आमची सोसायटी १९९३ साली स्थापन झाली तेव्हापासून ते एकत्र बायलॉज वापरत आहेत हे योग्य आहे का?
एस. जी. मोरे, भांडुप, मुंबई.
बायलॉज हे वारंवार बदलायचे नसतात. त्यात आवश्यक त्या सुधारणा करता येतात व त्या उपनिबंधकांच्या मंजुरीनंतर अमलात येतात. मध्यंतरी शासनाने गृहनिर्माण संस्थेचे नवीन बायलॉज तयार केले होते व ते सर्व संस्थांनी स्वीकारणे आवश्यक होते. ज्यांनी ते स्वीकारले नाहीत त्यांनीदेखील ते स्वीकारले आहेत, असे गृहीत धरले गेले आहे. तरी आपण आपल्या संस्थेने नवीन बायलॉज स्वीकारले आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी व स्वीकारले नसल्यास त्याची पूर्तता करावी. याबाबत फेडरेशनचे मार्गदर्शन घ्यावे.
आमच्या सोसायटीत २० महिला सदस्य आहेत. त्या कार्यकारिणीत भाग घेत नाहीत. म्हणून नाइलाजाने सहयोगी सभासदांसंबंधी अटी आणि शर्ती स्टॅम्पपेपरवर घेऊन सर्व बाबींची पूर्तता करून त्यांच्या पतींना आणि प्रतिनिधींना कार्यकारी सदस्य नियुक्त केले. अशा प्रकारे स्टॅम्पपेपरवर सह्य़ा घेऊन त्यांच्या पतींना, प्रतिनिधींना काम करता येते का?
एस. जी. मोरे, भांडुप, मुंबई.
शासनाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे एखादा मूळ सदस्य आपला सहयोगी सदस्य नेमू शकतो व तो सहयोगी सदस्य ही मूळ सदस्यांची कामे करू शकतो (उदा. संस्थेची निवडणूक लढवणे, पदाधिकारी म्हणून काम करणे. सभेला उपस्थित राहणे, मतदान करणे इत्यादी.) मात्र त्यासाठी त्याला सहयोगी सदस्य बनणे आवश्यक असते.
आपण आपल्या पत्रात त्यांना सहयोगी सदस्य करून घेतले किंवा नाही? याचा खुलासा केलेला नाही. सहयोगी सदस्यासाठीचा अर्ज हा उपविधीमध्ये दिलेला आहे. त्यासाठी स्टॅम्पपेपरवर अटी-शर्ती लिहिण्याचीही जरूरी नाही. ते जर सहयोगी सदस्य असतील तर वर निर्दिष्ट केलेली कामे ते करू शकतात. मात्र ते मूळ सदस्याचा पाठिंबा असेपर्यंतच असे काम करू शकतात, हे लक्षात घ्यावे.
बिल्डरने आमच्या इमारतीशेजारी दुसरी ३ मजली इमारत बांधली. दोन्ही इमारतींचे कम्प्लीशन सर्टिफिकेट एकत्र घेऊन देतो अशा प्रकारे बिल्डर सांगतो. प्रत्यक्षात वर्क्स कम्प्लीशन सर्टिफिकेट मिळालेले नाही. परिणामी, मालमत्ता कर भरताना वर्क्स कम्प्लीशन सर्टिफिकेट आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण अनऑथोराइज्डपणे राहतो. यावर उपाय काय?
– मा. बा. फुलारे, बदलापूर (पूर्व.)
महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप कायद्यानुसार इमारत बांधल्यावर त्याचे वर्क्स कम्प्लीशन सर्टिफिकेट मिळवून देणे भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) मिळवून देणे, गृहनिर्माण वा तत्सम संस्था स्थापन करून देणे आदी सर्व गोष्टी करणे बिल्डरवर कायद्याने बंधनकारक आहेत. या गोष्टी जर तो करत नसेल तर बिल्डरविरुद्ध न्यायालयीन कारवाई करणे उचित ठरेल. आपण बिल्डरविरुद्ध ग्राहकमंचात दाद मागू शकता अथवा दिवाणी दावा दाखल करू शकता. यात आमच्या मते सर्व सदनिका/ गाळेधारकांनी एकत्रितपणे दिवाणी दावा दाखल करून न्याय मिळवणेच इष्ट ठरेल. दिवाणी न्यायालयाला यासंबंधी व्यापक अधिकार असतात हे आपण लक्षात घ्यावे.
सोसायटीमधील मोकळी जागा डिपॉझिट घेऊन पार्किंगसाठी सभासदांना देता येते का? सुप्रीम कोर्टाच्या नव्या आदेशानुसार यावर काही बंधन येऊ शकते का?
या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. सोसायटी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन एक पद्धत निश्चित करून मोकळी जागा पार्किंगसाठी आपल्या सदस्यांना देऊ शकते. किंबहुना सोसायटीचा तो हक्कच आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा पार्किंगची जागा बिल्डरला विकता येत नाही असा आहे. तो सोसायटीच्या विरोधात नाही हे लक्षात घ्यावे.
आमची सोसायटी १९७५ मध्ये रजिस्टर झालेली आहे. परंतु अद्याप कन्व्हेअन्स डीड झालेले नाही. डीम्ड कन्व्हेअन्स करतानाही खूप अडचणी येत आहेत. कारण जुन्या सभासदांनी बिल्डरबरोबर करारनामेच केलेले नाहीत. त्यांच्याजवळ फक्त पेमेंट रिसीट्स आहेत व शेअर सर्टिफिकेट त्यांच्या नावे आहे, तर याबाबत काय करायचे याचे मार्गदर्शन करावे.
सचिव, न्यू वंदना को-ऑप.हा.सो.लि.,
कल्याण (प.)
आपण वर्णन केलेल्या अडचणी बहुतांश सोसायटय़ांमध्ये असतात. त्यात नवीन असे काहीच नाही. आपण यासाठी संबंधित डी.डी.आर. यांच्याकडे संपर्क साधणे जरुरीचे आहे. ते प्रकरण हाताळताना स्टँप डय़ुटी किती भरावी लागेल हेदेखील सांगतात. त्यासाठी कोणत्या गोष्टी व कागदपत्रे हवीत याबाबत आपण कल्याण हाऊसिंग फेडरेशनचे सहकार्य घ्यावे. फेडरेशनने एक लेखी पत्रिका काढली असून त्याद्वारे आपणाला बरीचशी माहिती मिळेल. जागेअभावी या ठिकाणी याहून विस्तृत उत्तर देणे शक्य नाही.
घैसास अॅण्ड असोसिएट्स
टॅक्स कन्सल्टंट अॅण्ड लीगल अॅडव्हायजर्स
ब्लॉक नं. २ ए विंग, तळमजला, चंदन सोसायटी, कीíतकर कंपाऊंड, नूरी बाबा दर्गा रोड, मखमली तलावाजवळ ऑफ एल.बी.एस. रोड,
ठाणे (प.) ४००६०१. फोन – ०२२-२५४०३३२४