अलकनंदा पाध्ये
एकेकाळी ऐतिहासिक वारशाचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता आधुनिकतेचा साज चढवतेय. पुण्याच्या वेशीवरच नाही, तर खुद्द पुण्यातील रविवार, सोमवार, मंगळवार, सदाशिव अशा अनेक पेठय़ांमधले कित्येक वाडे भुईसपाट होऊन तिथे आता उंच इमारती, मोठमोठी गृहसंकुले, मॉल्सची गर्दी होऊ लागलीय. मात्र पुण्याची खास ओळख असलेल्या तुळशीबागेच्या परिसरात एक वयोवृद्ध चौसोपी वाडा आपले अस्तित्व अजून तरी राखून आहे. वाडय़ाचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणारा नीलफलक आपल्या ज्वलंत इतिहासाच्या आठवणी जागवतो. ‘‘येथे ‘काळ’कत्रे शि. म. परांजपे राहात होते.’’ ही सुवर्णाक्षरे वाचल्यावर स्वातंत्र्यपूर्व काळातील झुंजार पत्रकार, निबंधकार आणि प्रखर राष्ट्रभक्त टिळकांचे सहकारी शिवराम महादेव परांजपे यांच्या त्या निवासस्थानाकडे साहजिकच पावले कुतूहलाने म्हणण्यापेक्षाही आदराने वळतात.
शि. म. परांजपे यांना त्यांचे सर्व निकटवर्ती अण्णा या नावाने संबोधित. अण्णांच्या पश्चात त्यांच्या पुढच्या पिढय़ांमध्ये वाडय़ाची बरीच विभागणी झाली त्यातील काही भागांचे रूपांतर तर आता व्यावसायिक जागेत झालेय त्यामुळे ती वास्तू अखंड वाडा स्वरूपात बघणे अशक्य होते, तरीही त्यांचे पणतू डॉ. परांजपे आणि त्यांच्या परिवाराशी असलेल्या स्नेहामुळे उर्वरित भागात वावरण्याचे भाग्य मात्र जरूर मिळाले. स्वातंत्र्यलढय़ाचा डोळस साक्षीदार असलेल्या त्या वाडय़ातून फिरताना त्याच्या भव्यतेची जाणीव होते. एकेकाळी सदोदित माणसांनी गजबजलेल्या त्या वाडय़ाचा विस्तार इतका मोठा होता की त्यात प्रवेश करायला ३ दिशांना ३ दरवाजे होते. आवारात बारमाही तुडुंब भरलेली विहीर होती. एकूण खोल्या तर किमान २०-२५ असाव्यात आणि माडय़ांवर जाण्यासाठी ठिकठिकाणी लाकडी-दगडी जिने होते. कालानुरूप राहणीमानातील बदलांमुळे घरात काही फेरफार केलेले असले तरीही वाडय़ातील पुरातन स्मृती जतन करायचा परांजपे मंडळींचा आटोकाट प्रयत्न जाणवल्याशिवाय राहात नाही. याची खात्री तिथली बठकीची खोली किंवा दिवाणखाना म्हणू हवं तर-बघताना पटते. देशप्रेमाने भारलेल्या त्या काळात वाडय़ातील वातावरणही अनेक लोकाग्रणींच्या बठकांनी मंतरलेले होते. लोकमान्य टिळक, आगरकर, गांधीजी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, स्वा. सावरकर यांसारख्या कित्येक नेत्यांच्या चर्चा, खलबते त्या वाडय़ाच्या िभतींनी लक्षपूर्वक ऐकली आहेत. त्यांचा तिथला नित्याने होणारा वावर त्या वाडय़ाने अनुभवला आहे. ब्रिटिशांविरुद्ध होणाऱ्या सभांमध्ये मांडायच्या विषयांची रूपरेखा तयार करताना तसेच ‘काळ’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या खास वक्रोक्तीपूर्ण शैलीतील निबंधांचे लेखन करणाऱ्या शि. म. यांना त्या बठकीच्या खोलीने डोळ्यात नक्कीच साठवून ठेवले असणार. देशभक्त मंडळींप्रमाणेच या वास्तूने पद्मावतीपाशी असलेल्या मठाच्या पूज्य शंकर महारांजांचा रहिवासही काही काळ अनुभवला आहे.
आजकाल आपण प्लास्टर ऑफ पॅरिसचे शोभिवंत असे कृत्रिम छत (फॉल्स सिलिंग) करतो तसेच तेथील दालनातही अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले काळे कुळकुळीत लाकडी छत होते-ज्याला कडीपाट म्हटले जाई. हिऱ्याची खरी पारख रत्नपारखीच करू जाणे, त्याप्रमाणे एकदा त्या वाडय़ात आलेल्या राजा केळकर संग्रहालयाच्या केळकरांचे लक्ष त्या कडीपाटाने वेधून घेतले आणि त्यांनी आपल्या संग्रहालयासाठी त्याची मागणी केली तेव्हा अण्णांचे दिवंगत नातू डॉ. वासूनाना परांजपे (जे तत्त्कालीन नगरसेवक होते) यांनीही अत्यंत दिलदारपणे ती मागणी मान्य केली- जेणेकरून तो प्राचीन, पण उत्तम नक्षीकामाचा नमुना संग्रहालयात कायमस्वरूपी जपला जाईल, तसेच सर्वसामान्यांनाही बघता येईल. आजही राजा केळकर संग्रहालयातील पुराणवस्तूंच्या दालनात तो कडीपाट आपण बघू शकतो. त्याकाळच्या गृहसजावटीचा एक अनोखा प्रकार त्या दालनात पाहायला मिळाला-रंगीत कोनाडय़ांच्या स्वरूपात. रस्त्याकडील भिंतींना खिडक्यांच्या वर साधारण ६ बाय ८ इंची कोनाडे दिसतात-ज्यांना मागील बाजूस रंगीत काचा लावलेल्या आहेत. त्यावर उन्हे पडल्यावर त्या मनमोहक दिसणाऱ्या रंगीत कोनाडय़ांमुळे त्या खोलीचे रूप अचानक झगमगून जाते. खोलीतील छताला टांगलेली निळ्या रंगाची फुटबॉलच्या आकाराची काचेची ४ झुंबरेसुद्धा येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेतात.
पूर्वीचे चुना-मातीच भक्कम बांधकाम असल्यामुळेच आज शंभरी पार करूनही कित्येक गोष्टी शाबूत आहेत. या वाडय़ातील काही िभती साधारण २ ते ४ फूट जाडीच्या आहेत. त्यातील खोल खोल फडताळे म्हणजे कपाट बघताना भिंतींच्या जाडीची कल्पना येते. कित्येकदा त्यातले अगदी टोकाचे सामान काढय़ासाठी म्हणे लहान मुलांची मदत घेण्यावाचून पर्याय नसे. अशा वेळी मग मुले रांगत जाऊन आतील वस्तू काढून मोठय़ांच्या स्वाधीन करत. कुठल्याही घरात स्वयंपाकघर, देवघर, बठकीची खोली असते; याप्रमाणेच वाडय़ात एक बळद होती. बळद म्हणजे बिना खिडकी झरोक्याची अंधारी अशी ती खोली. खेडेगावात धान्य साठवण्यासाठीचे बंदिस्त कोठार म्हणजेच बळद. पण पुण्यासारख्या शहरातील वाडय़ात तिचा उपयोग नक्की कशासाठी केला असावा ते आता सांगता येत नाही. कदाचित वर्षभराच्या धान्याशिवाय तिथे मौल्यवान चीजवस्तूही सांभाळून ठेवल्या असतील किंवा .. स्वातंत्र्यलढय़ाच्या त्या काळात तिचा उपयोग शस्त्रास्त्रे लपवण्यासाठी किंवा क्रांतिकारकांना लपण्यासाठीसुद्धा केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शस्त्रांवरून त्यांनी एक रोमहर्षक आठवण सांगितली (अर्थात त्यांच्या वाडवडिलांकडून ऐकलेली.) एकदा म्हणे, ब्रिटिशांचे शिपाई काही संशयावरून वाडय़ाची झडती घ्यायला आले होते. वाडय़ाचा कानाकोपरा शोधून झाला, परंतु नशीब बलवत्तर म्हणून गुपचूपपणे शौचालयात केरसुणीच्या मागे लपवलेले पिस्तूल त्यांना दिसले नाही.. मोठाच अनर्थ टळला. अर्थात शौचालय हे त्याकाळी घराच्या बाहेरच होते.
वाडय़ात काही ठिकाणी दोन खोल्यांमध्ये दरवाजाप्रमाणेच िभतीच्या मध्यावर गजवाल्या खिडक्या दिसतात. ज्यांच्यापुढे बसण्यासाठी दगडी कट्टे आहेत. आजकालच्या फ्रेंच विंडोचाच हा प्रकार, पण अर्थात फ्रेंच विंडोप्रमाणे यातून बाहेरचे निसर्गसौंदर्य वगरे नाही तर.. खिडकी उघडल्यावर गजातून पलीकडच्या खोलीचे दर्शन होते. रस्तासन्मुख एका खोलीच्या भिंतीला म्हणण्यापेक्षा, भिंतीऐवजी खालच्या अर्ध्या भागाला जाळी- आजकालच्या ग्रिलप्रमाणे आणि वरती २-३ रंगांच्या चौकोनी शोभिवंत काचांच्या (चर्चमध्ये दिसतात तशा) खिडक्या अशी रचना बघायला मिळाली. हवा खेळती राहण्यासाठी ही सोय नावीन्यपूर्ण वाटली.
वाडय़ाच्या तीन दारांपकी शक्यतो मुख्य दारातून ये-जा चाले. त्याच्या ४-४ फूट भरभक्कम अशा रुंद दरवाजाची लाकडी कडीसुद्धा तशीच भक्कम. त्याला अडसर म्हणतात. दरवाजा बंद केल्यावर त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो लाकडी ठोकळा सरकवायचा. एरवी मात्र तो पार भिंतीत सरकवलेला असतो. एकेकाळी अंगणात ऐसपस पार होता जिथे बच्चे कंपनीची धम्माल चालायची. त्याच्या पलीकडे प्रतिष्ठितांचे वाहन समजली जाणारी बग्गी ठेवण्याची सोय होती.
शि. म. परांजपे तसेच अनेक महान व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभलेली स्वातंत्र्यलढय़ातील अनेक गुपिते जपून ठेवलेली.. शेकडय़ाहून अधिक उन्हाळे-पावसाळे पाहिलेली.. एका धगधगत्या कालखंडाची साक्षीदार असलेली ही वास्तू आता मात्र थकलीय. एकसंधपणा तर केव्हाच लोपलाय. वाडय़ाच्या भवितव्याबद्दल काही अंदाज वर्तवणे कठीण, पण ज्येष्ठ परांजपे मंडळींच्या वाडय़ाप्रतिच्या भावनिक गुंतवणुकीमुळेच आम्हाला मात्र त्या उर्वरित वाडय़ाचे दर्शन झाल्यामुळे आम्ही मात्र स्वत:ला भाग्यवान समजतो.
vasturang@expressindia.com