छत्रपती संभाजीनगरमध्ये काल (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी उद्धव ठाकरे गटाची जनसंवाद सभा पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपाबरोबरच शिंदे गट व अजित पवार गटालाही लक्ष्य केलं. यावेळी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरूनही भाजपावर टीका करण्यात आली. तसेच, अशोक चव्हाण यांच्याविरोधात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेची ऑडिओ क्लिप संजय राऊतांनी या सभेत वाजवली. या ऑडिओ क्लिपवरूनही संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीका केली.