डॉ. शरद काळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा घरातील बागेचा विषय निघतो तेव्हा आमच्या घरात ऊन येतच नाही, आमच्या घरी धूळ खूप असते, आमच्या बाल्कनीत उंदीर आहेत, आमच्या घरात वारा येत नाही.. अशा अनेक प्रकारचे तक्रारवजा सूर ऐकावयास मिळतात. त्यातील काही कारणे शास्त्रीय असल्यामुळे त्यात तथ्यदेखील असते. पण घरातील बाग ही कल्पना साकार करण्यासाठी प्रथम आपल्याला हे करावयाचे आहे आणि करावयाचेच आहे हे ध्येय ठेवले पाहिजे. सकारात्मक भूमिकेतून प्रश्नांची उकल होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे प्रथम अगदी सोपे आणि सहजगत्या होणारे प्रयोग निवडले तर यश मिळण्याची शक्यता वाढते आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास वाढतो.

आपण पंढरपूर, तिरुपती, शिर्डी, बनारस, रामेश्वर, आळंदी अशांसारख्या तीर्थक्षेत्री जाताना मनात एक भावना घेऊन जातो, की ही तीर्थक्षेत्रे आहेत. तीर्थक्षेत्र म्हणजे स्थानमाहात्म्य! त्या स्थानी काही विशिष्ट ऊर्जातरंग असतात आणि त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते. त्यामुळे आजूबाजूच्या कोलाहलाचा किंवा अस्वच्छतेचा किंवा कधीकधी भोंदूगिरीचा प्रत्यय आला तरी आपल्या चित्तवृत्तींवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. कारण आपण देवाच्या स्थानी असतो आणि त्या देवतेभोवतीचे वलय हे आपले लक्ष्य असते. यालाच स्थानमाहात्म्य असे म्हणतात. तिरुपतीला जाऊन त्या देवळात अंगावर जे रोमांच उभे राहतात तसे नारायणपूर क्षेत्री राहतीलच अशी खात्री नसते. याचा आपल्या घरातील बाग या कल्पनेशी काय संबंध, असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक म्हणावे लागेल.

तीर्थक्षेत्र, वलय आणि ऊर्जातरंग ही शास्त्रीय तत्त्वे प्रत्येक व्यक्तीच्याच नव्हे तर प्रत्येक सजीवाच्या बाबतीत लागू पडतात. आपल्या वनस्पतींच्या बाबतीत ती कशी लागू पडतात याचा आपण अभ्यास केला तर मग विषय सोपा होण्यास मदत होईल. एखादे गाव किंवा शहर जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा त्याचे हवामान काय आणि जसे असेल याबाबत जुजबी माहिती आपल्याला असते. उदाहरणार्थ, आपण महाबळेश्वर घेतले तर तिथे थंड हवामान असते आणि लोक तिथे उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनास जातात असे चटकन मनात येते. मुंबई म्हटले की दमट हवा, सातत्याने येणारा घाम असे मुंबईच्या बाहेर राहणाऱ्या लोकांच्या मनात येतेच. धारवाड किंवा पुण्याची हवा राहण्यासाठी अगदी चांगली आहे असे म्हटले जाते. नगरची हवा अगदी कोरडी आहे असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण हे झाले स्थूल मानाने! जेव्हा कृषीशास्त्र किंवा बगीचा विज्ञान यांचा आपण विचार करतो तेव्हा हे स्थानमाहात्म्य अतिशय महत्त्वाचे ठरते. या स्थानमाहात्म्याला आपण शास्त्रीय भाषेत सूक्ष्म वातावरण किंवा मायक्रो क्लायमेट असे म्हणतो. सूक्ष्म या शब्दाचा लौकिकार्थाने घ्यावयाचा नाही. जर आपण पुण्याच्या सारसबागेत गेलो तर त्या बागेचे वातावरण आणि पुण्याचे वातावरण यात काही फरक नजरेस सहजपणे येतात. त्या बागेतील प्रत्येक वृक्षाचे किंवा फुलझाडाचे स्वत:चे असे जे वातावरण त्याच्या मुळांभोवती किंवा त्याच्या एक फुटाच्या परिसरात असते त्यालाच सूक्ष्म वातावरण असे म्हणतात.

काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मानवनिर्मित घटकांमुळे वातावरणात अनिष्ट बदल होत असतात. नदीच्या पाण्याचे कचऱ्यामुळे किंवा सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण, उकिरडय़ांमुळे गावातील वातावरणाचे होणारे प्रदूषण, गोंगाटामुळे होणारे हवेचे प्रदूषण, वाहने आणि कारखाने यातून बाहेर पडणारी न वापरली गेलेली ऊर्जा, ही काही ठळक उदाहरणे आहेत. या अनिष्ट बदलांमुळे वातावरणातील आद्र्रता, तापमान आणि हवेचा दाब यात महत्त्वाचे बदल होऊ शकतात व त्यांचा परिणाम आजूबाजूच्या सजीवांवर होत असतो. जेव्हा सर्व जगातच हे घडते तेव्हा त्याला जागतिक हवामान बदल, जागतिक तापमान वृद्धी, हरितगृह परिणाम किंवा कार्बनी अर्थशास्त्र असे संबोधले जाते. पण जागतिक पातळीवर होणारे हे परिणाम स्थानिक पातळीवर घडत असलेल्या बदलाचे एकत्रित परिणाम असतात हे लक्षात घेतले पाहिजे. आणि आपल्या वैयक्तिक सवयींमुळे जागतिक बदल घडून येऊ शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. घरातील कचरा घरात जिरवून घरातील बाग आणि त्याद्वारे थोडी हिरवाई आपण राखू शकलो तर जागतिक हवामानात होणाऱ्या जलद परिणामांची गती आपण कमी करू शकतो.

एखाद्या टेकडीच्या एका बाजूला भरपूर ऊन मिळते आणि पाऊस तिथे अधिक पडतो, तर दुसरीकडे ऊनही कमी असते आणि पावसाचे प्रमाणदेखील कमी असते. म्हणजेच ही टेकडी जरी अधिक पावसाच्या क्षेत्रात येत असली तरी तिच्या भोवती सारेच क्षेत्र तसे नसते आणि त्यालाच आपण स्थानमाहात्म्य किंवा सूक्ष्म वातावरण असे संबोधतो. जर आपण बाल्कनीत अशा प्रकारे वातावरण निर्माण करू शकलो तर घरातील बाग अधिक चांगल्या प्रकारे फुलू शकते. इमारतींच्या गच्चीवर हरितगृह उभारून त्यातील वातावरण नियंत्रित करता येते.

हरितगृह उभारण्यासाठी मोठे शेतच आवश्यक आहे असे नसते. थोडय़ा जागेत हिरव्या जाळीचा वापर करून आणि उभ्या शेती पद्धतीने अधिकाधिक भाज्या व फुले उत्पादने करता येणे शक्य आहे. इथे आपल्याला सूक्ष्म वातावरण निर्मितीचा उपयोग होतो. इस्रायल देशाने अशाच पद्धतीने कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यात यश मिळविले आहे.

नैसर्गिक दृष्टीने उत्तम सूक्ष्म पर्यावरण लाभलेली क्षेत्रे अगदीच मर्यादित आहेत. तुलनेने सांगायचे म्हटले तर नैसर्गिक बंदरांची संख्या आलेल्या देशात अगदीच कमी आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि जयगड सोडले तर नैसर्गिक बंदरेच नाहीत. मग आपण कृत्रिम बंदरे निर्माण करतो. तसाच हा काहीसा प्रकार आहे. कोकणातील हवामान देशावरील हवामानापेक्षा वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल आहे. तिथले सूक्ष्म वातावरण अशा प्रकारच्या वैयक्तिक शेतीसाठी अधिक उपयुक्त आहे. पण म्हणून देशावर अशी वातावरण निर्मिती करता येणार नाही असे नाही. गृहनिर्माण संस्थांमध्ये उपलब्ध असलेली जागा या दृष्टीने वापरावयास हवी आहे.

मातीविना शेती या संकल्पनेत मातीचा कमीत कमी वापर अपेक्षित आहे. मातीच्या कुंडय़ा हाच एक पर्याय आपल्यापुढे आहे या विचाराने आपण गच्चीबरील किंवा बाल्कनीत बागेकडे पाहतो. पण प्लास्टिक बादल्या, प्लॅस्टिकची भांडी, रंगाचे डबे, तेलाचे रिकामे झालेले डबे किंवा बरण्या, चांगल्या आणि मजबूत स्थितीत असलेली पुठ्ठय़ाची खोकी,  यासारख्या गोष्टींचा वापरदेखील त्यासाठी करता येऊ शकेल. नारळाच्या शेंडय़ा अंथरून त्यावर बारीक वाळू आणि मातीचा थर देऊन आणि घरातच स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थापासून निर्माण केलेले खत वापरून आपण आपल्या सूक्ष्म वातावरणातील एक महत्त्वाचा घटक तयार करू शकतो. पाण्याचा अतिवापर टाळला तर पुठ्ठय़ाची खोकीदेखील दोन-तीन वर्षे सहज सेवा देतात. आजकाल बाजारात उभ्या शेतीसाठी उपयोगी पडतील असे विविध प्रकारचे स्टॅण्ड उपलब्ध आहेत. ज्या जागेत आपण फक्त ३-४ कुंडय़ा ठेवू शकतो, तेवढय़ाच जागेत १०-१२ तरी कुंडय़ा आरामात राहू शकतील असे हे स्टॅण्ड असतात. आपण आपल्याला हवे असतील तसे स्टॅण्ड डिझाइन देऊन बनवूदेखील शकतो. अशा स्टॅण्डवर शेड नेट किंवा बाजारात ज्या हिरव्या जाळ्या मिळतात त्यांचा वापर आपण नियंत्रित वातावरण निर्मितीसाठी आपण करू शकतो. घरातील वापरलेली मच्छरदाणी यासाठी चांगली उपयोगी पडू शकते.

चांगले दर्जेदार सेंद्रिय खत, थोडी माती, कोकोपीट किंवा नारळाच्या शेंडय़ाची पावडर, थोडी वाळू यांच्या एकत्रित वापरातून आणि वर दिलेल्या साधनांमधून आपण उभ्या शेतीसाठी लागणारे भक्कम माध्यम तयार करू शकतो. त्यावर जाळी आच्छादन केली की आद्र्रतेचे नियंत्रण करता येईल. शिवाय पक्ष्यांपासून आपल्या भाज्यांचे आणि फुलझाडांचे संरक्षण करणे सोपे जाईल. उंदीर नियंत्रण मात्र आपल्याला करावे लागेल, पण उभ्या स्टॅण्डमुळे उंदरांचा त्रास नक्कीच नियंत्रित तरी करता येतो. घरातील एखादा उभा पंखा उलटा ठेवून त्याचा वापर नियंत्रित वायुविजनासाठी करता येतो. एक्झॉस्ट पंखे यासाठी वापरात आणता येतात, पण टेबल पंखा उलटा ठेवून आपल्याला तो परिणाम साधता येईल. शिवाय त्याचा दुहेरी फायदा असा की, घरातील हवेचेदेखील शुद्धीकरण होत राहील आणि आपण सोडत असलेला कार्बन डाय ऑक्साइड आपल्या भाजीपाल्याला आणि फुलझाडांना मिळेल. त्यांनी सोडलेला ऑक्सिजन आपण वापरत असलेल्या हवेतील ऑक्सिजनची थोडीफार तरी भरपाई करणार आहे!

दिवसाला आपण निसर्गातील तीन किलो ऑक्सिजन रोज फुकट वापरत असतो आणि एक किलो कार्बन ऑक्साइड हवेत सोडतो. त्यामुळे होणारे जागतिक तापमानातील बदल अतिसूक्ष्म असतात हे ध्यानात घेतले तर प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर हे केले तर त्याचा दृश्य परिणाम योग्य रीतीने होताना आपल्याला दिसेल. युरोपियन देशांमध्ये लोकसंख्या नियंत्रित आहे ही बाब खरी असली तरी तिथे प्रत्येक घराने आणि आस्थापनांनी हिरवाई राखलीच पाहिजे असे कडक नियम आहेत. सामान्य जनता हे नियम अवडंबर न माजविता काटेकोरपणे पाळते आणि म्हणून युरोपियन देश अतिशय सुंदर आहेत. हे सौंदर्य फक्त नैसर्गिक नसून त्यापाठीमागे त्यांची अथक मेहनतदेखील आहे, ही बाब आवर्जून लक्षात ठेवायला हवी आहे. पुलंनी त्यांच्या अपूर्वाई पुस्तकात या युरोपियन बागांचे निरीक्षण बारकाईने करून त्यांचे अप्रतिम वर्णन सुमारे पन्नास वर्षांपूर्वी केले होते. त्यावेळी त्यांच्यादेखील मनात आपल्या देशात हे व्हावे असे असणार यात शंकाच नाही. पन्नास वर्षांनंतर आज युरोपमध्ये त्या सौंदर्यात भरच पडली आहे हे आपण कोणीही मान्य करायला हवे अशी परिस्थिती नक्कीच आहे.

सूर्यप्रकाश नसणे ही अगदी नेहमीची तक्रार असते आणि ती रास्तदेखील आहे. प्रत्येक घर पूर्व-पश्चिम असेल असे आपण शहरात इच्छा असूनदेखील सहज करू शकत नाही.

आपल्या हातात ते नसतेदेखील, कारण घर खरेदी करताना सारेच आपल्या मनासारखे होईल असे नसते. आणि त्यामुळे सूर्यप्रकाश उपलब्ध नसणे हे अनेक घरांच्या बाबतीत साहजिकच म्हणावे लागेल. इमारतींच्या गच्चीवर मात्र सूर्यप्रकाश बऱ्यापैकी असू शकतो. त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल या दृष्टीने बागेची रचना करता येईल. बाल्कनीत ऊन येत नाही अशी जी तक्रार आहे ती दूर करता येणे अशक्य नाही. आजकाल एल.ई.डी.चे जे १४ वॉटचे बल्ब मिळतात, त्यांचा वापर बाल्कनीत करून आपण आपल्या भाजीपाल्याला आणि फुलझाडांना प्रकाश उपलब्ध करून देऊ शकतो. तीन ते चार बल्ब एका ओळीत जवळजवळ लावले तर दिवसाचे तीन ते चार तास ते दिवे लावून अगदी योग्य प्रमाणात जरी नसली तरी सूर्यप्रकाशाची थोडीफार सोय नक्कीच त्यातून होईल. आणि त्याचा दृश्य परिणाम थोडय़ाच दिवसात दिसू लागेल. जर आपण पाच असे दिवे रोज चार तास लावले तर त्यासाठी विजेचे बिल .३ युनिट म्हणजे दोन ते तीन रुपये एवढे येईल. त्यामुळे हिरवाईचे जतन होऊन आपल्याला घरची मिरची-कोिथबीर मिळाली तर हा खर्च भरून निघाला असे म्हणता येईल. सर्वच गोष्टी पशात मोजता येत नाही आणि हिरवाईची किंमत तर पशात नक्कीच करता येत नाही!

या बागेला पाणी मात्र अगदी नियंत्रित स्वरूपातच द्यावयाचे आहे. बाल्कनीतून पाणी सातत्याने गळत आहे ही बाब ना आपल्यासाठी, ना इमारतीसाठी, ना शेजारच्या घरासाठी भूषणावह आहे. कुंडय़ांना पाणी देणे हा अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये ज्वलंत प्रश्न असतो! शिवाय इमारतींच्या बाह्य़ बाजूला अवास्तव पाणी घालण्याचे नक्षीदार काम आपल्यासकट कुणालाच आवडत नसते! कुंडीत पाणी ओतायचे नसते, तर एखाद्याला तहान लागली असेल तर ज्या काळजीने आपण त्याला पाणी देतो तसे तुमच्या रोपांना पाणी पाजायचे असते. त्यासाठी मोजकेच, पण आवश्यक पाणी किती याचा थोडा अभ्यास करायला पाहिजे. आणि अगदी थोडय़ा दिवसांच्या निरीक्षणातून आपल्या हे लक्षात येईल. पाण्याचे प्रमाण अधिक झाले तर रोपांवर किडय़ांचा किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो.

थोडक्यात सांगावयाचे झाले तर

आवश्यक तेवढे पाणी

आवश्यक तेवढा उजेड

योग्य प्रमाणात खत व माती

यातून आपण सुंदर हिरवाई निर्माण करू शकू असे म्हणावयास हरकत नाही. सृजनशीलता आपल्या प्रत्येकाच्या ठायी असतेच. तिला वाट करून द्या आणि पाहा तुमची घरातील बाग कशी बहरते ते!

sharadkale@gmail.com

लेखक भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आणि सिम्बायोसिस कचरा स्रोत व्यवस्थापन केंद्र येथे प्राध्यापक आहेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will power to make terrace garden