गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसेकडून टोलच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. खुद्द राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत टोलनाके थेट जाळून टाकण्याचा इशारा दिला. त्यामुळे टोलच्या मुद्द्यावर राज्य सरकारच्या पातळीवर वेगाने हालचाली झाल्या. यासंदर्भात बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांबरोबरच काही मंत्री व राज ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले, याची माहिती आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली.