२६ जुलै २००५ या दिवशी मुंबईकरांना साक्षात्कार झाला की, ज्यांना ते नाले म्हणतात; ते नाले नाहीत तर चक्क नद्या आहेत. मिठी वगळता मुंबईतील सर्व नद्यांचा उगम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये होतो. आणि तिथून त्या पश्चिमेच्या दिशेने वाहत येतात. दहिसर ही त्यातीलच एक महत्त्वाची नदी या नदीच्या परिसरात- काठावर दोन महत्त्वाच्या प्राचीन गुंफा आहेत कान्हेरी आणि मंडपेश्वर. यातील कान्हेरीमध्ये इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात तिथे राहणाऱ्या बौद्ध भिक्खूंनी येथील पाण्याचा काळजीपूर्वक केल्याचे पुरातत्त्वीय पुरावेही सापडतात. नदीच्या काठावर मानवी संस्कृतीने मूळ धरले, इथेच ती फुललीदेखील आणि याच नदीच्या पात्रामध्ये तेथील सुफलतेवरून युद्धेही झाली.दहिसर नदीचेही पात्र मानवी कृतींमुळे प्रसंगी अतिक्रमणामुळे आक्रसले आणि नदीने गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यात रौद्र रूप धारण केल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. दहिसर नदीचा संक्षिप्त इतिहास यंदाच्या जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने !