस्टन वापरले जातात. असे बरेच प्रकार आपण या स्टाइलमध्ये करू शकतो. पण या स्टाइलचे डिझाईन फार काळजीपूर्वक करावे लागते. उगाच नवे-जुने एकत्र आणून ही स्टाइल करण्याचा अट्टहास करू नये. याचा परिणाम विचित्र होऊ शकतो. म्हणूनच अभ्यास गरजेचा आहे. ही स्टाइल खूप लोकप्रिय आहे.
आपण एखादी स्टाइल ठरवल्यावर ती स्टाइल आपण कशी वापरणार आहात याचा विचार करावा. एखादी स्टाइल सगळ्या घरासाठी वापरलीच पाहिजे असे नाही. केवळ लिव्हिंग रूम या स्टाइलमध्ये करून बाकीचे घर आपण वेगळ्या प्रकारे सजवू शकता. अर्थात हा निर्णय सर्वस्वी आपला आहे. घर सजवण्याचा विचार करत असाल तर एखाद्या इंटिरिअर स्टाइलचाही विचार करा. एका विशिष्ट स्टाइलने केलेले इंटिरिअर खूप उठावदार व सुंदर दिसते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्त्व असते.
अजित सावंत – ajitsawantdesigns@gmail.com

Story img Loader