चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबर रोजी खोदकामाचं काम चालू असताना कोसळला. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे ६० मीटरचा भाग खचल्याने ४१ कामगार आत अडकले होते. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते. या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी सुखरूप बाहेर काढण्यात बचावपथकांना यश आलं. यानंतर कामगारांचा बोगद्यामधील परिस्थितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ते एकमेकांना धीर देताना दिसून येत आहे.