गाझियाबाद पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार मुंब्रा येथे सुमारे ४०० लोकांचे सामूहिक धर्मांतर झालं होतं. त्यानुसार ठाणे पोलिसांचा तपास सुरू होता. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी शाहनवाज खान या व्यक्तीला ताब्यात घेतलं. मात्र मुंब्रा परिसरात एकही धर्मांतराचं प्रकरण आढळलं नसल्याचं चौकशीत स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यावर आता राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत हा सर्व महाराष्ट आणि मुंब्राला बदनाम करण्याचा कट होता, असा आरोप केला आहे.