इस्रायल हा तसा छोटेखानी किंवा आकारमानाने लहान असा देश असला तरी जगाच्या आर्थिक स्थैर्यासाठी चिंचोळ्या पट्ट्यातील हा देश महत्त्वाचा आहे. बायबलमधील संदर्भापासून ते त्याही आधीच्या संदर्भांमध्ये या प्रदेशाचे महत्त्व दडलेले आहे. यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम तिन्ही धर्म इथली भूमी पवित्र मानतात. खरे तर इथल्या संघर्षावर द्विराष्ट्र वादाचा तोडगा निघालाही होता. त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झालीही मात्र कडवा धर्माभिमान आडवा आला; कधी इस्रायलींच्या बाबतीत तर कधी मुस्लिम कट्टरवाद्यांकडून! गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायली राज्यकर्त्यांनी त्यास खतपाणी घालण्याचे काम केले आणि त्याचे पर्यावसान आता आपण पाहात आहोत. सध्या सुरू असलेला इस्रायल- पॅलेस्टाइन संघर्ष असाच सुरू राहिला. तर संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. ते परिणाम कोणते? आणि या संघर्षाचे मूळ नेमके कशात दडले आहे?; ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले हे विश्लेषण!