एखाद्या घरी लग्न, मुंज किंवा काही धार्मिक कार्यक्रम असल्यास तेथे गेल्यावर त्या घराच्या आतील रूपरंगाची कल्पना, त्याच्या बारूपावरून निदर्शनास येते. घराला अंगण असल्यास, ते स्वच्छ व नीटनेटके असले किंवा शेणाने सारवलेले असले पाहिजे. अंगणात तुळशी वृंदावन असावे. तुळशीची हळदकुंकू, उदबत्ती, दिवा लावून पूजा केलेली असावी, म्हणजे एक प्रकारचे पावित्र्य वाटते. अंगणात झाडे लावलेली असावीत आणि त्या झाडांना सुंदर, रंगीबेरंगी, सुगंधित फुले आलेली असल्यास ते अंगण स्वागतकक्षासारखे वाटते. या स्वागतकक्षात काढलेली दारासमोरील रांगोळी म्हणजे स्वागतास उभ्या असलेल्या एखाद्या सुंदर स्त्रीसारखी वाटते. घरातल्या गृहिणीने सडासंमार्जन करून रांगोळी काढली तर सकाळच्या शुद्ध, मोकळ्या, आल्हाददायी वातावरणाचा परिणाम म्हणून गृहिणीही आनंदित होईल. ठिपक्यांची, संस्कारभारतीची, किंवा फुलांची रांगोळी काढली जाते. स्वस्तिक, गोपद्म, चक्र अशा विविध रांगोळ्याही दारापुढे रेखाटल्या जातात. या रांगोळीतले रंग मन वेधून घेतात. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. भारतीय संस्कृतीत रांगोळीला बरेच महत्त्व आहे. अंगण नसेल तेथे दारापुढे गेरूने सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. दारापुढील रांगोळी सुंदर असेल तर घरी येणाऱ्या पाहुण्यांची पावले रांगोळी पाहायला दोन मिनिटे थबकतातच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर दिसते ते घराचे प्रवेशद्वार. काहीजण दारावर विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपतीचे चित्र लावतात. दारावर फुलांचे, आंब्याच्या पानांचे, लोकरीचे, मण्यांचे तोरण लावलेले असावे. दाराच्या मध्यभागी आंब्याचे डहाळे असावे. झेंडूची फुले व आंब्याच्या पानांचे तोरण लावण्याची जास्त पद्धत आहे. तारण या शब्दाचा अपभ्रंश तोरण झाला असून तारण म्हणजे संकटापासून तारणे असा गृहीत धरला जातो. कवयित्री इंदिरा संत यांनी दारावरील तोरणाबाबत, ‘दारा बांधता तोरण घर नाचले, नाचले, आज येणार अंगणी, सोनचाफ्याची पाऊले, भिंती रंगल्या स्वप्नांनी, झाल्या गजाच्या कर्दळी, दार नटून उभेच, नाही मिटायची बोली,’ ही सुंदर कविता लिहिली आहे.

दारांवरील सुंदर नक्षीही मन वेधून घेते. दारावरील नेमप्लेटही वेगवेगळ्या रंगांच्या, धातूंच्या असतात. त्याही छान छान असतात. कोणीतरी आले आहे याची वर्दी देण्यासाठी दाराच्या बाजूला बेलही अनेक प्रकारच्या, नक्षीच्या असतात आणि त्यांचे आवाजही वेगवेगळे असतात.

या अशा घराच्या बाहय़दर्शनानंतर, समारंभाला आलेल्या  कोणालाही घराच्या आतील रूपाची व माणसांच्या मनाची  कल्पना येईल व मन प्रसन्न होऊन पाहुणे स्वखुशीने घरात प्रवेश करतील.

madhurisathe1@yahoo.com