“राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत. जातीय तणाव वाढणार नाही याची पोलिसांनी काळजी घ्यावी. ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे तिथे दंगली घडवल्या जात आहेत” असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. आज सांगलीत जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी “कोल्हापूरसारख्या शहरात शाहूंच्या पुरोगामी विचारांची बांधणी अतिशय घट्ट आहे. अशा ठिकाणी दंगल होते हे शंकास्पद आहे. गृहमंत्री यांनी एखादी बैठक बोलवावी, आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला तयार आहोत. सोशल मीडियाच्या फेक अकाउंटबाबत गांभीर्याने विचार करावा, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे” असं जयंत पाटील म्हणाले.