ज्येष्ठ सामाजसेवक शंकरबाबा पापळकर हे गेल्या ३० वर्षांपासून निराधार, अनाथ आणि दिव्यांग मुलांच्या संगोपन आणि पुनर्वसनासाठी अविरत काम करत आहेत. अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथे स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, निराधार मुलांचं बालगृह आहे. शंकरबाबांनी बालगृहातील जवळपास १२३ मुला-मुलींना स्वतःचं नाव देऊन जगण्याची नवी उमेद दिली आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी एक वडील म्हणून शंकरबाबा निस्वार्थपणे पार पाडत आहेत. शंकरबाबांच्या याच योगदानासाठी त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे.