‘वास्तुरंग’मधील (१० नोव्हेंबर) ‘भावनाचं बेट’ हा लेख खरोखरच बोधप्रद आहे. मुलांची स्वतंत्र खोली ही संकल्पना सध्या रुळतेच आहे. त्यात मुलांच्या खोलीसाठी देण्यात येणाऱ्या माहितीमुळे मोठय़ांच्याही ज्ञानात भर टाकली आहे. उजळ रंगामुळे सकारात्मक कंपने निर्माण होऊन वातावरणात ऊर्जा येते, तर निळा रंग हा शांतता प्रदान करणारा रंग असून त्याने मेंदू शांत राहून झोप लागण्यास मदत होते याचा प्रत्यय आपणासही येतोच.
लता दाभोळकर यांचा ‘भिंत.. एक भावविश्व’ हा लेखही मनाला भावला. तरीही मुलांनी भिंती रंगवून खराब केलेले घर मनाला खटकते. भिंतीवरच्या चित्रांमध्ये त्यांचे भावविश्व सामावलेले असते, तो त्यांचा आवडता छंद असतो. त्यात ती रमतात हे सर्व खरे, पण मुलं दुसरीकडे कुठे गेली व त्यांनी तिथल्या घरच्या भिंती रंगविण्याचा हट्ट धरला तर त्यांच्या पालकांना हे आवडणार नाही व ज्यांच्याकडे ती पाहुणे म्हणून जातील त्या घरातल्यांनाही मुलांचा हा दुर्गुणच वाटेल. पण त्यावर लेखिकेने सुचविलेला भिंतीवर काळा, हिरव्या रंगांचा फळा योग्य वाटतो. उभ्या पृष्ठभागावर लिहिताना खांद्याच्या स्नायूवर ताण येतो आणि ते स्नायू विकसित होण्यास मदत तर होतेच, पण बालपणापासूनच त्यांना फळ्यावर लिहिण्याची सवय लागल्यामुळे अक्षरही वळणदार येते, हा मी माझ्या नातवंडांवरून घेतलेला स्वानुभव आहे. आपण जेव्हा भिंती खराब होतात म्हणून त्यावर लिहिण्यास त्यांना प्रतिबंध करतो त्याच वेळी त्यांच्या प्रगल्भ बुद्धीला वाव मिळावा, खांद्याच्या स्नायूबरोबर बोटांचे स्नायूही विकसित व्हावेत, पुढेही वरच्या वर्गात वाढता अभ्यास करताना त्यांना मोठा पृष्ठभाग असलेला फळाच अतिशय उपयुक्त ठरेल व तेच साधन त्यांना पर्यायी उपलब्ध करून देऊन कागदाचा जास्त वापर न करता खडूने फळ्यावर लिहिण्याची सवय होईल. हा लेख वाचून म्हणावेसे वाटते, ज्या घरी बालक त्या घरी असावा रंगीत फलक.’’
– शुभदा कुळकर्णी, कुर्ला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा