वाचकांना भावलेलं घर
‘वास्तुरंग’ पुरवणीतील (६ ऑक्टोबर) वासुदेव कामत यांचा ‘आठवणीतलं घर’ सदराअंतर्गत ‘घर.. मनातलं आणि मनासारखं’ हा लेख वाचताना मी मनानेच त्यांच्या घरी पोहोचले होते. बंगल्याच्या नावापासूनच आपण त्यात गुंतत जातो. बागेपासून संपूर्ण घरात फेरफटका मारल्याचं नव्हे रेंगाळल्याचं समाधान मिळतं.
एक चित्रकार म्हणून त्यांची कला जशी समृद्ध आहे, तसेच त्यांचे विचारही खूप प्रगल्भ, संवेदनशील व संस्कारक्षम आहेत हे जाणवतं. प्रेम, वात्सल्य, भक्ती, समानता, सहिष्णुता, आदरातिथ्य, मांगल्य, आपुलकी या जीवनाला पूर्णत्व देणाऱ्या अष्टगुणांचा मिलाफ या घरात झालेला दिसतो आणि alt
त्याची अनुभूती घरी येणाऱ्या प्रत्येकाला येत असेल असं वाटतं.
चाळीतल्या १० x १२ च्या छोटय़ाशा खोलीच्या वर्णनातही त्यांच्यातील प्रगल्भ व्यक्ती डोकावते. ती छोटीशी खोली, कशी सेट बदलते हे वाचून हसूच आलं. त्याचबरोबर त्यांची सकारात्मक वृत्ती लक्षात येते. सध्या बोकाळलेल्या वास्तुशास्त्राला, अंधश्रद्धांनासुद्धा त्यांनी आदरपूर्वक नाकारलं आहे. तसंच त्यांच्या घरातील बहुविचारांच्या दिशांना मानाचे स्थान देण्याच्या विचाराने हे घर सर्वसमावेशकतेचे द्योतक आहे, हे पाहून मन प्रसन्न होतं.
घराची संकल्पना मांडताना संपूर्ण घर हेच ‘देवघर’ हे इतक्या उत्कृष्ट रीतीने मांडलं आहे की तेथे आपण नतमस्तक होतो. असे हे घर वाचकाच्या मनातही नवसंजीवनी जागवेल यात शंकाच नाही.
-सुलभा आरोसकर, ठाणे.
उपयुक्त लेख
‘वास्तुरंग’ मधील (६ ऑक्टोबर) किरण चौधरी यांचा ‘ई- गृहसंस्था कारभार’ हा लेख खूपच आवडला. त्यांनी दिलेल्या सूचनाही उपयुक्त वाटल्या. सोसायटय़ांच्या नेतृत्वहीन व प्रलंबित कारभाराला हा लेख मार्गदर्शक ठरेल.
विलास रोकडे