पर्यावरण सर्व प्राणिमात्रांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक. निवारा तर सर्वाची मूलभूत गरज. निवारा शोधताना भोवतालच्या परिस्थितीचा विचार सर्व प्राणिमात्र आवर्जून करतात. घरटे बांधताना पक्षीदेखील भोवतालच्या परिस्थितीशी नाळ जुळणारे, निसर्गाशी एकरूप होणारे घरटे बांधतात. अनेक बिल्डर्स मात्र बांधकाम क्षेत्रात संकुले उभारताना निसर्गाच्या मूलभूत नियमांची पायमल्ली करत आहेत. हजारो वृक्षांची कत्तल करताना त्यावरील प्राणी, पक्ष्यांना बेघर केले आहेच; वर सर्व परिसर भकास करून प्रदूषण व तपमान वाढण्यास हातभार मात्र लावत आहेत.
सर्व काही इंग्लंड, अमेरिका यांचे अनुकरण करताना तेथल्या काही बाबी उगाच येथे आणल्या आहेत. या अगोदर फक्त लाकडी फर्निचर पुरता वापर केला जाणारा सनमायका नाहक भिंतीवर विराजमान केला गेला. फक्त लाकडी फर्निचरसाठी निश्चित उपयुक्त असलेला सनमायका सजावट करणाऱ्याच्या हौसेला धरबंध नसल्याने सर्वत्र आक्रमण करू लागला. मग जमीन तरी कशी मागे राहील? जमिनीवर वुडन फ्लोअरिंग अच्छादले गेले. गेल्या काही वर्षांपासून प्रॉपर्टी मार्केट सातत्याने बरेच तापविले गेले व त्याच सुमारास बर्फवृष्टी होत असलेल्या प्रदेशात लावले जाणारे वुडन फ्लोरिंग येथे ग्राहकांना भुरळ पाडायला महागडे आमिष या रूपात गाजावाजा करून आणले गेले. वास्तविक उष्ण हवा व धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या आपल्या शहरांमध्ये लादी पुसणे, धुणे हे सातत्याने करायला लागते. तेथे शहाबादी लादी ऐवजी वुडन फ्लोरिंग बसविणे हे योग्य नाहीच. वर महागडय़ा वुडन फ्लोरिंगसाठी अनेक वृक्ष विनाकारणी धारातीर्थी पडतील त्याचे काय?
घराची रचना एकाच दिशेला सर्व खोल्या, खिडक्या येतील व नैसर्गिक वायुविजनाला अटकाव होईल अशा तऱ्हेने करायची. वर सर्व खोल्यांमध्ये तुलनात्मकरीत्या हलक्या दर्जाचे एसी पुरवायचे व जणू काही मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा पुरविली असल्यासारखा गाजावाजा करायचा! तसेच या सुविधांची किंमत कित्येक पटींनी अधिक आकारायची. असा नवा पायंडा सध्या सर्वत्र दिसून येतो. इथले हवामान, वीज टंचाई, ग्राहकांच्या गरजा, त्यांच्या सवयी या कशाचाही विचार आजकाल बांधकाम क्षेत्रात केला जात नाही. वर अनावश्यक ठरणाऱ्या अनेक बाबी पाश्चिमात्य जगतातून येथे आणून अत्याधुनिक सुविधा म्हणून त्यांची जोरदार जाहिरात मात्र केली जाते. या सर्वाची भुरळ सुरुवातीला पडतेच. त्यामुळे बिल्डरने टाकलेल्या अमिषांच्या जाळ्यात सर्वसामान्य ग्राहक सहज अडकतात.
वर्षांतील काही काळ बर्फवृष्टी होणाऱ्या व एरवीही थंड हवामान असलेल्या प्रदेशात घरामध्ये जमिनीवर कार्पेट अंथरले जाते. परंतु कार्पेटची साफसफाई त्यामध्ये जमा होणाऱ्या धुळीकणांच्या रोप प्रवणतेमुळे (ं’’ी१ॠ८) उद्भवणारे सर्दी, खोकला आदी आजार या त्रासांमुळे वुडन फ्लोरिंगला तेथे अधिक पसंती मिळू लागली. गेली दोन शतके अमेरिकेमध्ये लाकडी घरेच बांधली जात. अजूनही लहान निवासी घरांमध्ये तेथे लाकडी बांधकाम प्रामुख्याने आढळते. बांधकाम क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे गेल्या काही वर्षांत तेथे इमारतींचा ढाचा बदलला गेला. व्यावसायिक इमारतींमध्ये बांधकाम साहित्य सामग्रीमध्ये तेथे आमूलाग्र बदल झाला. हे बदल होत असतानाच जुन्या घरांचे, गोदामांचे लाकडी अवशेष रिसायकल करून नव्या इमारतींमध्ये ते वापरले जाऊ लागले. ओक, शिसव अशा टणक लाकडांचे रिसायकलिंग करून त्यांना पुनरुज्जीवन तर दिलेच आणि त्यापासून आधुनिक जीवन शैलीमध्ये चपखल बसतील अशा उपयुक्त सामग्रीही निर्माण केल्या गेल्या. ही आहे अत्याधुनिक वुडन फ्लोरिंगची जन्मकथा! ‘वापरा आणि फेका संस्कृती’ म्हणून ज्यांच्याकडे काहीशा उपहासाने बघितले जाते त्यांनी मूल्यवान लाकडाचे केलेले विस्मयकारक जतन!
भारतीय जीवनशैलीत तर वस्तूंच्या पुनर्वापराला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या जीवनशैलीत अनेक शतके आपण ते अंगीकारले होते. परंतु गेली काही वर्षे आधुनिकतेच्या चुकीच्या कल्पनांनी प्रगत समाजाची भ्रष्ट नक्कल करण्यातच आपल्याला धन्यता वाटू लागली. आपल्या हवामानाला जरुरीचे नसले तरी केवळ त्यांची नक्कल म्हणून वुडन फ्लोरिंग येथे आणून लोकप्रिय केले गेले.
प्रगत देश व आपण यात फरक म्हणजे त्यांच्याकडे ते वापरून जुने झालेले रिसायकल केलेले लाकूड होते. आणि आपल्याकडे खास त्याच्यासाठी झाडे तोडण्याची शक्यता अधिक मोठे प्रकल्प उभारताना पर्यावरणवाद्यांची केली जाणारी मुस्कटदाबी आपल्याला नवीन नाही.
ठाणे, मुंबई येथील मालमत्ता प्रदर्शनात अनेक मोठय़ा बिल्डर्सच्या संकुलांमध्ये एक अत्याधुनिक सुविधा म्हणून वुडन फ्लोरिंग हमखास दाखविले जाते. त्याची भलावण केली जाते. त्याचा नेमका उपयोग सांगण्याऐवजी ते किती महागडे आहे व तो कसा मोड ट्रेंड आहे हे ठसविले जाते. इतकी अत्याधुनिक आणि बाहेरून आयात केलेली चांगली गोष्ट आम्ही तुम्हाला कशी पुरवत आहोत हे सांगितले जाते. परंतु त्यांच्या सेल्स ऑफिसर्सपैकी एकालाही ‘ठाण्यात वा मुंबईत तुमचे संकुल जेथे आहे तेथे वर्षांतले किती महिने बर्फ पडतो?’ या प्रश्नाचे उत्तर (त्यातील खोच न कळल्याने) अद्याप देता आलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wooden flooring unnecessary
Show comments