मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय ओबीसी मोर्चा महासंघाचं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं. दरम्यान, शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत ओबीसी समाजाच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज (३० सप्टेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात आंदोलनस्थळी भेट दिली. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही फडणवीसांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं आहे. तसंच राज्यभरातील ओबीसी महासंघाचं आंदोलनही मागे घेण्यात आलं आहे.