१९८३ मध्ये नोंदणीसाठी पाठविलेला करारनामा अद्याप परत आलेला नाही. कार्यालयात चौकशी केली असता तिथे नीट उत्तरे मिळत नाहीत. कोणी सांगते की, पुष्कळ दस्तावेज गहाळ झालेले आहेत. कित्येक मुंबईतदेखील आलेले नाहीत. तर अशा वेळी काय करावे?
-ज्युली आना डिसोजा, गोरेगाव (पश्चिम), मुंबई.

तुमची समस्या ही सर्वसाधारण समस्या झालेली आहे. आपण पत्रात लिहिलेली वस्तुस्थिती जवळपास सर्वच नोंदणी कार्यालयांमध्ये दिसून येते. त्याला आपण फारसे काही करू शकत नाही, पण पुढील गोष्टी आपण करून ठेवाव्यात –
(१)    उपनिबंधक नोंदणी कार्यालयास एक लेखी पत्र पाठवून आपला करारनामा पुण्याहून आला का, याची अधिकृतरीत्या विचारणा करावी. या पत्राला येणारे उत्तर जपून ठेवावे. उत्तर न आल्यास स्मरणपत्र पाठवावे व त्याचीही पोच घ्यावी अथवा रजिस्टरने पाठवावे.
(२)    सदर दस्तावेज नोंदण्याची पावती जपून ठेवावी.
(३)    ज्या ठिकाणी सदर करारनामा नोंद केला गेला तेथून अनुसूचीपत्र क्र. २ (इंडेक्स टूचा उतारा) घेऊन ठेवावा.
(४)    जर उपनिबंधक कार्यालयातून उत्तर न आल्यास माहितीच्या अधिकारात या पत्राचे काय झाले, याची विचारणा करता येईल.
(५)    पुढील कृती ही पत्राच्या उत्तरावर वा उत्तर न देण्यावर अवलंबून असेल.

 सोसायटीच्या दोन सदस्यांच्या वादामध्ये सोसायटीने काय करावे? (वस्तुस्थिती – सोसायटीमधील दोन सदस्यांनी आपल्या सदनिका अदलाबदल करून घेतल्या व म्हाडामध्ये हस्तांतरणासाठी एका सदस्याने दुसऱ्या सदस्याला १५ हजार रु. दिले आहेत. अद्यापि म्हाडामध्ये हस्तांतरणासाठी १५ हजार रु. दिल्याचे कागदपत्र त्यांच्याकडे आहेत. ज्याने १५ हजार रु. घेतले तो पोलीस सेवेत आहे. त्यामुळे तो हस्तांतरणासाठी सही देत नाही. सहीसाठी १ लाख रुपयांची मागणी करतो.)
– आर. ए. गवळी, शीव, मुंबई.

खरे तर या वादात सोसायटीला पडायचे कारण नाही. सोसायटीचा त्यांच्या आपसातील वादाशी काहीही संबंध नाही. सोसायटीकडे जोपर्यंत आवश्यक ते हस्तांतरण दस्तावेज, जाहीर प्रकटीकरण (ट्रान्स्फर डॉक्युमेन्ट्स, डिक्लरेशन) येत नाहीत तोपर्यंत सोसायटीने सदर सदनिकांचे हस्तांतरण करू नये. रेकॉर्डप्रमाणे सभासद राहत नसतील तर त्यांना पत्र पाठवून खुलासा विचारावा. खुलाशानंतरच काय कार्यवाही करायची ते ठरवावे लागेल. जर १५ हजार रु. देणाऱ्या व्यक्तीजवळ त्याची पावती असेल तर ती व्यक्ती घेणाऱ्याच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स अथवा फौजदारी दावा लावून दाद मागू शकतो.

 मी एक सदनिका खरेदी केली. या सदनिकेचा मी घेतली तेव्हाचा तिसरा व्यवहार आहे. पहिला खरेदीदार व बिल्डर यांच्यात करारनामा झाला होता; परंतु त्याच्या प्रती गहाळ झाल्या आहेत. एक प्रत आहे, परंतु त्यावर स्टॅम्प डय़ुटी वगैरे भरल्यासंबंधी कोणतीही कागदपत्रे नाहीत. दुसरा व्यवहार झाला त्याचा करारनामा नोंदणीकृत आहे. मी विकत घेतानादेखील करारनामा नोंद केलेला आहे. अशा परिस्थितीत पहिला करारनामा मिळत नाही, या कारणास्तव सोसायटी सदर सदनिका माझ्या नावावर करण्यास तयार नाही. पूर्वीच्या खरेदीदाराने इन्डेमनिटी बॉण्डदेखील बनवून दिला आहे. पहिल्या खरेदीदाराच्या नावावरून दुसऱ्या खरेदीदाराच्या नावे शेअर सर्टिफिकेटदेखील ट्रान्स्फर झालेले आहे. आता मी काय करावे?
– सुनील विनायक वैद्य, कांदिवली (पूर्व), मुंबई.

खरे तर कायद्याच्या दृष्टीने तुमचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यात कोणतीही कायदेशीर अडचणदेखील नाही. तुमचा करारनामा नोंद झाला आहे. ज्याच्याजवळून आपण सदनिका घेतलीत त्याच्या नावावर शेअर सर्टिफिकेट आहे. या परिस्थितीत आपल्या नावे शेअर हस्तांतरण करण्यास खरे तर संस्था नकार देऊ शकत नाही. एवढेच काय, संस्थेला शेअर हस्तांतरण रोखण्याचा खरे तर कोणताही अधिकारच नाही. म्हणून आपण पुढील गोष्टी कराव्यात त्या अशा –
(१) आपण शेअर हस्तांतरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांसहित आपला अर्ज संस्थेकडे सादर करावा. त्याच्याबरोबर ट्रान्स्फर फीचा चेकदेखील द्यावा. मात्र त्याची पोचपावती घेऊन ठेवावी.
(२) संस्थेकडून आपल्याला काही लेखी कळविले तर आपल्याला संबंधित उपनिबंधक कार्यालयाकडे याविरुद्ध दाद मागता येईल.
(३) समजा ९० दिवसांत संस्थेकडून काही कळविले गेले नाही तर ‘डीम ट्रान्स्फर’ मानून शेअर हस्तांतरणासाठी उपनिबंधकांकडे दाद मागता येईल.
(४) मात्र आपण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही वस्तुस्थिती समजावून सांगितल्यास यातील काहीही न करता आपले काम होऊ शकते.

 सोसायटीमधील गळतीची / दुरुस्तीची मोठमोठी कामे निघत आहेत. या कामासाठी येणाऱ्या खर्चाची विभागणी कशी करावी. कारण काही बाबतीत सर्व सदस्यांवर समान पैसे आकारले जातात. काही बाबतीत चौ. फुटांवर आकारणी होते. तरी याबाबत मार्गदर्शन व्हावे.
– नीरा आर. मटकर, अंबरनाथ 

याबाबत पुष्कळजणांचा गैरसमज आहे. ज्या ठिकाणी सेवा पुरविली जाते उदा. साफसफाई कामगार, वॉचमन, माळी आदी साऱ्यांचा खर्च सर्व सदस्यांनी सारख्या प्रमाणात वाटणे योग्य होय; परंतु ज्या ठिकाणी दुरुस्तीचा प्रश्न येतो त्या ठिकाणी चौ. फुटांवर आकारणी करणे योग्य होय. यामध्ये रंगकाम, प्लॅस्टरिंग आदींसारख्या दुरुस्त्या मोडतात. कित्येक सोसायटय़ांमध्ये सदनिकेप्रमाणे म्हणजे वन रूम किचन, टू रूम किचन अथवा वन बीएचके, टू बीएचके असे प्रकार धरून त्यावर खर्चाची विभागणी केली जाते. मात्र हा सोसायटीच्या सर्वसाधारण सभेच्या अखत्यारीतला विषय आहे. तेव्हा एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेणे इष्ट ठरेल.

घैसास अ‍ॅण्ड असोसिएट्स
टॅक्स कन्सल्टन्ट अ‍ॅण्ड लीगल अ‍ॅडव्हायजर्स
ब्लॉक नं. २, ए विंग, तळमजला,
चंदन सोसायटी, कीर्तिक र कम्पाउंड,
नुरी बाबा दर्गा रोड, ऑफ एल. बी. एस. रोड,
मखमली तलावाजवळ, ठाणे (प.)-४००६०१.
 ०२२-२५४१६३३६, २५४००६५९, २५४०१८१३

Story img Loader