एखाद्याच्या मनात घर करायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. ज्यांनी वेगवेगळे हटके पदार्थ आणि सूत्रसंचालनाच्या ‘मेजवानी’ने सगळ्या खवय्यांच्या मनात घर केलंय, त्या शेफचं घर कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आज भेटूया सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारा हजार स्क्वेअर फूट हा मुंबईत साधारणपणे अख्ख्या सोसायटीचा एरिया असू शकतो, पण नागपुरातलं विष्णूजींचं घर आणि आसपासची बाग वगैरे सगळं बारा हजार स्क्वेअर फुटांच्या विस्तीर्ण जागेवर उभं आहे! २०११ मध्ये हे घर बांधायला सुरुवात झाली आणि काम पूर्ण व्हायला तीन र्वष लागली. विष्णूजींच्या घराचं वैशिष्टय़ म्हणजे ज्याला ‘ग्रीन हाऊस’ म्हणता येईल अशा प्रकारचं ते घर आहे. त्यांचे मोठे भाऊ –  प्रवीण यांच्या कल्पनेतून हे इको फ्रेंडली घर साकार झालंय. घरात सोलार एनर्जीचा ८०% वापर होतो. शिवाय हे घर बांधताना त्यात सिमेंटचा वापर अजिबात केला गेलेला नाही. सिमेंट न वापरता एवढं मोठं घर कसं बांधलं गेलं, या प्रश्नाचं उत्तर देताना विष्णूजींनी एक ‘रेसिपी’च सांगितली. रेती, चुना, उडीद डाळ, डिंक आणि पाणी हे सगळं कोलूवर दळून वीस दिवस फर्मेट करून वापरलं तर सिमेंट न वापरताही आवश्यक तो परिणाम साधता येतो! त्यांच्या घराचं प्लॅस्टरिंग करताना प्लॅस्टरमध्ये बंगलोर आणि पुण्याहून आणलेले घोडय़ाचे केस वापरलेत. विष्णूजींच्या घरात एक लायब्ररी आहे. तिथे भिंतीसाठी त्यांनी वेगळा पोत वापरलाय. शेणाने सारवलेल्या भिंतीचा फील त्यांना हवा होता. पण आता भिंती शेणाने सारवणं, त्यांची देखभाल करणं ही फारच कठीण गोष्ट. त्यामुळे या भिंतीसाठी सुद्धा त्यांनी एक खास रेसिपी वापरलीय. मोरचूद, फेव्हिकॉल, शेण आणि मातीच्या मिश्रणाने ती भिंत तयार केल्यामुळे ती सारवण्याची गरज पडत नाही, पण दिसते मात्र शेणाने सारवलेल्या भिंतीसारखीच!

घराला स्लॅब न घालता वरच्या मजल्यावर जैसलमेर आणि खालच्या मजल्यावर शहाबादी फरश्या घातल्या आहेत. सगळ्यात वर कौलं आहेत. खोल्यांची उंची २०-२२ फूट आहे. काही ठिकाणी लाकडी फ्लोअरिंग आहे. घरात ज्या बाजूने सूर्यप्रकाश जास्त येतो त्या बाजूला दुहेरी विटांच्या भिंती घातल्यात, दोन भिंतींमध्ये थर्मोकोल घातलाय. या सगळ्यामुळे घरातलं तापमान ७ ते ८% कमी राहतं. परिणामी एसी-पंखे यांच्यावर येणारा ताण कमी होतो. नागपुरात उन्हाळाही कडक असतो आणि थंडीही! घराच्या अशा रचनेमुळे उन्हाळ्यातली उष्णता थंडीत आणि थंडीतला गारवा उन्हाळ्यात जाणवत राहतो. या वेगळ्या पद्धतीच्या इको फ्रेंडली घराचे वास्तुरचनाकार आहेत हबीब खान. विष्णूजींचे वडील आर्टिस्ट आणि मधल्या वहिनी इंटिरियर डिझाइनर असल्यामुळे घराची अंतर्गत सजावट मात्र घरच्या कलाकारांनीच केली आहे.

विष्णूजींच्या घरी जुन्या काळातल्या- ‘अँटिक’ म्हणता येतील अशाही बऱ्याच गोष्टी आहेत. घर बांधताना घरातले दरवाजेही मुद्दाम जुन्या काळातले, वेगवेगळ्या ठिकाणांहून आणलेले वापरलेत. काही दरवाजे शंभर र्वष तर काही सव्वाशे र्वष जुने आहेत. त्यांच्याकडे असलेल्या जुन्या गोष्टींमध्ये गोव्याहून आणलेला एका कॅथलिक माणसाचा एकशेचाळीस र्वष जुना पियानो आहे. राजस्थानहून आणलेल्या मोठं घंगाळं, मोठी पातेली आणि आणखी काही जुन्या वस्तू आहेत. उदयपूरहून आणलेल्या पितळी खुच्र्या आहेत. त्यातली एकेक खुर्ची ३२ किलो वजनाची आहे! पेशावर- पाकिस्तानातून आणलेलं डायनिंग टेबल तर एकसंध दगडाचं आहे. ते उचलायलाच १५-१६ माणसं लागतात! आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे एक मोठी घंटा आहे आणि सकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत दर तासाला- किती वाजले आहेत त्याप्रमाणे टोल दिला जातो.

विष्णूजींचं घर हे एका शेफचं घर आहे म्हटल्यावर तिथलं स्वयंपाकघर हे एकदम खास असणारच. विष्णूजींचं स्वयंपाकघर म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाफ आहे. रोजच्या वापरातलं स्वयंपाकघर आधुनिक आहे. तिथला फ्रिज, ओवन वगैरे भिंतीच्या आत आहे. रेतीचा ओवन, तंदूर हेही त्यांच्या स्वयंपाकघरात आहे. स्वयंपाकघराची दुसरी बाजू मात्र पारंपरिक आहे. म्हणजे तिथे चुली, जातं, पाटा-वरवंटा, रगडा, खलबत्ता अशा सगळ्या वस्तू आहेत. विष्णूजींच्या आई ८२ वर्षांच्या आहेत. त्यांना रोज पाटय़ावर वाटलेली चटणी लागते. त्यामुळे स्वयंपाकघरातल्या जुन्या वस्तू नुसत्या शोभेच्या नाहीत तर वापरातसुद्धा आहेत. त्यांच्याकडे स्वयंपाकघरात हात धुवायला किंवा भांडी विसळायला साबणाऐवजी लिंबाच्या सालाची पावडर वापरतात. हात धुण्यासाठी किंवा भांडी विसळण्यासाठी वापरलेलं पाणी बागेत सोडलं जातं. स्वयंपाकघराला जोडूनच ‘किचन गार्डन’ आहे. त्यात कोथिंबीर, टोमॅटो, मिरची अशा रोजच्या स्वयंपाकात लागणाऱ्या गोष्टी लावल्यात. शिवाय बाहेरच्या मोठय़ा बागेत सीताफळ, लिंबू, संत्र, मोसंबं, केळं, चिकू, नारळ, जांभूळ अशी बरीच झाडं आहेत. बागेसाठी खास डी-कम्पोस्ट मशीन आहे. त्यात कचरा, खरकटं वगैरे टाकल्यावर आठ-दहा तासांनी उत्तम खत तयार होतं. साधारण ३० किलो कचऱ्यापासून ६-७ किलो खत तयार होतं. घरासमोर चार हजार स्क्वेअर फुटांचं प्रशस्त लॉन आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे. छानपैकी विहीर आहे- तिला पाच फुटांवर बारमाही पाणी असतं.

विष्णूजींचे आई-वडील, दोन भाऊ – त्यांची कुटुंबं, विष्णूजींचं कुटुंब, मदतनीस अशी १५-१६ माणसं या घरात एकत्र राहतात. मदतनिसांच्या कुटुंबांसाठी आवारात घरं बांधलेली आहेत. विष्णूजींच्या मोठय़ा वहिनी कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि मधल्या वहिनी इंटिरियर डिझायनर आहेत त्यामुळे घराची, स्वयंपाकघराची संपूर्ण व्यवस्था विष्णूजींच्या पत्नी अपर्णाताई बघतात. एरवी विष्णूजी घरच्या किचनमध्ये फारशी लुडबूड करत नाहीत. पण कुणाचा वाढदिवस असला किंवा एखादी अगदी स्पेशल रेसिपी करायची असली तर मात्र ते किचनमध्ये जातात.

एकूणच एखाद्या आदर्श घरात जे जे असावं ते ते सगळं विष्णूजींच्या घरात आहे. भौतिक गोष्टी उत्तम प्रकारच्या असल्या तरी घराला घरपण येतं ते तिथल्या माणसांमुळे! विष्णूजींच्या घरातली माणसंही सुस्वभावी आणि अगत्यशील असल्यामुळे त्यांचं घर खऱ्या अर्थाने ‘मनोहर’ आहे..!

  • विष्णूजींच्या घरात एक लायब्ररी आहे. तिथे भिंतीसाठी त्यांनी वेगळा पोत वापरलाय. शेणाने सारवलेल्या भिंतीचा फील त्यांना हवा होता. पण आता भिंती शेणाने सारवणं, त्यांची देखभाल करणं ही फारच कठीण गोष्ट. त्यामुळे या भिंतीसाठी सुद्धा त्यांनी एक खास रेसिपी वापरलीय. मोरचूद, फेव्हिकॉल, शेण आणि मातीच्या मिश्रणाने ती भिंत तयार केल्यामुळे ती सारवण्याची गरज पडत नाही, पण दिसते मात्र शेणाने सारवलेल्या भिंतीसारखीच!
  • घर बांधताना त्यात सिमेंटचा वापर अजिबात केला गेलेला नाही. सिमेंट न वापरता एवढं मोठं घर कसं बांधलं गेलं, या प्रश्नाचं उत्तर देताना विष्णूजींनी एक ‘रेसिपी’च सांगितली. रेती, चुना, उडीद डाळ, डिंक आणि पाणी हे सगळं कोलूवर दळून वीस दिवस फर्मेट करून वापरलं तर सिमेंट न वापरताही आवश्यक तो परिणाम साधता येतो!

anjalicoolkarni@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnu manohar eco friendly home