वास्तुशास्त्र हा विषय एवढा मोठा आहे की त्यात अशास्त्रीय भाग कधी मिसळला गेला ते कळलेच नाही. हा विषय प्राचीन काळापासून विकसित झाला आहे. त्यावेळी खगोलशास्त्र विषयाचा जसा अभ्यास होत होता; तेव्हा त्यात फलज्योतिष हा भाग कधी आला ते समजले नाही, तसेच वास्तुशास्त्रामध्ये अशास्त्रीय भाग आला असेल. वास्तुशास्त्र हा विषय म्हणजे बांधकामाचे शास्त्र. त्यात राहावयाच्या इमारती, प्रासाद, देवळे, पूल इत्यादींची बांधकामाच्या योग्यायोग्यतेचा खोलवरपणे तपासणे तसेच एखादे नगर बांधणीचे नियोजन करणे. इथपर्यंत ठीक आहे, पण यात अनेक अशास्त्रीय गोष्टी मिसळल्या गेल्याने या शास्त्राचे महत्त्व कमी झाले हे लक्षात येते.
यात अशास्त्रीय गोष्टी अलीकडच्या अनेक ग्रंथांमधून आल्या आहेत. बांधकाम करावयाचे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांकडे बघून ऊर्जा कोठून मिळते ते बघणे. बांधकामात लाकूड, विटा, दगड, माती, वाळू, सिमेंट इत्यादी साहित्य वापरून एक वास्तुपुरुष बनतो ही कल्पना आणि त्याला धक्का लागेल असे काही वर्तन करायचे नसते. यात दिशाही महत्त्वाच्या. खोल्या, दरवाजे कोठे असावेत हे काही अशास्त्रीय (ग्रंथातून याला आध्यात्मिक बळ म्हटले जाते) वर्णनातून ठरवले जाते. हे अशास्त्रीय मुद्दे सांभाळताना शास्त्रीय बाबींचे विस्मरण होत नाही ना याची खबरदारी घ्यावयास हवी.
काही वर्णनात ब्रह्माकडून हे सुंदर विश्व निर्माण झाले व त्यांनी ते वास्तुशास्त्राच्या रूपाने विश्वकर्मा या देवतेकडे सोपवले. तज्ज्ञांनी ते समजून बांधकामाचे वा इतर गोष्टींचे नियमावलीतून नियोजन करावे असे शिक्षण दिले गेले आहे. यात शास्त्रीय व अशास्त्रीय दोन्हींचे मिश्रण केले आहे. वास्तुशास्त्र म्हणते परमसुखाचे शाश्वत तत्त्व! मुख्य देव ब्रह्मा, विष्णू, शिव यांनी अनुक्रमे विश्वकर्मा, मनू व गर्गऋषींना शिकविले.
विश्वकर्माने सौर मालिकेतील ग्रहांच्या हालचालीवरून व पाणी, वनस्पती, पर्वत इत्यादींच्या ठिकाणावरून घरबांधणीचे निदान ठरविले. यात नियमावलीचे पालन केले व पूजन केले तर व्यक्तीचे समयश पदरी पडण्यास मदत होते, असे म्हटले गेले.
वास्तुशास्त्राप्रमाणेच फेंगशुईशास्त्र उदयास आले. ते चीनमधील आहे. स्वर्ग व पृथ्वी यातील मानलेल्या ऊर्जा व्यक्तीच्या आयुष्यात कशा सुधारणा घडवून आणतील हे तपासणे. फेंगशुई हे भौगोलिक व पारंपरिक विचारांवर अवलंबून आहे. व्यक्तीने वैश्विक घटकांकडून जास्त लाभ मिळवून दैवाकडून मदत व शेवटी यश कसे पदरात येईल ते बघणे.
हल्ली फेंगशुई घरगुती व व्यापारविषयक क्षेत्रात फार नावाजले गेले आहे. फेंगशुईच्या चिनी परंपरेनुसार फलज्योतिष व आकाशस्थ ग्रहांची स्थाने महत्त्वाची ठरतात; ज्यामुळे ऊर्जेचा व्यक्तीच्या जीवनात अखंड प्रवाह सुरू राहतो. याकरता फेंगशुईची साधने फेंगशुई चक्र, होकायंत्र, बुद्धाची मूर्ती, वायुघंटा, त्रिकोणी मनोरे, बेडूक, मासा, कासव इत्यादी आहेत.
वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोन्हींमध्ये पुष्कळ गोष्टीत सारखेपणा आहे, कारण दोन्ही तंत्रशास्त्रे वैश्विक ऊर्जेतून निर्माण झाली आहेत. वास्तुशास्त्र िहदू तत्त्वज्ञानाच्या प्राणऊर्जेमधून तर फेंगशुई हे चिनी परंपरेतून आले आहे. वास्तुशास्त्राला कधीकधी वास्तुविद्या म्हणतात. ही विद्या ४ ते ५ हजार वर्षांपासून भारताला खजिना म्हणून लाभली आहे. यात आत्मिक, योगिक आणि पौष्टिक अन्न इत्यादी ऊर्जेचा अंतर्भाव केलेला असतो. वास्तू म्हणजे निवास व शास्त्र म्हणजे तंत्रज्ञान. या शास्त्रात अनेक गणिती सूत्रे असतात जी बांधकाम समस्येच्या उलगडय़ाकरता कामास येतात. काही श्रद्धावान ही सूत्रे दैवी पद्धतीची मानून घररचना करण्यासाठी वापरतात. वास्तुशास्त्र हे बरेचजण पंचमहाभूत गोष्टींवर अवलंबून आहे, असे मानतात. फेंगशुईत हे घटक मानत नाहीत.
वास्तुशास्त्र व फेंगशुईत फरक हा आहे की, वास्तुशास्त्रामध्ये वास्तुपुरुष हा वापरणाऱ्याच्या वास्तूमध्येच असतो. त्याचे डोके ईशान्येकडे व पाय नऋत्येकडे असतात. वास्तुघर हे एखाद्या मानवी शरीराप्रमाणे असते व त्यात पृथ्वी, आप, वायू, तेज व आकाश हे मुख्य मूळघटक व ऊर्जेची जाणीव त्याच्या बरोबर असतात. फेंगशुई शास्त्र हे आकाशातील पोकळीमधील यिन व यांग ऊर्जेवर अवलंबून आहे. फेंगशुई राहत्या घराच्या जागेवर काम करत नसून, ते शास्त्र फेंगशुईची साधने वापरून आकाशाच्या पोकळीतील प्रभावाने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणते. फेंगशुईत पृथ्वी, तेज, आप, लाकूड व धातू हे मुख्य मूळघटक मानतात.
हल्लीच्या आर्किटेक्ट व सिव्हिल इंजिनीयरनी या अशास्त्रीय गोष्टी सोडून शास्त्रीय विषयात रस घेतला तर पुरातन वास्तुशास्त्राचे ज्यात अनेक शास्त्रीय विषय सूत्रबद्धतेने हाताळले आहेत त्यांचे पुनरुज्जीवन होऊन आधुनिक वास्तू ताकदवान बनू शकतील. परंतु त्यानी ज्या गोष्टींना आधार नाही अशा वास्तुशास्त्रातल्या वा फेंगशुईतील अशास्त्रीय बाबींचा त्याग करायला हवा. जी बांधकामासंबंधी आधुनिक शास्त्रे आहेत त्यांचा पाठपुरावा करावा.
या वास्तुशास्त्रात व फेंगशुईत जे फलज्योतिषाचे घटक मिसळले गेले आहेत व ज्यामुळे लोकांच्या भावनेचा खेळ होतो त्या गोष्टींचा त्याग करावा. आजकाल पात्रता नसलेले असामी वास्तुतज्ज्ञ व इंटिरिअर डेकोरेटर म्हणून मिरवतात. त्यांच्या सल्ल्यानुसार वागायला गेले तर संरचनेचे ज्ञान नसल्याने इमारतींचे अपघात होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा