संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गाधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील विविध भागात त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येत असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू असताना भिडे यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या आंदोलनात येऊन संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ नारे बाजी केली आहे. यावेळी दोन्ही गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले आहे. पोलिसांनी संभाजी भिडेंच्या समर्थकांना सध्या ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळ व तणाव निर्माण झाला होता.