प्राचीन शिल्पकृतींच्या माध्यमातून तो कालखंड आणि प्राचीन संस्कृती समजून घेण्याची नामी संधी सध्या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये सुरू असलेल्या प्राचीन शिल्प या प्रदर्शनाच्या निमित्ताने चालून आली आहे. प्राचीन काळातील सर्व देवता या प्रामुख्याने निसर्गदेवताच होत्या, असे अभ्यासांती लक्षात येते. प्रस्तुत प्रदर्शनासाठी वस्तुसंग्रहालयाने त्यांच्या दालनाची पुनर्रचना केली आहे. या दालनात वरूण (सर्वात प्राचीन देवता), नागक्कल, सूर्य आणि वनदेवता या शिल्पकृती पाहायला मिळतात. फक्त एवढेच नाही तर जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशाच प्रकारच्या निसर्गदेवता कोणत्या आणि कुठे आहेत याचा शोध आणि त्यांचा संबंध यांचा धांडोळा इथे घेता येतो, तोही याच मुंबईमध्ये! यामध्ये वरूणाचा ग्रीक देवता पोसायडनशी असलेला संबंध आण या साऱ्यांचा कोल्हापूरच्या ब्रह्मगिरीशी असलेला संबंध हे सारे इथे व्यवस्थित उलगडते!