दरवर्षी मुलांच्या शाळेच्या रजा सांभाळून, सामानाची आवराआवर करून आणि कामगारांच्या व्यापातून मोठय़ा हौसेने घराची अंतर्गत सजावट, रंगकाम करून घ्यायचं आणि ऐन पावसाळ्यात पाण्याच्या गळतीनं हैराण व्हायचं, हे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असतं. कधी दिवाणखान्यात, कधी किचन, तर कधी बाथरूममध्ये होणारी पाण्याची गळती.. तळमजला आणि शेवटच्या मजल्यावर राहणाऱ्या काही जणांची पावसाळा जवळ आला की झोपच उडते. थोडक्यात, हा पाण्याच्या गळतीचा त्रास बरेच जण वर्षांनुर्वष सहन करीत असतात. त्यावरून सोसायटीमध्ये होणारी वादावादी, घाईत घेतले जाणारे खर्चीक, परंतु तात्पुरते उपाय, इत्यादी प्रसंग घडत असतात.
इमारतींची डागडुजी (रिपेअरिंग) करण्यामध्ये पाण्याची गळती किंवा पाण्याची ओल हा इमारतींचा एक महत्त्वाचा गंभीर आजार आहे. पाण्याची गळती जर थांबवू शकलो तर जवळजवळ ७५ ते ८० टक्के इमारतीचे आजार (Defect) नाहीसे होतात. कारण इमारतीच्या संदर्भात असलेले अनेक आजार हे पाण्याच्या गळतीमुळेच होत असतात.
सोसायटीमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांच्या दृष्टिकोनातून पाण्याच्या गळतीचे मुख्यत: दोन प्रकार पडतात. १) पावसामध्ये इमारतीमध्ये होणारी पाण्याची गळती. २) इतर दिवसांमध्ये होणारी पाण्याची गळती.
पावसामध्ये होणारी पाण्याची गळती ही खालील ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येते.
*इमारतीच्या टेरेस स्लॅबखाली/ पोडियम स्लॅबखाली- याचे महत्त्वाचे कारण असे की, स्लॅबवर असलेली वॉटरप्रूफिंगची खराबी (Damage waterproofing) किंवा आर.सी.सी. स्ट्रक्चरचा कमकुवतपणा.
*इमारतीच्या बाह्य़ आवरणावर पडलेल्या भेगा (cracks on external plaster)
*इमारतीच्या बाह्य आवरणावर पडलेलं पाणी भेगांमधून विटांद्वारे आतील भागात पसरून ओल येते.
*इमारतीच्या बाहेरील आवरणाचा कमकुवतपणा (Loose plaster).
*विटांचं अथवा ब्लॉकचं बांधकाम आणि आर.सी.सी. बीम/ कॉलम यांच्या सांध्यावर निर्माण होणाऱ्या भेगा.
*पाणी तसेच सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपच्या भिंतीशी जोडणाऱ्या जागा.
*भिंतीवर वाढलेली विविध प्रकारची झाडं.
*इमारतीच्या बाह्य भागावर विविध कारणास्तव केलेली छिद्रं.
*इमारतीच्या टेरेसवरील संरक्षक भिंतीचा उतार व त्यावरील भेगा.
*खिडक्यांवर लावलेली तावदानं (weather shed)
*पावसामध्ये सभोवतालच्या जागेत पाण्याचा निचरा जर व्यवस्थित होत नसेल आणि इमारतीभोवती संरक्षक PLINTH PROTECTION  नसेल तर तळमजल्यावर वरच्या दिशेने वाढत जाणारी पाण्याची ओल.
या आणि अशा इतर प्रकारच्या कारणांमुळे पावसामध्ये इमारतीमध्ये पाण्याची गळती सुरू होते. यावर उपाय न केल्यास गळती वाढत जाते. सर्वात महत्त्वाचे हे की, योग्यवेळी त्वरित उपाय न केल्यास भेंगांद्वारे पाणी इमारतीच्या सांगाडय़ापर्यंत (R.C.C. structure) पोहोचतं व त्यातील लोखंडी सळ्या (Steel Reinforcement) गंजण्यास सुरुवात होते.
लोखंड + पाणी + ऑक्सिजन = लोखंडाचे ऑक्साइड
पाणी तसेच वातावरणातील क्लोरीन, सल्फेट यांसारखी रसायनं काँक्रीटमध्ये सहजपणे शिरकाव करतात आणि लोखंडी सळ्या तसेच काँक्रीटचं नुकसान करण्यास सुरुवात करतात.
गंज लागलेल्या लोखंडी सळ्या नेहमीपेक्षा जास्त आकारमानाच्या असतात. त्याचा दाब आजूबाजूच्या काँक्रीटवर येतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे आर.सी.सी. घटकावर म्हणजेच बीम/ कॉलमवर पडणाऱ्या भेगा (structure Cracrs). कुठल्याही आर.सी.सी. वास्तुरचनेमध्ये बीम, कॉलम इत्यादी आर.सी.सी. भाग शरीरातील हाडाप्रमाणे असतात. ते संपूर्ण रचनेचं वजन पेलत असतात. त्यामुळे त्यांना होणारं नुकसान त्वरित उपाय योजून कमी करणं आवश्यक ठरतं. अन्यथा, संपूर्ण इमारतीचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. अशा प्रकारच्या नुकसान झालेल्या भागांचं त्यांच्या मूळ ताकदीमध्ये रूपांतर करण्यासाठी पॉलीमरयुक्त मिश्रणाचा (polymer modified mortar) वापर केला जातो. त्याला आर.सी.सी. भागाचं पुनरुज्जीवन (Rahibilitation of RCC structures) करणं असं म्हणतात.  आणि हे काम अधिक खर्चाचं असतं. आर.सी.सी. घटकांचं नुकसान हे पाण्याच्या अंतर्भावाने होतं, म्हणून सर्वप्रथम पाण्याचा अटकाव करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं.
आर.सी.सी. घटकांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना केली जाते.
*सर्वप्रथम ज्या आर.सी.सी. भागाचं काम करावयाचं आहे, त्याच्या आजूबाजूला भार विभाजित करण्यासाठी लोखंडाचे टेकू (Props) लावणे. * सुटलेले प्लास्टर आणि काँक्रिट काढून टाकणे.
*गंज लागलेल्या लोखंडी सळ्या साफ करून घेणे. *  गरज असल्यास नवीन लोखंडी सळ्या लावणे.
*पुन्हा गंजण्याची क्रिया होऊ नये म्हणून गंजरोधक रसायन लावणे. *  रिपेअरिंग करण्यात येणाऱ्या भागावर पॉलीमरयुक्त मिश्रणाचा थर लावणे (Polymer modified mortar). बाजारात विविध प्रकारच्या उत्पादकांचे मिश्रण मिळते. ४ सर्वात शेवटी संपूर्ण आवरणावर प्लास्टर करणे.
अशा प्रकारचे डागडुजीचे काम खूप खर्चीक असते. अशा खर्चीक उपायांपासून दूर
राहण्यासाठी इमारतीच्या बाहेरील आवरणावर तसेच टेरेसवरील तापमानाच्या बदलानुसार किंवा इमारतीला पडणाऱ्या भेगा वेळोवेळी भरून घेतल्या पाहिजेत. बाहेरील आवरणाचे रंगकाम काही वर्षांच्या अंतराने करून घेतले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा