राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याच्या निर्णयाचा आधार घेत शरद पवार गटाकडून सादर केलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. यावर शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विधानसभा अध्यक्षांचा निर्णय काय येईल, याची मला आणि आमच्या सहकाऱ्यांना कल्पना होतीच. आता सर्वोच्च न्यायालयात जाणे हाच एकमेव पर्याय राहतो. निवडणूक जवळ आल्यामुळे लवकरात लवकर निर्णय न्यायालयाने घ्यावा, ही आमची विनंती असणार आहे. आजवर अनेक निर्णय झाले, पण पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला देण्याची घटना घडली नव्हती. संबंध देशाला माहितीये की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली, पण तरीही पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला देणं, हा अन्याय आहे”, अशी भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली.