पुण्यातील निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल शशिकांत दळवी हे गेली १८ वर्षे जलसंधारणासाठी काम करत आहेत. २००३ मध्ये ‘रुफ टॅाप रेन वॅाटर हार्वेस्टिंग’ या आपल्या प्रकल्पांतर्गत त्यांनी विमान नगर येथील स्वतःच्याच गृहनिर्माण संस्थेपासून याची सुरुवात केली. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे सोसायटी टँकर मुक्त होण्यास मदत झाली. ज्यामुळे पैशाची बचत झाली शिवाय विमान नगरमधील पाण्याची पातळीही सुधारली. सोसायटीमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ‘पर्जन्य’ ही संस्था स्थापन केली. संस्थेद्वारे त्यांनी पाण्याबाबत जनजागृतीची मोहिमही हाती घेतली. सात राज्य, महाराष्ट्रातील सहा जिल्हे आणि मराठवाड्यातील १३० गावं तसंच गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, उद्योग यासारख्या जवळपास ६५०हून अधिक ठिकाणी या प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.