राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर शरद पवार हे पुन्हा अॅक्शन मोडवर आलेले दिसत आहेत. अनेक जिल्ह्यांत त्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहे. बीडनंतर आता २५ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये शरद पवारांची सभा होणार आहे. मात्र या सभेच्या माध्यमातून अजित पवार गटातील ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, अशी चर्चा असल्याचा प्रश्न पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारला. त्यावर जयंत पाटील यांनी उत्तर देत सभेबाबत गैरसमज पसरवण्याचा उद्योग काही लोक करत आहेत, असं ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.