अयोध्याकांडात कैकयीला रामराज्याभिषेक करणार असल्याचे वृत्त कळवण्यासाठी दशरथ तिच्या महालात येतो. या वेळी तिच्या प्रासादाचे जे वर्णन रामायणात येते त्यावरून त्या काळातील ‘लॅण्डस्केपची’ माहिती मिळते.
रा मायण-महाभारत ही भारताची आर्ष महाकाव्यं! त्यातसुद्धा रामायणाचा काळ अति प्राचीन. रामाच्या ‘अयनाचा’ म्हणजे प्रवासाचा इतिहास म्हणजे रामायण. सातकांडांमध्ये विभागलेल्या या काव्यात्म इतिहासात वास्तुशास्त्राशी संबंधित अनेक संदर्भ सापडतात. काव्याच्या सुरुवातीला बालकांडात नगररचनेच्या दृष्टीने वैभवशाली अयोध्येचे वर्णन येते.
अयोध्येचा विस्तार
शरयूच्या तीरावर कोशल नावाचा धनधान्याने समृद्ध असा प्रदेश आहे. या देशात तीस कोस लांब आणि साडेसात कोस रुंद अशी भव्य नगरी आहे. सपाट भूमीवर मनुने वसवलेली ही नगरी म्हणजेच अयोध्या. तीस कोस म्हणजे साधारणपणे साठ मल किंवा सात योजन अंतर मानले आहे. कोसाच्या परिमाणाविषयी वेगवेगळ्या विद्वानांची वेगवेगळी मतं आहेत. ती आपण सर्वप्रथम समजून घेऊया.
सामान्यपणे एक योजन म्हणजे चार कोस किंवा आठ मल मानले जाते. भानुजी दीक्षित या विद्वानांच्या मते ४ कोस म्हणजे पाच मल. सरसकट पाच मल अंतर धरले तरी अयोध्येचे अदमासे अंतर ३५ मल लांब व १२ मल रुंद आहे.
अशा ह्या ३५ मल लांब व १२ मल रुंद अयोध्येत जागोजागी वेशी व कमानी उभारून नगरी सुशोभित केली आहे. नगरीतील मार्ग रुंद व रेखीव असून नागरिकांनी केलेल्या संमार्जन व रंगावल्यांनी त्यांचे सौंदर्य नेहमी वाढत असते. याचा अर्थ आपल्या समोरील रस्त्यांची काळजी त्या मार्गावरील नागरिकांची असावी असे वाटते. सर्वच कामं शासनाकडून होत नसत. यात अधिकाराबरोबर कर्तव्याचीही जाणीव नागरिकांना होती. नगरीत नियमित अंतरावर बाजार आहेत. हे बाजार देशोदेशीच्या व्यापाऱ्यांनी नित्य गजबजलेले असतात. विविध प्रकारच्या कारागिरांनी निवास केलेली ही नगरी स्वयंपूर्ण आहे. शाली जातीच्या तांदुळांनी धान्य कोठार भरलेले असून इक्षू म्हणजे उसाच्या रसासारखी मधुर पाण्याची तळी सर्वत्र आहेत. नगरीत जागोजागी विविध प्रकारची उद्यानं व आमराया आहेत.
नगरीतील उन्नत व भव्य प्रासाद
नगरीतील उंच प्रासादांचे वर्णन करताना वाल्मीकी म्हणतात, ‘सिद्धांना प्राप्त झालेल्या विमानांप्रमाणे या घरांची आतील व बाहेरील रचना अत्यंत व्यवस्थित आहे.’ यातील ‘विमान’ हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण संस्कृतमध्ये विमान शब्दाचे उंच इमारत व अवकाशात फिरणारे यान असे दोन अर्थ आहेत. उंच इमारत ही कमीत कमी सात मजली असेल तर तिला विमान असे म्हटले जाते. याचाच अर्थ अयोध्येत सात मजली इमारती होत्या. एक मजला साधारणपणे दहा फूट असतो. या हिशोबाने सत्तर फूट उंच इमारती बांधण्याची कला रामायणकाली अवगत होती. या उंच इमारतींवर ध्वज लावून त्या सुशोभित केल्या जात असत.
अयोध्याकांडात दशरथ, राम व कौसल्येच्या प्रासादांचे वर्णन येते. राम दशरथाच्या दर्शनाला आपल्या रथातून उतरून कैलास पर्वताप्रमाणे असणाऱ्या दशरथाच्या भव्य प्रासादात चढून जातो असे वर्णन आहे. या एका वाक्यात लेखकाने प्रासादाची भव्यता दोनदा सांगितली आहे. एक तर राजाचा प्रासाद कैलास पर्वताप्रमाणे उंच आहे आणि तो भव्य प्रासाद राम चढून गेला यासाठी ‘आरुरोह’ असा शब्द वापरला आहे. ‘रुह’ म्हणजे चढून जाणे. याचा अर्थ दशरथाच्या प्रासादात रामाला चढून जावे लागले. याआधीच आपण कमीत कमी सात मजली इमारतींसाठी ‘विमान’ हा शब्द वापरतात हे पाहिले आहे. पण या सात मजली इमारती नगरातील इतर लोकांच्या होत्या. आता राजाचा राजवाडा हा सामान्य लोकांपेक्षा अधिक उंच असणार हे ओघानेच आले. त्यामुळे सात मजल्यांपेक्षा जास्त उंच असणाऱ्या प्रासादाची कैलास पर्वताशी केलेली तुलना समर्पक वाटते.
अयोध्याकांडात रामाच्या न झालेल्या राज्याभिषेकाची कथा आहे. अभिषेकापूर्वी रामाला व्रतस्थ राहाणे आवश्यक असते. म्हणून अभिषेकाच्या आदल्या दिवशी रामाने उपवास करावा हे सांगण्यासाठी वसिष्ठ रामाच्या प्रासादात आपल्या रथातून तीन चौक ओलांडून गेल्याचे म्हटले आहे. एक रथ सहजपणे जाऊ-येऊ शकेल यासाठी प्रासादाच्या आंतर्भागातील मार्ग निश्चितपणे किमान बारा ते पंधरा हात रुंद होता. यावरून प्रासादाची भव्यता लक्षात येते.
अशाच प्रकारचे वर्णन पुढे अयोध्याकांडाच्या सतराव्या सर्गात आहे. रामाचा अभिषेक करण्याचे दशरथाने निश्चित केले आहे. सुमंत्र रामाला दशरथाकडे घेऊन जात आहे. त्या वेळी दशरथाच्या प्रासादातील तीन चौक ओलांडल्यावर राम पायउतार होतो व पुढले दोन चौक ओलांडून जातो. म्हणजे दशरथाच्या प्रासादात जाण्यासाठी एकूण पाच चौक ओलांडून जावे लागतात. दशरथाकडून आपल्याला अभिषेक होणार हे कळल्यावर राम माता कौसल्येला भेटायला तिच्या प्रासादात जातो ते तीन चौक ओलांडून. यातील पहिल्या चौकाच्या महाद्वारावर वृद्ध व मान्य अशा पहारेकऱ्यांबरोबर इतरही सनिक उभे होते. दुसऱ्या चौकात वेदवेत्ते ब्राह्मण वेदपठण करत होते व तिसऱ्या चौकात स्त्रिया, बालक आणि काही वृद्ध होते. यातील पहिल्या चौकात वृद्ध आणि मान्य पहारेकऱ्यांचा उल्लेख आहे. संस्कृत साहित्यात अंत:पुरातील प्रमुख अधिकारी हा वृद्ध काञ्चुकीय असल्याचे वर्णन सापडते. ‘अन्त:पुरचर: विप्र: वृद्ध: सर्वकार्यार्थ कुशल:’ थोडक्यात अंत:पुरात वावरणारा सर्व कार्यात कुशल असलेला असा ब्राह्मण असे काञ्चुकीयाचे वर्णन आहे. संस्कृत साहित्यात अंत:पुरात सर्वत्र सापडणारा हा विप्र कौसल्येच्याही राजप्रासादात सापडतो.
वरील सर्व वर्णनात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे राम व कौसल्येच्या वाडय़ांना तीन चौक आहेत, तर दशरथाच्या वाडय़ाला पाच चौक आहेत. प्राचीन राज्यपद्धतीत सर्वश्रेष्ठ पद राजाचे असल्यामुळे त्याचा प्रासाद राजकुमार किंवा महाराज्ञीपेक्षाही मोठा असणार. ह्या अनुमानाला वरील वर्णनावरून बळकटी येते.
नगरं किंवा प्रासादांची रचना करताना निसर्गाचा ऱ्हास हा अपरिहार्यपणे होतो, पण त्याच वेळी या निसर्गाचे आकर्षण मानवाला नेहमीच असते. यातूनच लॅण्डस्केपची संकल्पना आकाराला आली. अयोध्याकांडात कैकयीला रामराज्याभिषेक करणार असल्याचे वृत्त कळवण्यासाठी दशरथ तिच्या महालात येतो. या वेळी तिच्या प्रासादाचे जे वर्णन रामायणात येते त्यावरून त्या काळातील ‘लॅण्डस्केपची’ माहिती मिळते. कैकयीच्या महालात जागोजागी असणाऱ्या शुक, मयूर, क्रौंच, हंस अशा पक्ष्यांचा कलरव सुरू आहे. चंपक-अशोकासारख्या वृक्षांनी युक्त अशा खास निर्माण केलेल्या लतागृहांनी प्रासाद अधिकच सुंदर दिसत आहे. योग्य देखभालीमुळे वृक्ष पुष्प-फळांनी वाकलेले आहेत. या साऱ्याचा आनंद लुटण्यासाठी लतागृहांतून जागोजागी हस्तीदंत, रजत व सुवर्णाचे ओटे घातलेले आहेत. लतागृहांमधील वापी गृहांची शोभा वाढवत आहेत. जोधा-अकबर या चित्रपटातील अशा प्रकारची लॅण्डस्केपची दृश्यं आपल्या अजून स्मरणात राहतात. कैकयीच्या प्रासादातील अशी एकापेक्षा एक सरस स्थाने ओलांडत दशरथ राजा जातो तो मात्र कैकयीच्या क्रोधागारात. आज टूबीएचके जागा घेतली की आपण भरून पावतो. त्या वेळी मात्र रागवण्यासाठीसुद्धा वेगळे कक्ष होते इतका प्रासादांचा विस्तार होता. अर्थात तेव्हा आजच्या इतकी लोकसंख्या बेसुमार वाढलेली नसल्यामुळे भरपूर जागा उपलब्ध होती, म्हणूनच क्रोधागार शक्य होते. असो.
भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, असे नेहमी म्हटले जाते. त्या वैभवाचा अंदाज वरील वर्णनावरून येतो. भव्य, सजवलेले प्रासाद हे अयोध्येचं वैशिष्टय़ होतं. प्रासादांच्या आत लतागृह निर्माण करण्याएवढी प्रासादांची भव्यता होती, या वर्णनात कुठेतरी अतिरंजन वाटणे शक्य आहे. पण आज मोठमोठय़ा मॉलमधून पामची झाडं लावण्याची पद्धत आहे. काहीशी तशीच पद्धत राजांच्या राजवाडय़ातून असल्यास ते आपल्याला मान्य करावे लागते.
वैभवशाली अयोध्या
अयोध्या नगरीतील सारे प्रासाद आणि देवालयं रत्नखचित आहेत. नगरी ‘अष्टापदाकारा’ आहे असे वाल्मीकी सांगतात. अष्टापद याचा अर्थ सुवर्ण. दारांवर सोन्याचे पत्रे बसवणे आणि घरांतील िभतींवर सोन्याच्या रंगांनी युक्त अशी चित्रे काढून त्या सुशोभित करण्याची पद्धत त्याकाळी अस्तित्वात होती. आजही बालाजी, मीनाक्षी अशा मोठमोठय़ा मंदिरांच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराभोवती सोन्याचे किंवा रुप्याचे पत्रे लावून ते
सुशोभित केले जातात. नगरीचे हे वैभव नगरीच्या सुरक्षेवरती अवलंबून असते आणि अयोध्या ही मूळात ‘अवध्या’ म्हणजे जिंकता न येणारी अशी होती. कारण तिच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची काळजी रघुकुळातल्या राजांनी घेतलेली होती असे रामायणात वर्णन आहे.
या भागात आपण अयोध्येचे वैभव व नगरीतील प्रासादांची रचना पाहिली. पुढील भागात नगराची रचना, संरक्षण व्यवस्था आणि जंगलात निवास करणाऱ्या लोकांची निवास व्यवस्था पाहणार आहोत.
वास्तुकप्रशस्ते देशे : शरयू तीरावरी अयोध्या
अयोध्याकांडात कैकयीला रामराज्याभिषेक करणार असल्याचे वृत्त कळवण्यासाठी दशरथ तिच्या महालात येतो. या वेळी तिच्या प्रासादाचे जे वर्णन रामायणात येते त्यावरून त्या काळातील ‘लॅण्डस्केपची’ माहिती मिळते.
आणखी वाचा
First published on: 06-04-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastukprashkste deshe ayodhya on the bang of sarayu river