Loksatta Exclusive Devendra Fadnavis: इंटरनेटवरील माहितीच्या माऱ्यात अचूक तपशील सापडणे सध्या कठीण बनले आहे. ‘चॅट जीपीटी’ तसेच ‘एआय’च्या गोंधळयुगात वर्षभराचा दस्तावेज माहितीरूपात पुरविणारे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह माहितीसंग्रहकांना उपयुक्त ठरणारे ‘लोकसत्ता’चे लोकप्रिय पुस्तक ‘वर्षवेध’ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित होईल. यंदा पूर्णपणे नव्या स्वरूपात अधिक माहिती तसेच अधिक तपशिलांनी सजविलेल्या या पुस्तकात २०२४ सालात घडलेल्या घटना, या वर्षाचे खास मानकरी अशी भरगच्च मजकुराची पर्वणी आहे. लेखक, पत्रकार, विश्लेषक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि माहिती संग्राहकांसाठी गेल्या दशकभरापासून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून ‘वर्षवेध’ पुस्तकाचा उपक्रम राबविला जातो. पहिल्या वर्षापासूनच प्रचंड प्रतिसादामुळे या पुस्तकाचे अनेक वेळा पुनर्मुद्रण केले जाते. वर्षातील प्रत्येक महत्त्वपूर्ण गोष्टीची इत्थंभूत खबरबात या अंकामध्ये सापडेल.