महाश्मयुग होऊन गेले ते इसवी सनपूर्व एक हजार वर्षांपूर्वी. याच काळात मृतांशी संबंधित विविध श्रद्धा- परंपरा दृश्य पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर जगभरात जपल्या गेल्या आणि प्रसारही पावल्या. त्या महाश्मयुगीन संस्कृतीचे पुरावे जगभरात विखुरलेले पाहायला मिळतात. त्यातही जगातील प्राचीन संस्कृती असलेल्या असिरिया, मेसोपोटेमिया, इजिप्त, ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये ते विकसित रूपात पाहायला मिळतात. हे सारे अनुभवायचे तर त्यासाठी आपल्या या सर्व देशांची सफर करायला हवी, तिथल्या संग्रहालयांना भेटी द्यायला हव्यात. पण याच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये (सीएसएमव्हीएस) आता प्रमुख देशांतील संग्रहालयांमधून प्राचीन शिल्पकृती हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून थेट मुंबईत आल्या आहेत. आणि त्या निमित्ताने आपल्याला गंगा ते असिरिया असा हा संस्कृतींचा प्रवास थेट याच मुंबईत अनुभवण्याची संधी आयती चालून आली आहे.