‘गोष्ट मुंबईची’च्या गेल्या भागामध्ये आरे कॉलनीच्या उत्तर टोकाला असलेल्या हबाले पाड्यातील वाघशिळा आपण पाहिली आणि आरे, आदिवासी आणि मुंबई यांचे नेमके नाते काय आहे, ते समजून घेतले. आता या भागामध्ये आपण आरेचे दक्षिण टोक गाठले असून याच परिसरात अलीकडेच प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. यामध्ये मंदिराचे जोते, छोटेखानी मंदिरांच्या शिखराचा भाग आणि काही महत्त्वाच्या शिल्पकृतींचाही समावेश आहे. हे सारे प्राचीन अवशेष अलीकडे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. शिवाय या अवशेषांचा आकारही असे सुचवतो की, हे केवळ एकाच मंदिराचे नव्हे तर मोठ्या आकाराच्या प्रशस्त मंदिर संकुलाचे अवशेष आहेत. हे मंदिर शिवाचे असावे किंवा मग देवीचे तरी असा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी या परिसरात सापडलेल्या पुरावशेषांवरून हे पुरते लक्षात आले आहे की, मध्ययुगामध्ये आरे आणि मरोळ हा मुंबईतील सर्वात समृद्ध परिसर होता. किंबहुना म्हणून या परिसरात सापडणाऱ्या पुरावशेषांची संख्या सातत्याने वाढते आहे. हे पुरावशेष नेमके काय सांगण्याचा प्रयत्न करताहेत, हे समजून घेण्यासाठी ‘गोष्ट मुंबईची’चा हा भाग पाहायलाच हवा!