यंदाचा गणेशोत्सव करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांनुसार सर्वत्र साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गर्दी टाळून पूजाआर्चा देखील पार पाडल्या जात आहेत. त्यानुसार, दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पहाटेच्या सुमारास हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारं सामूहिक अथर्वशीर्ष पठण यंदा केवळ पाच महिलांच्या उपस्थितीत ‘बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पार पडलं. इथल्या या उपक्रमाला ३४ वर्षांची परंपरा असून ती खंडीत झाली नसली तरी मर्यादित स्वरुपात पार पडली.