Sanjay Raut on Fadnavis:”…मग प्रफुल पटेल तुम्हाला कसे चालतात?”;नवाब मलिक प्रकरणावरून राऊतांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले असून विधानसभा सभागृहात ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर आज शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून भाजपावर जोरदार टीका केली. “नागपूरमध्ये लबाड लांगडं ढोंग करतंय… बाकी सगळे सोंग करतायत”, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच नवाब मलिक यांच्याप्रमाणेच प्रफुल पटेल यांच्यावरही आरोप आहेत. दाऊदशी संबंधित लोकांशी त्यांनी व्यवहार केला, असा आरोप भाजपानेच केला होता. मग प्रफुल पटेल यांच्याबाबतीत एक न्याय आणि नवाब मलिकांवर हल्ला कशासाठी? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.