राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली २४ ऑक्टोबरला दसऱ्याला युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पुण्यातील शास्त्री रोडवरील स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्याच्या अभ्यासिकेमध्ये जाऊन संघर्ष यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. यावेळी रोहित पवार म्हणाले की, देशभरात दसरा हा सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. त्या सणाच्या निमित्ताने पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला गंज पेठेतील समता भूमी येथे जाऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून ही यात्रा सुरू होणार आहे. त्यानंतर लाल महाल येथे जाऊन जिजाऊंच्या पुतळ्यास देखील अभिवादन केलं जाणार आहे. तर हा दिवस आशिर्वाद दिवस म्हणून साजरा करणार असून त्यानंतर तेथून पायी चालत टिळक स्मारकपर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करतील. तसेच त्यावेळी तरुणांचे प्रश्न देखील समजून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.