पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर काळात वीजशलाकांच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने माणसाबरोबरच पशू दगावतात, मालमत्तेचे नुकसान होते. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगावॅटची असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. विद्युतभाराचे उदासिनीकरण म्हणजेच न्युट्रलायझेशनची प्रक्रिया म्हणजे देखील वीज होय. एका सेकंदाच्या दहा हजाराव्या भागापर्यंतच्या कालावधीत वीज चमकते. दोन ते पंधरा किलोमीटर अंतर कापत चाळीस लाख अँपिअरपर्यंतचा कोसळणारा विजेचा लोळ अनेकदा दगडालाही मेणाप्रमाणे वितळवून टाकतो. आता ही वीज आकाशात कशी तयार होते व या विजेपासून सुरक्षितता कशी बाळगली पाहिजे, हे आपण बघू या